वीज यंत्रणेची काळजी घ्या...

पाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळ्यात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक असते. विद्युत उपकरणांना पाऊस लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. विशेषतः मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचा मुख्य स्वीच बंद करावा. तात्काळ महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधून मीटरची जागा बदलून घ्यावी.
precautions for using electric systems
precautions for using electric systems
Published on
Updated on

पाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळ्यात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक असते. विद्युत उपकरणांना पाऊस लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. विशेषतः मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचा मुख्य स्वीच बंद करावा. तात्काळ महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधून मीटरची जागा बदलून घ्यावी. पावसाळ्यात विद्युत उपकरणे असलेली भिंत ओली असेल तर अशा भिंती आणि विद्युत उपकरणांना हात लावू नये. ओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे शॉक लागण्याची शक्यता असते. वीज उपकरणे अशा ओलाव्यापासून दूर ठेवावीत. अशी उपकरणे खिडकीपासून दूर असावीत. जेणेकरून त्यात पाणी जाणार नाही.

  • विद्युत उपकरणावर पाणी पडले अथवा त्यात पाणी शिरले तर ते उपकरण त्वरित बंद करून ते मूळ वीज जोडणीपासून बाजूला करावे. त्यामुळे त्या उपकरणातून शॉक लागण्याची शक्यता राहणार नाही. कपडे वाळत घालण्यासाठी लोखंडी तार वापरू नये तसेच ही तार विजेच्या खांबाला किंवा यंत्रणेला बांधू नये.
  • आकाशामध्ये विजेचा कडकडाट होत असेल तर सर्व विद्युत उपकरणे बंद करून मूळ वीज कनेक्शनपासून बाजूला करावीत. वीज पडल्यास त्या भागातील विद्युत प्रवाहाचा उच्च दाब वाढून विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
  • अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या तसेच घरगुती वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी.
  • विद्युत खांबांना व तणाव तारेला (स्टेवायर) जनावरे बांधू नयेत. त्यास दुचाकी टेकवून ठेवू नयेत किंवा विद्युत खांबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत. कपडे वाळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तारांचा वापर टाळावा. कारण अनवधानाने ही तार वीजप्रवाह असलेल्या तारांच्या संपर्कात आली तर मोठी दुर्घटना होऊ शकते.
  • घरातील दूरचित्रवाणीची डीश किंवा अ‍ॅंटेना वीजतारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डापासून बंद करावे.
  • टिनपत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
  • विद्युत उपकरणांची दुरुस्ती करताना मेन स्वीच बंद करावा. दुरुस्तीदरम्यान पायात रबरी चपला घालाव्यात. पायाखालची जमीन ओलसर असू नये. वायरची जोडणी करताना एकच वायर तुकड्या-तुकड्यात जोडू नये. वायरची जोडणी करावीच लागली तर त्यावर इन्सुलेशन टेप लावावी.
  • टिनपत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. विद्युत उपकरणांची दुरुस्ती करताना मेन स्वीच बंद करावा. दुरुस्तीदरम्यान पायात रबरी चपला घालाव्यात व पायाखालची जमीन ओलसर असू नये याची खबरदारी घ्यावी. वायरची जोडणी करताना एकच वायर तुकड्या-तुकड्यात जोडू नये. तसेच वायरची जोडणी करावी लागली तर त्यावर इन्सुलेशन टेप लावावी.
  • पावसाळ्यात घरातील कोळी, कीटक, पाल, झुरळ, चिमण्या उबदार जागा म्हणून मीटर तसेच स्वीचबोर्डचा आश्रयाला येतात, त्यामुळे शॉटसर्किट होऊ शकते. त्यादृष्टीनेही खबरदारी घ्यावी.
  • वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे 

