तूर पिकातील समस्यांकडे दुर्लक्ष नको

मूग-उडीद- सोयाबीन, बीटी कपाशीसोबत तुरीचे आंतरपीक घेतले जाते. आंतरपिकामध्ये मुख्य पिकाकडे लक्ष देताना या पिकाला दुय्यम दर्जा दिला जातो. पिकाकडे दुर्लक्ष असल्याने उत्पादकतेत वाढ होत नाही. किंवा त्याकडे लक्ष नसते.
तुरीवरील मर रोगाची प्राथमिक अवस्था
तुरीवरील मर रोगाची प्राथमिक अवस्था

जून महिन्यात पेरणी केलेले तुरीचे पीक साधारणत: जानेवारी महिन्यात कापणीला येते. तब्बल ७-८ महिने शेतात असलेले तुरीचे पीक या पिकाच्या कालावधीनुसार उत्पादन देताना आढळत नाही. मात्र शाश्‍वत बाजारभावाची हमी असल्यामुळे सलग पिकाऐवजी विविध पिकांमध्ये आंतरपीक म्हणून लागवडीचा कल अधिक असतो. मूग-उडीद- सोयाबीन, बीटी कपाशीसोबत तुरीचे आंतरपीक घेतले जाते. आंतरपिकामध्ये मुख्य पिकाकडे लक्ष देताना या पिकाला दुय्यम दर्जा दिला जातो. पिकाकडे दुर्लक्ष असल्याने उत्पादकतेत वाढ होत नाही. किंवा त्याकडे लक्ष नसते. गेल्या हंगामातील तूर पिकाची प्रति एकर उत्पादकता १.५ क्विंटल ते १०.५ क्विंटल अशी बदलती आढळून आली. अपवादात्मक स्थितीत यापेक्षा जास्त उत्पादन मिळाल्याचीही उदाहरणे आहेत. या हंगामात तूर पिकामध्ये पुढील समस्या प्रामुख्याने आढळल्या. याही वर्षी अशा समस्या येऊ शकतात, त्याकडे लक्ष ठेवावे. 

  • रोपावस्थेत असताना मोठ्या तीव्रतेचा पाऊस आल्यामुळे झाडे सुकण्याची समस्या ः रूट रॉट (Root Rot) 
  • फांदी अवस्थेत असताना पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव ः लीफ रोलर (Leaf Roller)
  •  फुलोरा अवस्था सुरू झाल्यापासून तुरीची झाडे उधळण्याची समस्या : मर (Wiltting) 
  •  शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना दवाळ जाण्याची समस्या :  चिलिंग/ फ्रॉस्ट इंज्युरी (Chilling /Frost Injury) 
  •  शेवरा अवस्था सुरू झाल्यापासून शेंगा पोखरून दाणे खाणारी अळी,  शेंग माशीची अळी, पिसारी पतंगाची अळी या किडींचा प्रादुर्भाव.
  • उत्पादनात वाढ करायची असल्यास या प्रत्येक समस्येमुळे होणारे नुकसान टाळले पाहिजे. त्यासाठी सुरुवातीच्या अवस्थेत व्यवस्थापनामध्ये करावयाचे बदल पुढील प्रमाणे.

