जमिनीची सुपीकता वाढवण्याचे सोपे तंत्र

तणे किंवा गवत पिकामध्ये योग्य काळात वाढवून त्याचे अधिक फायदे मिळवण्यासाठी द्राक्ष तज्ज्ञ कै. श. अ. दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९८६ पासून प्रयोग केले जात आहेत. यासंबंधी केलेल्या प्रयोगांची माहिती आपण घेऊ.
ट्रॅक्टरचलित यंत्राने गवत दाबून आडवे केले जाते. बाजूच्या फोटोमध्ये वाढलेले गवत यंत्राच्या साह्याने वरच्या वर कापले जाते.
ट्रॅक्टरचलित यंत्राने गवत दाबून आडवे केले जाते. बाजूच्या फोटोमध्ये वाढलेले गवत यंत्राच्या साह्याने वरच्या वर कापले जाते.

सामान्यतः गवत किंवा तणे ही पीक वाढीसाठी नुकसानकारक मानली जातात. तणे किंवा गवत पिकामध्ये योग्य काळात वाढवून त्याचे अधिक फायदे मिळवण्यासाठी द्राक्ष तज्ज्ञ कै. श. अ. दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९८६ पासून प्रयोग केले जात आहेत. यासंबंधी केलेल्या प्रयोगांची माहिती आपण घेऊ. जमीन कशी असावी, असा प्रश्न कोणत्याही शेतकऱ्याला विचारले तर तो म्हणेल, ‘‘पाण्याची कमतरता असताना योग्य प्रमाणात पाणी धरून ठेवणारी, पावसाच्या स्थितीमध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा होणारी, पिकांच्या मुळांची खोल व आडवी वाढ चांगल्या प्रकारे होणारी असावी.’’ हा प्रकार म्हणजे आखूड शिंगी, बहुगुणी असाच आहे. मात्र हे सर्व फायदे ज्या प्रकारच्या जमिनीतून मिळू शकतात, त्यांना सुपीक किंवा सजीव जमीन असे म्हणता येईल. सजीव जमिनीमध्ये रासायनिक खतांच्या अल्प किंवा वापराशिवायही चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकते. जमिनीमध्ये गवत वाढू देऊन जमीन सुपीक करण्याचे तंत्र प्रयोग परिवारामार्फत विशेषतः द्राक्ष पिकात यशस्वीरीत्या वापरले जात आहे.   गवत किंवा तणे म्हणजे पीकवाढीसाठी नुकसानकारक अशी शेतकऱ्यांची भूमिका असते. मात्र गवत वाढीमुळे होणारे तोटे टाळून त्यापासून फायदे कसे मिळवायचे, याविषयी समजून घेतले पाहिजे. यासंबंधी केलेल्या एका तुलनात्मक प्रयोगाची माहितीही आपण घेऊ.  द्राक्ष तज्ज्ञ कै. श. अ. दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९८६ पासून गवत वाढवून खत मात्रा कमी करण्याचे प्रयोग केले आहेत. या पद्धतीमध्ये खरड छाटणी ते ७० दिवसांपुढील कालावधीत म्हणजे १५ जूननंतर गवत वाढवले जाते. दोन्ही वेळच्या छाटणीनंतर पहिल्या ७० दिवसांपर्यंत द्राक्ष पीक जमिनीतून मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य उचलते. या काळात बागेमध्ये द्राक्षाची गवताची स्पर्धा होऊ नये, यासाठी गवत वाढवले जात नाही. त्यानंतर पुढील छाटणीपर्यंत तीन महिने गवत वाढवले जाते. खरड छाटणीनंतरचा हा कालावधी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात येतो. या काळात पावसाळा व योग्य वातावरण असल्याने भरपूर प्रमाणात गवत वाढते. जमिनीवर जेवढे गवताचे सुके वजन वाढते, तेवढेच वजन जमिनीखाली मुळाचे वाढते. गवताचा वरील भाग हा कापून टाकल्यावर त्याचे आच्छादन म्हणून अनेक फायदे होतात. त्यापैकी फळबागेतील जमिनीत वरील दोन ते चार इंचापर्यंत सेंद्रिय कर्ब वाढतो. भुसभुशीतपणा वाढतो. तसेच पिकास लागणाऱ्या पाण्यात १५ टक्क्यांपासून ४० टक्क्यांपर्यंत बचत होते. मल्चिंगचा थर जेवढा जाड तेवढे पिकाला पाणी कमी लागते. अशा जाड मल्चिंगमुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. जमिनीच्या वरच्या थरात पाणी धरून ठेवले जाते. याचा दुसरा फायदा रासायनिक खताच्या बचतीने होते. रासायनिक खताची मात्रा सुमारे २० ते २५ टक्क्यांनी कमी लागते. सेंद्रिय कर्ब चांगला वाढल्याने जमिनीतील खतांची उपलब्धता वाढते. त्यांचा जमिनीतून निचरा होण्याचे प्रमाण कमी होते. गवताच्या जमिनीखालील भाग म्हणजे मुळे. ती गवताच्या प्रकारानुसार जमिनीत दोन ते तीन फुटांपर्यंत वाढतात. गवत कापले गेल्यानंतर या मुळ्या जमिनीत कुजतात. जमिनीत कुजल्यानंतर सर्व जमीन भुसभुशीत, सच्छिद्र होते. आपण देत असलेले पाणी व रासायनिक खताद्वारे जमिनीत जे अतिरिक्त क्षार राहतात, त्यांचा निचरा होण्यासाठी ही मुळे कुजल्यामुळे राहिलेली उभी सूक्ष्म छिद्रे उपयोगी ठरतात. अतिरिक्त पाणीही याच मार्गाने निचरा होऊन गेल्यामुळे जमिनीत वाफसा टिकून राहतो. मुळ्या कुजून जमिनीत तयार झालेल्या सेंद्रिय कर्बामुळे पाण्याचा ताण पडण्याच्या स्थितीत उपलब्ध पाणी स्पंजाप्रमाणे धरून ठेवले जाते.  