असा करा भुईमूग पिकामध्ये जिप्समचा वापर

Use of gypsum in groundnut crop
Use of gypsum in groundnut crop

भुईमूग या प्रमुख तेलबिया पिकाच्या उत्पादनवाढीसाठी अन्य अन्नद्रव्यांसोबतच जिप्समचा वाटा प्रमुख आहे. भुईमुगाच्या चांगल्या उत्पादनासाठी योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे आवश्यक आहे. बागायत आणि कोरडवाहू अशा दोन्ही प्रकारच्या लागवडीमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांचा वापर केला जातो. मात्र, ती योग्य प्रमाणात, वेळेवर आणि योग्य खोलीवर देणे गरजेचे असते. सोबतच भुईमूग उत्पादनात कॅल्शिअम व गंधक या दोन्ही पोषक घटकांचा सामाईक विचार करावा लागतो. हे दोन्ही घटक आऱ्याच्या वाढीसाठी आणि शेंगा पोसण्यासाठी लागतात. विशेषतः आम्लधर्मी जमिनीत कॅल्शिअमची गरज अधिक असते. कॅल्शिअममुळे भुईमुगाच्या शेंगांची टरफले मजबूत बनतात. शेंगांमध्ये दाणे चांगले भरतात. शेंगदाण्यातील तेल तयार होण्याच्या प्रक्रियेत गंधकाची गरज असते. जिप्समचा वापर 

  • भुईमूग पिकासाठी कॅल्शिअम व गंधक यांचा पुरवठा करण्यासाठी जिप्सम स्वस्त पडते. जिप्सममध्ये कॅल्शिअम (२४ टक्के) व गंधक (१८.६ टक्के) हे मुख्य घटक आहे.  
  • भुईमुगाच्या पेरणीपासून २५ ते ३५ दिवसांनी फुलधारणेवेळी प्रति हेक्टरी ५०० किलो जिप्सम द्यावा.  
  • शेतकऱ्यांच्या शेतातील प्रात्यक्षिकामध्ये जिप्समचा उपयोग केलेल्या शेतामध्ये शेंगांचे उत्पादन वाढल्याचे आढळले.  
  • भुईमुगाची काढणी होईपर्यंत शेतात घातलेला जिप्सम संपतो. म्हणून दर हंगामात या पिकाला जिप्सम द्यावा लागतो.  
  • जिप्समची बारीक भुकटी फूल धरण्याच्या अवस्थेत जमिनीच्या पृष्ठभागावर शक्य तितकी झाडांच्या बुंध्याजवळ पसरून द्यावी. कारण जमिनीच्या पृष्ठभागाच्या ५ सेंटिमीटर थरातील कॅल्शिअम, आऱ्या व पोसणाऱ्या शेंगांच्या उपयोगी पडतो.
  • कॅल्शिअम

  • भुईमुगात कॅल्शिअम मुळाद्वारे आणि शेंगांच्या टरफलांद्वारे शोषला जातो.  
  • भुईमुगाच्या पिकास विशेषतः शेंगा भरण्याच्या वेळी कॅल्शिअमची अधिक आवश्यकता असते. त्यामुळे शेंगा भरल्या जातात. त्या पोचट राहत नाही. आम्लयुक्त जमिनीमध्ये कॅल्शिअमची कमतरता भासते.
  • लक्षणे

  • कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे पानाच्या खालच्या बाजूस टिपके दिसून येतात. वाढणाऱ्या शेंगांना गडद तपकिरी रंग येतो. तसेच कधीकधी शेंगा पोचट भरून त्याच्यावर सुरकुतल्या सारख्या रेषा उमटतात. मुळावर गाठी कमी लागतात. कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे झाडांची वाढ खुंटते.  
  • कॅल्शिअम २० सेंटिमीटर खोलीवर टाकल्यास शेंगा ५ ते ८ सेंटीमीटर खोलीत वाढतात. अन्यथा त्या १० सेंटिमीटरपेक्षा खोल लागतात.
  • गंधक (सल्फर) 

  • ज्या जमिनीमध्ये उपलब्ध गंधकाचे प्रमाण १० पीपीएमपेक्षा कमी असते, तेथे त्याची कमतरता भासते.
  • गंधकाच्या कमतरतेमुळे नवीन पानाचा रंग फिक्कट हिरवा दिसतो. कोवळी आणि मधली पाणी पिवळी पडू लागतात.  
  • अतिशय कमतरता असल्यास पाने कागदासारखी पातळ होतात. उष्ण कटिबंधातील बहुतेक जमिनीमध्ये गंधकाची कमतरता आढळते. नत्र आणि स्फुरद यापैकी काही खतांमध्ये गंधकाचे प्रमाण असते.  
  • गंधकामुळे भुईमुगाच्या मुळावरील गाठींचे प्रमाण वाढते. पानांचा आकार वाढून प्रत सुधारते. भुईमुगाच्या शेंगांचे उत्पादन वाढते. शेंगातील तेलाचे प्रमाण वाढते आणि दाण्यातील प्रथिनांचे प्रमाणही वाढते. तसेच रोगांचे प्रमाण कमी होते.
  • जिप्समच्या वापराचे फायदे

  • जमिनीची सुपीकता वाढून ती भुसभुशीत होते.  
  • क्षारपड जमीन जिप्समच्या वापरामुळे सुधारते.  
  • बियाण्याची उगवण क्षमता जिप्सममुळे वाढते.  
  • जिप्सममुळे पाण्यातील क्षारांचा निचरा होण्यास मदत होते.  
  • सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात.  
  • पिकाची अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढते.  
  • फळांची, पिकांची गुणवत्ता सुधारते.  
  • जमिनीत वाढणाऱ्या पिकांसाठी जिप्सम फायदेशीर आहे.  
  • जमिनीतील हुमणीचे नियंत्रण होते.  
  • पीक वातावरणातील जास्त तापमानाचा ताण सहन करू शकते.
  • संपर्क:- विलास सातपुते, ९९२३५७५६८५ (सहायक प्राध्यापक, मृद विज्ञान आणि रसायनशास्त्र विभाग, समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा, जि. बुलडाणा.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com