पारंपरिक शेतीच्या तुलनेमध्ये नव्या संकरीत जाती जमिनीतून पोषक घटकांची उचल अधिक प्रमाणात करतात. परिणामी सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता प्रामुख्याने दिसून येत आहे. त्यावर मात करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांच्या वापराचे शास्त्र समजून घेण्याची आवश्यकता वाढत आहे. आधुनिक शेतीमध्ये नवनवीन बियाणे, नवीन खते, द्रवरूप खतांचा ठिबक सिंचनातून वापर आता नियमित होत आहे. जमिनीतील पोषक घटकांचे प्रमाण कमी होऊन, त्याच्या कमतरता पिकांमध्ये आणि सजीवामध्ये दिसू लागल्या आहेत. मातीच्या परीक्षणानंतर संतुलित प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होण्याची आवश्यकता आहे. त्यातून जमिनीतील शोषून घेतलेल्या अन्नद्रव्यांचा पुरवठा भरून निघतो. मात्र, अलीकडील काळामध्ये दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होत आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांतील एखादा घटकही कमी असल्यास त्याचे विपरीत परीणाम अन्य अन्नद्रव्यांच्या शोषणामध्ये होतात. एकूणच पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. उदा. लोह हे पोषक द्रव्य चुनखडीयुक्त जमिनीमध्ये कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचे दिसून येते. बोरॉनची कमतरता हलक्या, उथळ आणि वालुकामय जमिनीत तसेच तांबड्या-लाल जमिनीतदेखील दिसते. प्रत्येक सूक्ष्म अन्नद्रव्याची कार्यपद्धती आणि पिकांच्या वाढीमध्ये त्याचे नेमके कार्य याविषयी माहिती घेऊ.
जस्त ः
वनस्पतीतील जस्ताचे कार्य ः जस्त हे अप्रत्यक्षरीत्या प्रकाश संश्लेषण, हरितद्रव्य संश्लेषण आणि प्रथिनांची निर्मिती घडून आणण्यात सहभागी असते. संप्रेरकाची निर्मिती पिकांमध्ये असलेल्या जस्ताच्या प्रमाणावर अवलंबून असते. वाढबिंदूची वाढ झपाट्याने होण्यास मदत करते. कमतरतेची लक्षणे ः जस्ताच्या कमतरतेमुळे पिकांच्या हिरव्या कोवळ्या पानांमध्ये तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. पेरांची वाढ बरोबर होत नाही. परिणामी पात्यांचा आकार बदलतो. शिरा स्पष्ट पिवळ्या पडतात. कांड्या-कांड्यातील अंतर कमी होऊन उंची कमी होते. फूल आणि फलधारणा कमी होते. लोह
वनस्पतीतील कार्य ः पिकांच्या हिरव्या पानांचा लोह हा घटक नसला तरी अप्रत्यक्षरीत्या प्रकाश संश्लेषण क्रियेत उत्तेजकाचे कार्य करतो. त्यामुळे हरितद्रव्य तयार होण्यास मदत होते. लोह अनेक विकरांचा (एन्झायम्स) घटक असून, इलेक्ट्रॉन स्थलांतर क्रियेत आणि इतर जीव-रासायानिक क्रियेत भाग घेतो. नत्र स्थिरीकरण प्रक्रियेत लोह मदत करतो. लोहद्रव्याच्या कमतरतेमुळे पिष्टमय पदार्थाचे प्रमाण घटते. पिकांमध्ये स्फुरदाचे शोषण अधिक झाले तर लोहाच्या शोषणावर प्रतिकूल परिणाम होतो. लोहाचे चलनवलन अगदीच कमी असल्यामुळे मुळ्यामधून वरच्या अवयवापर्यंत द्रव पोचण्यासाठी उशीर लागतो. म्हणून लोह द्रव्याच्या कमतरतेची लक्षणे नवीन कोवळी पाने, उमललेल्या कळ्या यावर लवकर दिसतात. कमतरतेची लक्षणे ः पिकांची कोवळी पाने पिवळी पडतात. पानातील नसांच्या आतील भाग पिवळा होतो. अधिक कमतरता असल्यास पाने पांढरी आणि जर्जर होतात. पाने, कळ्या व वाढबिंदू गळून पडतात. फुले कमी लागतात. वांझ निर्मिती होते. मॅंगनीज (मंगल)
वनस्पतीतील कार्य ः पिकांच्या जैविक आणि जीवासायनिक प्रक्रियांना मॅंगनीज द्रव्य उत्तेजित करण्याचे कार्य करते. काही विकरामध्ये मॅंगनीज हा प्रथिनांचा एक घटक- सहयोगी म्हणून कार्य करतो. प्रकाश संश्लेषण क्रियमध्ये मॅंगनीज कमतरतेमुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होते. याशिवाय ऑडीनोसीन ट्राय फॉस्फेटसारख्या ऊर्जाशक्ती पुरविणाऱ्या पदार्थाच्या निर्माणकार्यात मॅंगनीज आवश्यक असते. कमतरतेची लक्षणे ः मॅंगनीजच्या कमतरतेमुळे पानावर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. द्विदल धान्याच्या पानावर शिराच्या मधील भागात पिवळ्या रंगाचे पट्टे दिसतात. साधारणतः मॅंगनीजची कमतरता प्रथम कोवळ्या पानावर दिसते. लिबूवर्गीय फळझाडांच्या पानावर तेलकट डाग दिसतात. ज्वारी व बाजरीवर बुरशी येते. संपर्क ः ज्योती सहाणे, ९१४६१९११९० (श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड, संगमनेर, जि. नगर.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.