पेरणीपूर्व बीजप्रक्रियेतून करा सोयाबीनवरील कीड-रोगांना प्रतिबंध

मागील ७ ते ८ वर्षांपासून सोयाबीन पिकावर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने खोडमाशी, मावा, पांढरी माशी, फुलकिडे या किडींचा प्रादुर्भाव किंवा काही ठिकाणी उद्रेक होत वाढला आहे. त्यांच्यामुळे पसरणाऱ्या हिरवा मोझॅक, पिवळा मोझॅक विषाणू, नेक्रोसिस, कळी करपा किंवा इंडियन बड ब्लाइट या विषाणूमुळे रोग निर्माण होतात. या कीड-रोगांना अटकाव करण्यासाठी बीजप्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.
pest in soybean
pest in soybean
Published on
Updated on

मागील ७ ते ८ वर्षांपासून सोयाबीन पिकावर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने खोडमाशी, मावा, पांढरी माशी, फुलकिडे या किडींचा प्रादुर्भाव किंवा काही ठिकाणी उद्रेक होत वाढला आहे. त्यांच्यामुळे पसरणाऱ्या हिरवा मोझॅक, पिवळा मोझॅक विषाणू, नेक्रोसिस, कळी करपा किंवा इंडियन बड ब्लाइट या विषाणूमुळे रोग निर्माण होतात. या कीड-रोगांना अटकाव करण्यासाठी बीजप्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. खोडकूज व मूळकूज या प्रमुख रोगांचा प्रादुर्भाव पेरणीनंतर सुरुवातीला रोप अवस्थेत १ महिन्याच्या कालावधीत जास्त पाऊस व शेतामध्ये पाणी साचल्यामुळे होतो. त्याचप्रमाणे शेंगा अपरिपक्व अवस्थेत असताना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या कालावधीमध्ये जास्त पाऊस व शेतामध्ये पाणी साचल्यामुळे किंवा १० ते १५ दिवसांचा प्रदीर्घ पावसाचा खंड व प्रखर उष्णतामान झाल्यामुळे या रोगांचा उद्रेक वाढतो. खोडमाशी, तिन्ही प्रकारचे विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बीजप्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. खोडमाशी  

  • सोयाबीनवर आढळणाऱ्या सर्व किडीमध्ये खोडमाशी ही कीड पिकाच्या १०-१५ दिवसांच्या रोपावस्थेपासून ते कापणीपर्यंत आढळून येते. किडीची प्रौढ मादी माशी २ मि.मी. लांब असून ती काळी चकचकीत असते. ती पानाच्या पेशींमध्ये ८०-८५ अंडी टाकते. अंड्यातून २-७ दिवसांत अळी बाहेर पडून पानाच्या शिरेमधून देठामध्ये व नंतर देठामधून मुख्य फांदीत व खोडामध्ये शिरून आतील भाग पोखरून पोकळ करते. नागमोडी पोकळी तयार होते. फांदी व खोडामध्ये प्रत्येक पिढीमध्ये साधारणपणे २०-२५ दिवसांच्या कालावधीत अळी व कोष आढळून येतात. कोषात जाण्यापूर्वी अळी जमिनीलगत किंवा वरच्या भागात वरच्या खोडाला किंवा फांदीला माशीला बाहेर पडण्याकरिता छिद्र तयार करते. या किडीची एक पिढी ३२-५७ दिवसांत तयार होते. या किडीच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकात अनेक पिढ्या तयार होतात. यामुळे  पूर्वीच्या जुन्या (१९६०-७० दरम्यान) झालेल्या अभ्यासामध्ये खोडमाशीमुळे १६ ते ३० टक्के नुकसान होत असल्याबाबत नमुद आहे. मात्र प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती येथे नुकत्याच झालेल्या संशोधनात सोयाबीन पिकाचे ३० ते ६० टक्क्यांपर्यंत नुकसान होत असल्याचे आढळले आहे.
  •   खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे सुरुवातीच्या रोपावस्थेत (सुमारे १ महिन्याच्या कालावधीमध्ये) झाडाचे शेंडे झुकतात, पाने पिवळी पडून सुकतात व शेवटी मरतात. 
  •   खोडमाशीच्या १ महिन्यानंतर झालेल्या प्रादुर्भावामुळे झाडे सहसा मरत नाही परंतु शेंगा धरण्याचे प्रमाण कमी होते व दाण्याचा आकार लहान होऊन उत्पादनात घट येते.
  • कळीकरपा किंवा नेक्रोसिस   या रोगाचे स्वाभाविक लक्षण म्हणजे झाडाचा शेंडा तपकिरी रंगाचा होऊन खालच्या बाजूने झुकून गुंडाळल्यासारखी हूक निर्माण होते. यास कळी करपा असे संबोधतात. झाडाची वाढ खुंटते. पाने करपलेली दिसतात, पानाची देठे काळी पडतात, शेंगा धारणा होत  नाही. शेंगधारणा कमी होते. यातील दाणे विकसित होत नाहीत. विषाणूवाहक फुलकिडीद्वारे या रोगाचा प्रसार होतो.  कॉलर रॉट   या रोगामुळे सोयाबीनची रोपे कोलमडून जमिनीवर पडतात. या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या झाडांना झाल्यास झाडाचे मूळ व खोड यांच्या जोडाजवळ बुरशीची पांढरी वाढ झालेली आढळते. बुरशी बीजे ही आढळून येतात. पुढे झाडाच्या या भागाची सड होते. झाड सुकते व मरून जाते. मात्र मोठ्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास झाड पिवळे पडते व नंतर मरते. या रोगामुळे उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट होते.   मूळ व खोडसड   रोपावस्थेत या रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. प्रादुर्भाव जमिनीलगतच्या खोडावर व मुळावर भुरकट, काळपट डागणी होते. खोडाची आणि मुळाची साल रोगग्रस्त झाल्यामुळे रोपांना अन्नपुरवठा होत नाही. पाने पिवळी पडून गळतात. अशी रोपे मरतात आणि जमिनीलगतच कोलमडतात. रोगट खोडावर आणि मुळावर असंख्य काळी बुरशी बीजे (स्केलोर्शिया) दिसून येतात. जमिनीत कमी ओलावा आणि जमिनीचे तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस हे रोगाच्या प्रसारास पोषक ठरते. रोगग्रस्त झाडे कमजोर होतात. अकाली मरतात. मूळ व खोडसड (रॉट) रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात ७७ टक्क्यांपर्यंत घट येते  मोझॅक विषाणूजन्य रोग  