मी स्वतः या पद्धतीने ३५ वर्षे दर्जेदार द्राक्ष उत्पादन घेत आहे. बोपेगाव (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील किरण दत्तात्रय कावळे हेही  २००५ म्हणजेच पंधरा वर्षांपासून या पद्धतीने व्यवस्थापन करत आहेत. ते दरवर्षी द्राक्ष बागेतील दोन्ही छाटण्यांनंतर ७० दिवसांपुढील काळात गवत वाढवतात. गवत दरवर्षी तीन ते चार फुटांपर्यंत वाढते. फळ छाटणी अगोदर आठ ते दहा दिवस गवत आडवे पाडून तणनाशक फवारून गवत मारतात. त्यांच्याकडे थॉमसन, तास ए गणेश जातीची द्राक्षे आहेत. गेल्या पंधरा वर्षांत फुलगळीची २ वर्षे वगळता अन्य वर्षामध्ये एकरी ११ ते १४ टनांपर्यंत दर्जेदार द्राक्ष उत्पादन घेत आहेत. एकूण उत्पादनापैकी सरासरी ८० टक्के उत्पादन निर्यातक्षम असते. या सलग गवत वाढवून आच्छादन करण्यामुळे जमीन सुपीक झाली आहे. गेल्या सहा वर्षांपासून त्यांनी शेणखत देणेही बंद केले असले तरी उत्पादनात फरक पडलेला नाही. रासायनिक खतातही बचत होते. त्यांची जमीन खोल काळी आहे.  वरील तीनही प्रयोग हे द्राक्ष पिकातील असले तरी अन्य फळपिकातही त्यांचा वापर नक्कीच करता येईल. मात्र फळपिकात नवीन पानांची वाढ पूर्ण झाल्यावर जमिनीत गवत वाढवण्याचे प्रयोग करून पाहावेत. ज्या काळात फळपिकाची नवीन वाढ सुरू असते, त्या काळात गवत वाढवणे नुकसानकारक ठरते, हे लक्षात ठेवावे. गवत वाढवताना केवळ एकाच प्रकारचे गवत वाढविण्याऐवजी सर्व प्रकारचे मिश्र गवते वाढवावीत. म्हणजे त्या गवताद्वारे जमिनीत त्यांचे मुळावर वेगवेगळ्या उपयुक्त बुरशी व जिवाणू वाढतील. प्रत्येक गवताचे वेगवेगळे गुणधर्माचेही जमिनीला फायदे मिळतील. जमीन नैसर्गिकरीत्या सुपीक होईल. प्र. र. चिपळूणकर यांचे तंत्रही या पद्धतीशी मिळते जुळते आहे.  उत्पादनात सातत्य असेच आणखी शेतकरी म्हणजे भानदास वाळू कावळे. गेल्या दहा वर्षांपासून गवत वाढवण्याच्या पद्धतीचा अवलंब करीत आहेत. त्यांची जमीन खोल काळी असून, चुनखडीचे प्रमाणही बारा टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पूर्वी त्यांच्या बागेत दरवर्षी पाने पिवळी पडून फुगवण कमी होत असे. मात्र जेव्हापासून गवत वाढवण्यास सुरुवात केली, तेव्हापासून पाने पिवळी पडण्याचे प्रमाण हळूहळू कमी झाले. द्राक्षाची फुगवण वाढत गेली आहे. गेल्या सात वर्षांपासून दरवर्षी एकरी १२ ते १५ टन उत्पादन मिळते. यापैकी ६० टक्के दर्जेदार व निर्यातक्षम असते. जमीन सुपीक सात वर्षांपासून शेणखत देणेही बंद केले असले तरी उत्पादनात सातत्य आहे.  मालात एकसारखेपणा सावरगाव (ता. निफाड, जि. नाशिक) येथील अनिल कुशारे यांची जमीन मध्यम प्रकारची आहे. दीड फूट काळी माती व खाली मुरूम आहे. या प्रकारच्या जमिनीत त्यांनी नानासाहेब पर्पल नावाच्या द्राक्ष जातीची लागवड केली आहे. गवत वाढवण्याचा प्रयोग गेल्या दहा वर्षांपासून करत आहेत. त्यासाठी त्यांच्या द्राक्ष शेतीतील ११ ओळींमध्ये गेल्या नऊ वर्षांपासून शेणखत देणे बंद केले आहे. इतर ओळींना शेणखत देत आहेत. दरवर्षी निघणाऱ्या मालाचे वजन टिकाऊपणा माल तयार होण्यास लागणारा कालावधी याचे तुलनात्मकरीत्या निरीक्षण करतात. त्यांच्या निरीक्षणात दरवर्षी मालात एकसारखेपणा दिसतो आहे. माल एकाच वेळेस तयार होत आहे. फुगवण एकसारखी होत आहे. द्राक्ष घडांना एक सारखा काळा रंग येत आहे. वजनही एक सारखेच येत आहे. याचे कारण ते सातत्याने गवत दरवर्षी तीन ते चार फूट गवत वाढवून छाटणी अगोदर आडवे पाडून तणनाशक मारतात. असे गवत सतत बागेत कुजल्याने जमीन सुपीक झाली आहे.  - वासुदेव काठे,  ९४०४४०१४७५ (समन्वयक, दाभोळकर प्रयोग परिवार, महाराष्ट्र)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com