स्थानिक वाण, प्रक्रिया पदार्थांना हवे ‘ग्लोबल’ वारे

स्थानिक वाण अधिक उत्पादनक्षम नसले, तरी त्यातील औषधी गुणधर्मांची ओळख जगाला करून दिली पाहिजे. त्याला व्यवस्थापन आणि विक्री कलेची जोड दिल्यास हवामान बदलात तग धरण्यासोबतच अल्पभूधारक शेतकरी ताठ मानेने उभा राहील.
climate change dr. nagesh tekale part 3
climate change dr. nagesh tekale part 3

स्थानिक वाण अधिक उत्पादनक्षम नसले, तरी त्यातील औषधी गुणधर्मांची ओळख जगाला करून दिली पाहिजे. त्याला व्यवस्थापन आणि विक्री कलेची जोड दिल्यास हवामान बदलात तग धरण्यासोबतच अल्पभूधारक शेतकरी ताठ मानेने उभा राहील. १९७० च्या दशकात आपल्या देशात हरितक्रांती झाली. शेकडो मेक्सिकन वाण काळ्या आईच्या पदरात टाकतानाच रासायनिक खते आणि कीडनाशकांचा वापर झाला. यात मिळालेल्या यशामुळेच आज आपल्या देशांमधील धान्य कोठारे ओसंडून वाहत आहेत. अगदी स्वतःची गरज भागवून गरीब भुकेल्या राष्ट्रांना युनोच्या अन्न कार्यक्रमातून वाटप केले जाते. त्यातून उरलेल्या अन्नापासून ‘हॅण्ड सॅनिटायझर’ आणि इथेनॉलनिर्मिती करण्याची वेळ आली आहे. हरितक्रांतीमध्ये वापरलेल्या रसायनामुळे वातावरण बदलाला चालना दिलेली आहे. डॉ. स्वामिनाथन म्हणतात, ‘‘आपली अन्नधान्याची गरज पूर्ण झाल्यावर, स्वावलंबी झाल्यावर तेथेच थांबून टप्प्याटप्प्याने आपल्या पारंपरिक पिकाबरोबरच सेंद्रिय शेतीकडे वळावयास हवे होते. मात्र हव्यासापोटी ते घडू शकले नाही. आज याचीच फळे पर्यावरण आणि राजकारणाच्या व्यासपीठावर अनुभवत आहोत.’’ हरितक्रांतीनंतरच्या तीन दशकांनी भारतात शैक्षणिक क्रांती आली. शैक्षणिक क्षेत्रात खासगीकरणाचे पेवच फुटले. सुरुवातीस प्रोत्साहन म्हणून शासनाचे अनुदान मिळाले. ज्याची मागणी जास्त त्या विषयाच्या महाविद्यालयांची संख्या हजारोपटीत वाढली. यात अभियांत्रिकी, औषधशास्त्र, वैद्यकीय, कृषी, जैव तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन यांचा समावेश होता. लाखो विद्यार्थ्यांनी लाखो रुपये भरून अशा महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला. मात्र ‘विद्यार्थी काय शिकला’, याबरोबरच ‘तो कोठे शिकला’ यालाही महत्त्व असते. म्हणूनच शासकीय आयआयटी, आयआयएम, वैद्यकीय संस्था जगभरात नावाजल्या जातात. या संस्थांच्या प्रवेशपरीक्षा असतात, त्यात उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थी अशा संस्थांनाच प्राधान्य देतात. या संस्था आणि तेथील माजी विद्यार्थ्यांबाबत नुकतेच एक सर्वेक्षण प्रकाशित झाले होते. त्यानुसार, येथील ५० टक्के विद्यार्थी परदेशात अथवा परदेशी उद्योगांमध्ये मोठ्या पदावर योगदान देत आहेत. शासनाने करदात्यांच्या पैशातून येथील उच्च शिक्षणासाठी प्रति वर्ष लाखो रुपये प्रति छात्र खर्च करायचे. या विद्यार्थ्यांनी स्वप्रगतीसाठी ‘परदेश’ स्वीकारायचा, हे मनाला पटत नाही. कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान आणण्याची घोषणा करतो. पण आमचे कृषी अभियंते त्यांच्या गुणांना योग्य प्रोत्साहन न मिळाल्याने परदेशात जातात. देश खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर व्हायचा असेल, तर अशा गुणवंत विद्यार्थ्यांनी भारतातच राहावे, यासाठी