  •   हिरवा मोझॅक या रोगाने ग्रस्त झालेल्या झाडांची वाढ खुंटलेली दिसते. पाने आखूड, लहान, जाडसर व सुरकुतलेली होतात. अशा झाडांना शेंगा कमी व त्याही खुरटलेल्या सापडतात. शेंगात दाणे कमी व बारीक भरतात. शेंगा भरणे अवस्थेत रोग आल्यास बियाण्यांना सुद्धा याचा प्रादुर्भाव होते. बियाण्याच्या आवरणाचा रंग बदलून करडा, तपकिरी, काळपट होतो. या रोगाचा प्रसार मावा किडीद्वारे व बियाण्यापासून होतो. हिरवा मोझॅक रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात २५ ते ५० टक्क्यांपर्यंत घट येते.  
  •   पिवळा मोझॅक या रोगामध्ये रोगट झाडाच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. पांढऱ्या माशीद्वारे रोगाचा प्रसार होतो. पिवळा मोझॅक रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात ५ ते ९० टक्क्यांपर्यंत घट येते.
  • उपाययोजना   पेरणीपूर्व प्रतिबंधात्मक बीजप्रक्रियेमुळे पुढील प्रकारे फायदे होतात. 

  • पिकावरील मर, मूळकूज अशा जमिनीत वास्तव्यास असणाऱ्या रोगकारक बुरशीमुळे उद्‍भवणाऱ्या रोगाचे नियंत्रण बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करून करता येते.
  • कीटकनाशकाची बीजप्रक्रिया केल्यामुळे रस शोषक किडी, खोडमाशी व अन्य किडींपासून पीक किमान एक महिन्यापर्यंत सुरक्षित राहते.
  • जिवाणू संवर्धन खताची बीजप्रक्रिया केल्यामुळे उत्पादनात १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ होते. जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढते व रासायनिक खताची बचत होते.
  • केवळ बीजप्रक्रियेमुळे खोडमाशीसह मूळकूज, मर, कॉलर रॉट, हिरवा व पिवळा मोझॅक आणि कळी करपा या रोगापासून सरासरी ६० ते ७० टक्क्यांपर्यंत सोयबीन पिकाचे संरक्षण होते.
  • बीजप्रक्रिया 

  • बीजप्रक्रिया करताना प्रथम रासायनिक बुरशीनाशक, नंतर कीटकनाशकाची प्रक्रिया करून घ्यावी. पेरणीपूर्वी सोईनुसार १-८ दिवस ही प्रक्रिया करावी. त्यानंतर पेरणीच्या दिवशी पेरणीपूर्वी २ तास आधी जैविक बुरशीनाशक व संवर्धक खताची प्रक्रिया करावी.
  • कार्बोक्झीन (३७.५%) अधिक थायरम (३७.५%) (संयुक्त बुरशीनाशक) ३ ग्रॅम अधिक थायामिथोक्झाम (३०% एफ.एस.) १० मि.लि. प्रति किलो बियाणे. 
  • त्यानंतर पेरणीचे दिवशी ट्रायकोडर्मा व्हिरिडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रति किलो किंवा द्रवरूप बुरशीनाशकाची १० मि.लि. प्रति किलो अधिक ब्रेडिरायझोबियम जपोनीकम या जिवाणू संवर्धकाची २५ ग्रॅम अधिक पी.एस.बी. जिवाणू संवर्धक २० ग्रॅम प्रति किलोप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
  • - डॉ. अनिल ठाकरे,  ९४२०४०९९६० राजीव घावडे,  ९४२०८४१४२१ मंगेश दांडगे,  ९६५७७२५८२० (प्रादेशिक संशोधन केंद्र, अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अमरावती)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com