मूग, उडीद, सोयाबीन यांसारख्या पिकांसोबत आंतरपीक म्हणून तूर पिकाची लागवड करता येते. मूग : तूर, उडीद : तूर, सोयाबीन : तूर अशी आंतरपीक पद्धतीमध्ये तूर पिकाला मुख्य पिकाचा दर्जा देण्यासाठी नावीन्यपूर्ण सुधारित सोडओळ (पट्टापेर) पद्धतीचा अवलंब करावा. प्रत्येक हंगामागणिक तूर पिकाच्या सलग लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. तूर पिकाची सलग लागवड करावयाची झाल्यास शेतकरी दोन ओळींतील अंतर ७ ते ८ फूट तसेच दोन झाडांतील अंतर १ ते २ फूट राखतात. तूर पिकाची सलग लागवड (पेरणी) करावयाची झाल्यास जोडओळ पद्धतीने पेरणी केल्यास जास्त फायदेशीर सिद्ध होऊ शकते. तूर पिकांची जोडओळ पद्धतीने, टोकन पद्धतीने पेरणी करावयाची झाल्यास दोन ओळींतील अंतर ३ ते ३.५ फूट ठेवावे. याकरिता ३ फुटी किंवा ३.५ फुटी काकरीच्या साह्याने संपूर्ण शेतात काकरी (हलक्या सऱ्या) पाडून घ्याव्यात. आणि दोन झाडांतील राखावयाचे अंतर साधारणत: १५ -२० सेंमी यानुसार मजुरांद्वारे बियाणे डोबून घ्यावे. टोकण पद्धतीने अशा प्रकारे पेरणी करताना बियाणे डोबून घ्यावे. टोकन पद्धतीने अशा प्रकारे पेरणी करताना दोन ओळींनंतर प्रत्येक तिसरी ओळ खाली ठेवावी. म्हणजेच प्रत्येक जोडओळीनंतर ६ अथवा ७ फुटांची जागा खाली राहील. या ठिकाणी डवऱ्याच्या (कोळपणी) फेराच्या वेळी मधोमध दांड पाडून घेतल्यास तूर पिकाच्या जोडओळी गादीवाफ्यावर येतील. याकरिता डवऱ्याच्या (कोळप्याच्या) जानोळ्याला गच्च दोरी गुंडाळून दांड ओढून घेतल्यास तुरीचे जोडओळीतील पीक गादीवाफ्यावर येईल. जास्त पावसाच्या स्थितीत अतिरिक्त पाणी दांडामध्ये उतरेल, तर कमी पावसाच्या स्थितीत पावसाच्या पाण्याचे मूलस्थानी संवर्धन होईल. बैलजोडीचलित ३ किंवा ३.५ फुटी काकरीने अशा प्रकारे काकर पाडताना सरत्यांचा वापर करून (म्हणजेच काकरी व सरते) तुरीची पेरणी करता येईल. ३ किंवा ३.५ फुटी दोन दाती काकरीने अशा प्रकारे जोडओळ पद्धतीने पेरणी करावयाची झाल्यास प्रत्येक वेळी पलटून येताना ६ किंवा ७ फूट खाली जागा ठेवावी. यामुळे प्रत्येक तिसरी ओळ खाली राखली जाईल. जोडओळीत पेरणी होईल. काकरी तीन दाती असल्यास केवळ पहिल्या दोन दात्यांना दोरीने सरते जोडावे. म्हणजे तिसऱ्या दात्यावर पेरणी होणार नाही. प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना शेवटचे दाते खाली काकरात ठेवावे. तुरीची जोडओळ पद्धतीने पेरणी शक्य होईल किंवा तिन्ही दात्यांना सरते जोडावे. पेरणी करताना फक्त पहिल्या दोन दात्यांवरील सरत्याने पेरणी (उनारी) करावी. तिसरे सरते डमी ठेवावे. (या सरत्याने बियाणे पेरणी / उनारी करू नये.) प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना डमी सरते शेवटच्या खाली काकरात ठेवावे. यामुळे जोडओळ पद्धतीने तूर पिकाची पेरणी शक्य होईल. ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राने जोडओळ पद्धतीने पेरणी करायची झाल्यास ट्रॅक्टरचे पेरणी यंत्र किती दात्याचे आहे, दोन दात्यामधील अंतर किती आहे या बाबी तपासाव्यात. त्यामुळे पेरणी होईल की नाही, हे कळेल. ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्र ५ अथवा ६ अथवा ७ दात्यांचे असल्यास पेरणी यंत्राच्या पहिल्या व शेवटच्या बियाण्याच्या कप्प्यात तूर पिकाचे बियाणे भरावेत. प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना ३ फूट अथवा ३.५ फूट अंतर सोडून पेरणी करावी. म्हणजेच जोड ओळींमधील अंतर ३ फूट अथवा ३.५ फूट राखले जाईल. दोन जोड ओळींमधील अंतर हे पेरणीयंत्र किती दात्याचे आहेत, यावर अवलंबून असेल. अशा प्रकारे जोडओळ पद्धतीचा अवलंब करताना जमिनीचा प्रकार व ओलिताची व्यवस्था यांचा विचार करावा. आंतरपिकांची सोडओळ (पट्टापेर) पद्धतीने ट्रॅक्टर अथवा बैलजोडीचलित पेरणी यंत्राने पेरणी
बैलजोडीने तीन दाती काकरी व सरत्याच्या माध्यमातून पेरणी करताना
जोडओळ पद्धतीने बीटी कपाशी : तूर आंतरपीक बीटी कपाशी पिकासोबत तुरीचे आंतरपीक शेतकरी घेताना दिसतात. बीटी कपाशीसोबतच तूर पिकाची आंतरपीक म्हणून लागवड करताना जोडओळ पद्धतीचा अवलंब करता येतो. याकरिता कपाशीच्या प्रत्येक चार जोडओळीनंतर पाचवी तूर पिकाची जोडओळ अथवा कपाशीच्या प्रत्येक सहा जोड ओळीनंतर सातवी तूर पिकाची जोडओळ घेता येईल. याकरिता ३ किंवा ३.५ फुटी काकरीने संपूर्ण शेतात ज्या दिशेने कपाशीची पेरणी करावयाची आहे, त्या दिशेने काकर पाडून घ्यावेत. याच्या विरुद्ध दिशेने सोयाबीनच्या सव्वा किंवा दीड फुटी काकरीने आडवे काकर पाडून घ्यावेत. म्हणजेच शेतात चौफुल्या तयार होतील. जोडओळ पद्धतीने कपाशीच्या बियाण्याची डोबिव पद्धतीने पेरणी करताना प्रत्येक तिसरी ओळ खाली ठेवावी. प्रत्येक चौफुलीवर केवळ एकच बियाणे डोबावे. यामध्ये तूर पिकाचा अंतर्भाव जोडओळ पद्धतीमध्ये आंतरपीक म्हणून करावयाचा झाल्यास कपाशीच्या प्रत्येक चार अथवा सहा जोडओळीनंतर एक जोडओळ तूर पिकाची लावावी. चौफुलीवर तूर पिकाची बियाणे लावताना प्रत्येक चौफुलीवर तुरीचे ३-४ दाणे डोबावे. अशा प्रकारे चौफुलीवर जोडओळ पद्धतीने कपाशी सोबतच तूर पिकाची सुद्धा पेरणी करता येते. या पद्धतीत शेतात उभे आडवे डवऱ्याचे फेर (कोळपणी) करण्यात अडचण येत नाही. यामुळे निंदणीवरील खर्च (खुरपणी) कमी करता येईल. तूर पिकाची चौफुलीवर पेरणी करताना प्रत्येक चौफुलीवर ३-४ दाणे पेरले आहेत. त्या ठिकाणी कमी वेगाने वाढलेल्या, रोगट, कमजोर, दबलेल्या रोपट्याची निंदणीवेळी विरळणी करून घ्यावी. एका चौफुलीवर केवळ दोन - तीन रोपटे ठेवावे. बळकट व जोमदार वाढीच्या रोपट्यांना अडचण होणार नाही. रोपट्यांच्या बुडाशी मोकळी जागा राहील. प्रत्येक जोडओळीनंतर खाली ठेवलेल्या ओळीच्या ठिकाणी सुरुवातीचे ३-४ उभे - आडवे डवऱ्याचे फेर (कोळपण्या) आटोपल्यानंतर ६ अथवा ७ फुटांच्या जागेच्या मधोमध डवऱ्याच्या (कोळपण्या) जानोळ्याला दोरी गुंडाळून दांड पाडून घ्यावेत. म्हणजेच याआधी सांगितल्याप्रमाणे सर्वच्या सर्व फायदे पिकाला मिळतील. - जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७ (सहयोगी प्राध्यापक, कृषी विद्या, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.