व्यवस्था केली पाहिजे. अहमदाबाद येथील ‘आयआयएम’ ही अशीच व्यवस्थापनामधील उच्च शिक्षण देणारी केंद्र शासनाची स्वायत्त शिक्षण संस्था. २००४ मध्ये अमेरिका भेटीमध्ये एका मॉलमध्ये जाण्याची संधी मिळाली. अतिशय प्रशस्त आणि बहुतेक शहराबाहेर असलेल्या मॉलमध्ये वस्तूंची मांडणी, गुणवत्तेबरोबरच तत्पर विक्रेते हे वैशिष्ट्य. याचा व्यवस्थापक एक भारतीय तरुण होता. त्याने वर उल्लेखिलेल्या शिक्षण संस्थेमधून व्यवस्थापनाचे उच्च शिक्षण घेतले होते. वीस वर्षांपूर्वी भारतात मॉल संस्कृती फारशी रुजलेली नव्हती म्हणून तो तरुण परदेशात गेला. वैयक्तिक भेटीत त्याने मॉलमधील अनेक भारतीय खाद्यपदार्थ आणि कृषी उत्पादने दाखवली. ‘यलो ब्रेड मेड इन इंडिया’ या आपल्याकडील अस्तंगत होत असलेल्या पिवळ्या ज्वारीचा ‘ब्रेड’ (म्हणजे भाकरी) ८ डॉलरला होती. मधुमेहावर उत्कृष्ट आहार अशी ख्याती असून, या ब्रेडला स्थानिक भारतीयांपेक्षाही अमेरिकन लोकांची विशेषतः मधुमेही रुग्णांची अधिक मागणी असल्याचे त्याने सांगितले. महिन्यातून १००० ब्रेड कर्नाटकातून येतात, पंधरा दिवसांत संपतातही. अमेरिकेपेक्षाही भारतामधील अन्नधान्य निर्यात परवाना मिळणे अधिक किचकट आहे. या मॉलमध्ये अशा कितीतरी पारंपरिक भारतीय पदार्थांना वाव देऊ शकतो. मात्र नियमित व योग्य दर्जाचा पुरवठा होत नाही. विविध प्रकारची लोणची, पापड यांनी येथे स्थायिक झालेल्या भारतीयांबरोबरच अमेरिकन लोकांच्या आहारातही स्थान मिळवले आहे.’’ तो सांगत होता त्या पंधरा वर्षांपूर्वीच्या आणि आजच्या स्थितीत फरक झाला आहे. मित्रांबरोबर खरेदी केलेला ब्रेड म्हणजे पिवळीची भाकरी अथवा शेंद्री या ज्वारीच्या कुळामधील तृणधान्याने १९७२ च्या दुष्काळात अमेरिकन पीएल ४२० मिलो ज्वारीपेक्षाही अनेकांची भूक भागवली होती. शेवटी ते आमचे देशी वाण होते. आमच्या कितीतरी पिढ्यांनी त्यांचा सांभाळ केला होता. पिवळीची शिळी भाकरी आणि घरच्या गाईचे ताजे दूध हा त्या वेळी आमचा अमृततुल्य आहार होता. ज्वारीचे एक एकर रान चार गडी एका दिवसात ‘भलरी’ म्हणत पेंढ्या बांधून मोकळे करत, त्याच वेळी शेंद्रीच्या तेवढ्याच रानाला दोन दिवस लागत. भक्कम उंच ताट, कमी पाणी, तंतुमय मुळे पण खोल गेलेली. ती उपटण्यासाठी तरणाबांड गडीच हवा. आजही महाराष्ट्रात हे पीक थोडेफार आढळते. मात्र धान्यापेक्षा गुरांना पौष्टिक आहार म्हणून. वातावरण बदलावर मात करण्यासाठी आज आम्हाला अशी शेंद्रीसारखी पिके हवीत. कमी पाण्यावर जगणारी, मुळे जमिनीत खोल जाणारी, वारावादळाचा सामना करणारी आणि सोबत आम्हाला आरोग्य देणारी. आजही परदेशातील मॉलमध्ये भारतीय पारंपरिक उत्पादने, शास्त्रीय प्रक्रिया केलेले पदार्थ यांना मागणी आहे. ती वाढविण्यात आणि पुरविण्यात आम्ही कमी पडतो. या भारतीय पदार्थांना परदेशी बाजारपेठेत सन्मानाने स्थान मिळवून देण्यात व्यवस्थापन क्षेत्रांमधील विद्यार्थी नक्कीच मोलाचे कार्य करू शकतात. त्याच वेळचा प्रसंग आठवतो. वॉशिंग्टनच्या विमानतळावर आठ तास कसे काढावयाचे, या विवंचनेत असताना समोरच्या स्टॉलवरील एका पदार्थाने आकर्षित केले. ते होते आकर्षक पाकिटामध्ये सीलबंद दहा ग्रॅम सूर्यफुलाचे बी. एक डॉलरला घेऊन फोलपट बाजूला करून आतील बिया