  • वीज खांबावर असणारे चॉकलेटी रंगाचे पीन किंवा डिस्क इन्सुलेटर (चिमणी) तसेच डीपी स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सुलेटर हे चिनी मातीचे असतात. वीजप्रवाह वितरण यंत्रणेच्या लोखंडी खांबात उतरू नये, यासाठी हे इन्सुलेटर अतिशय महत्त्वाचे असतात. उन्हाळ्यात चिनी मातीचे हे इन्सुलेटर तापतात. त्यानंतर पावसाचे दोन-चार थेंब पडले की इन्सुलेटरला तडे जातात. त्यामुळे विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते. वाहिनीमधील वीजप्रवाह खंडित होतो.
  • भूमिगत वाहिन्यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या कामांसाठी खोदकाम केले जाते. यात भूमिगत वाहिन्यांना धक्का बसतो. उन्हाळ्यात त्यावर काही परिणाम होत नाही. परंतु, पावसाला सुरवात झाली की पाणी या वाहिन्यांमध्ये शिरून बिघाड होतो. संततधार पावसामुळे भूमिगत वाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो.
  • वीज यंत्रणेवर झाडे कोसळतात, मोठ्या फांद्या पडतात, वीज कोसळते किंवा तिच्या कडकडाटाने दाब वाढल्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. फिडर पिलर, रिंगमेन युनिट आदी आदी यंत्रणेत पाणी शिरते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. खोलगट व सखल पावसाचे पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रोहित्राचा वीजपुरवठा बंद करून ठेवावा.
  • फ्यूज तार म्हणून तांब्याची तार धोक्याची 

  • घर किंवा इमारतीचा मेन स्विच आणि त्याच्या शेजारी असलेल्या किटकॅटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अल्युमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरावी. अशी फ्यूज वायर वीजभारानुसार वापरल्यास शॉर्टसर्किट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होतो.
  • तांब्याची एकेरी, दुहेरी वेढ्याची तार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीज खंडित होत नाही व मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण होते.
  • जुनाट वायरिंग व अर्थिंग तपासणी 

  • वीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या तारांची स्थिती योग्य असल्याबाबतची खात्री अधिकृत परवानाधारक कंत्राटदाराकडून करून घ्यावी. घरातील वीजजोडणीसाठी लागणारे साहित्य आय.एस.आय. प्रमाणित असावे.
  • सर्व वीज उपकरणांची अर्थिंग योग्य असल्याबाबतची खबरदारी घ्यावी. योग्य अर्थिंगमुळे शॉकची तीव्रता कमी होते, तसेच उच्च दाब असलेल्या मिक्सर, हिटर, गिझर, फ्रिज या उपकरणांसाठी थ्री पिन सॉकेटचा वापर करावा. अशा थ्री पिन सॉकेटमध्ये अर्थिंगची व्यवस्था असते.
  • सार्वजनिक वीज यंत्रणेपासून सावधान

  • अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पिलर, रोहित्राचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेली विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते.
  • मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकतो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. ३) पूर किंवा अतिवृष्टीमुळे तसेच नदीकाठच्या परिसरात कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र आणि वीजपुरवठा बंद करावा.
  • टोल फ्री क्रमांक

  • शहरी व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅंडलाइन किंवा मोबाईलद्वारे या टोल फ्री क्रमांकावर वीज ग्राहकांना वीज सेवेविषयक तक्रार दाखल करता येते.
  • मोबाईल अॅप, www.mahadiscom.in वेबसाईट किंवा ट्विटरद्वारेही तक्रारी स्वीकारल्या जातात.
  • वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार मिस्ड कॉलद्वारे करण्याची सोय आहे. महावितरणकडे वीजग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून महावितरणच्या ०२२-४१०७८५०० या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा. तसेच ‘एसएमएस’द्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी मोबाईल क्रमांकावरून NOPOWER हा ‘एसएमएस’ महावितरणच्या ९९३०३९९३०३ या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदविली जाते.
  • (लेखक महावितरण, पुणे येथे जनसंपर्क अधिकारी आहेत.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com