  •  सलग तुरीची (डोबीव/ टोकण) पद्धतीने पेरणी असल्यास जोड ओळ पद्धतीचा अवलंब करणे.
  •  बीटी कपाशी : तूर आंतरपीक पद्धतीमध्ये दोन्ही पिकांची जोड ओळ पद्धतीने पेरणी करणे.
  •  मूग, उडीद, सोयाबीन : तूर आंतरपीक पद्धतीमध्ये सोडओळ (पट्टापेर) पद्धतीने ट्रॅक्टर अथवा बैलजोडी चलित पेरणीयंत्राने पेरणी करणे. 
  • ट्रॅक्टर अथवा बैलजोडीचलित पेरणी यंत्राने तुरीची पेरणी केलेली असल्यास निंदणाच्या वेळी (खुरपणीच्या वेळी) विरळणी करणे. 
  • तूर पिकाच्या लागवड क्षेत्रानुसार तुरीचे मजुरांद्वारे शेंडे खुडणे व शेंडे छाटणे. 
  •  ओलिताची व्यवस्था असल्यास आणि जमिनीतील ओल कमी झालेली असल्यास शेवरा अवस्थेपूर्वी आणि शेंगांमध्ये दाणे भरताना ओलीत करणे. 
  • शेवरा अवस्थेच्या सुरुवातीला, फुलोरा अवस्थेच्या सुरुवातीला व शेंगांमध्ये दाणे भरताना कीड व रोग तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी फवारणीचे व्यवस्थापन करणे. 
  • मूळसड (रूटरॉट)  रोपटे अवस्थेत तुरीचे पीक असताना मोठ्या तीव्रतेचा पाऊस आल्यास झाडे सुकण्याची समस्या निर्माण होते. अधिक पाऊस आल्यास तूर पिकाच्या ओळीत पिकाच्या बुडाशी जास्त वेळ पाणी साचून राहिल्यास झाडे जळतात.   अतिभारी जमिनीमध्ये अथवा पाण्याचा योग्यप्रकारे निचरा न होण्याऱ्या जमिनीमध्ये ही समस्या वारंवार होताना आढळते. अशा वेळी शेतकऱ्यांना २-३ वेळा तुरीच्या ओळीत पुन्हा पुन्हा तूर बियाणे डोबावे लागते व खांडण्या बुजवाव्या लागतात. प्रादुर्भावग्रस्त रोपटे उपटून पाहिल्यास अलगद उपटले जाते. रोपट्याची मुळे पूर्णपणे सडलेली आढळतात. यालाच रोपट्यांची ‘मूळसड’ असे संबोधले जाते. हा बुरशीजन्य रोग असून त्याकरिता पुढील उपाययोजना कराव्यात.

  • बीज प्रक्रिया :  पेरणीपूर्वी कार्बोक्झीन (३७.५ टक्के) अधिक थायरम (३७.५ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) ३ ग्रॅम प्रति किलो किंवा ट्रायकोडर्मा १० मि.लि. प्रति किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया केल्याशिवाय तुरीची पेरणी करू नये. 
  • पेरणीसाठी शिफारशीप्रमाणे बियाण्याचे प्रमाण तंतोतंत वापरावे. (शिफारस एकरी ३ ते ४ किलो बियाणे) बियाण्याचा वापर जास्त  केल्यास दोन झाडांतील अंतर कमी राखले जाऊन मूळसडचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरते. 
  • तूर पिकाची उगवण झाल्याबरोबर लगेचच पीक रोपावस्थेत असताना ट्रायकोडर्मा ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे द्रावणाची आळवणी (ड्रेचिंग) करावी. ओळीमध्ये फवारणी पंपाचे नोझल ढिले करून अथवा काढून प्रति एकर १०० लिटर द्रावण मुळालगत सोडावे.
  • मोठ्या तीव्रतेचा पाऊस येऊन शेतात पाणी साचून राहिल्यास नुकसान होते. यासाठी हवामान अंदाजावर लक्ष ठेवून तूर पिकाच्या ओळीच्या दोन्ही बाजूंनी डवऱ्याच्या जानोळ्याला अर्ध्यापर्यंत गच्च दोरी गुंडाळून हलक्या सऱ्या पाडून घ्याव्यात. याद्वारे पावसाचे अतिरिक्त पाणी पिकाच्या बुडाशी साचणार नाही. होणारे नुकसान टाळता येईल. 
  • अशा परिस्थितीत, आळवणी प्रति लिटर पाणी मॅन्कोझेब २.५ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम १ ग्रॅम.
  • - जितेंद्र दुर्गे,  ९४०३३०६०६७ (सहयोगी प्राध्यापक -कृषी विद्या, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com