चवीने खाण्यात माझा वेळ गेला. चटक लागल्याने एकामागे एक चार पाकिटे संपवली. ५० ग्रॅमसाठी ५ डॉलर ( म्हणजे ३५० रु.) मोजले होते. सर्वांत जास्त आनंद दिला तो त्या पाकिटावरच्या ‘मेड इन इंडिया’ या शब्दांनी. त्यांनाही आहे जगायचा अधिकार... वातावरण बदलाच्या शापामुळे आज देशी सूर्यफुलाचे वाण कुठेही दिसत नाही. विकासाच्या नावाखाली आम्ही मोठमोठे वृक्ष तोडले, मधमाश्‍यांची पोळी नष्ट केली. पराग सिंचनासाठी कीटकांची गरज असलेले वाण हळूहळू अस्तंगत होत गेले. आता शेतकरी सूर्यफूल लावत नाहीत, कारण त्यात अर्धे बीज फोलच असतात. आपणास जेवढा जगण्याचा अधिकार आहे, तेवढाच मधमाश्यांना आहे, हे सत्य आपण स्वीकारले पाहिजे. वातावरण बदलाबरोबरच मानवाच्या हव्यासापायी, कीटकनाशकांच्या वापरामुळे त्यांच्या वसाहती नष्ट होत चालल्या आहेत. स्थानिक वाण ग्लोबल करण्यासाठी...

  • २ जानेवारीला भुवनेश्‍वर येथील ‘आयआयएम’ची पायाभरणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सर्व व्यवस्थापन संस्थात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘लोकल’ला ‘ग्लोबल’ करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
  • भारतीय शेतकऱ्यांची स्थानिक उत्पादने वैश्‍विक दर्जाची झाली पाहिजेत. भारतामधील पारंपरिक बी बियाण्यामध्ये उत्पादनक्षमता कमी असली, तरी त्यात औषधी गुणधर्म भरपूर आहेत. आपल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना वातावरण बदलावर मात करावयाची असेल तर त्यांनी कारळे, जवस, करडई, भगर, नागली, उडीद, मूग, हुलगा, मटकी अशा शेकडो दुर्लक्षित धान्य पिकांना पुनरुज्जीवित करावे लागेल. त्यातून उत्पन्न मिळण्यासाठी उत्कृष्ट व्यवस्थापन व प्रक्रिया महाविद्यालयांशी जोडून पारंपरिक व नावीन्यपूर्ण प्रक्रिया पदार्थांना परदेशी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी लागेल. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शेतकऱ्यांच्या निर्यातीसाठी स्वतंत्र द्वार उपलब्ध करून दिले आहे. मात्र शेतकऱ्यांना गरज आहे ती उत्कृष्ट व्यवस्थापन तज्ज्ञांची.
  • हरितक्रांतीत मागे पडलेल्या, अस्तंगत होणाऱ्या वाणांना आणि त्यांची जोपासना करणाऱ्या शेतकऱ्यांना बरोबर घेत व्यवस्थापन शास्त्रातील विद्यार्थ्यांनी स्वतःचे उद्योग स्थापन करावेत. ‘यलो ब्रेड मेड इन इंडिया’ प्रमाणेच ‘मेड इन इंडिया’चा ब्रॅण्ड दर्जेदार होत जाईल.
  • आज आपल्या देशात केंद्र शासनाच्या आधिपत्याखाली वीस आयआयएम आहेत. तेथील व्यवस्थापन अभ्यासक्रमात देशांमधील अस्तंगत होत असलेल्या पारंपरिक कृषी वाणांची प्रक्रिया आणि ब्रॅण्डिंग करण्याविषयी प्रकल्प जोडता येतील.
  • सध्याच्या वातावरण बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी हेच देशी, स्थानिक गुणधर्मांचे वाण अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यास मदत करतील. यात शंका नाही.
  • जगभरामध्ये काळजीचा, भीतीचा विषय होत चाललेल्या वातावरण बदलाच्या समस्येवर हीच साधी सोपी उत्तरे ठरणार आहेत. त्यातून कृषी क्षेत्राला नवीन दिशा मिळण्यासोबत भारत खऱ्या अर्थाने ‘आत्मनिर्भर’ होऊ शकतो.
  • - लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com