नियोजन आले लागवडीचे...

आले लागवड करताना जमीन, बेणे निवड, पूर्वमशागत, खत आणि पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करावे. माती परिक्षणानुसार रासायनिक आणि सेंद्रिय खताची मात्रा द्यावी. ठिबक सिंचनाचा वापर करावा.
सुधारित पद्धतीने आले पिकांची चांगली वाढ होते.
सुधारित पद्धतीने आले पिकांची चांगली वाढ होते.

आले लागवड करताना जमीन, बेणे निवड, पूर्वमशागत, खत आणि पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करावे. माती परिक्षणानुसार रासायनिक आणि सेंद्रिय खताची मात्रा द्यावी. ठिबक सिंचनाचा वापर करावा. लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी,हलकी ते मध्यम भारी प्रकारची जमीन असावी. पाणथळ, क्षारपड,चोपण जमीन निवडू नये. चुनखडीचे प्रमाण चार टक्यांपेक्षा जास्त असणारी जमीन अयोग्य आहे. कारण अशा जमिनीमध्ये पीक पिवळे पडून वाढ खुंटते. गेल्या ३ ते ४ वर्षात आले किंवा हळद लागवड नसलेली जमीन निवडावी. गेल्या हंगामात हरभरा, सोयाबीन,भुईमूग, कडधान्य लागवड केलेली जमीन आले पिकासाठी योग्य असते. गेल्या हंगामात ऊस,गहू, ज्वारी, मका यासारखी एकदल वर्गीय पिके घेतलेल्या जमिनीत आले लागवड केल्यास वाढ मध्यम होते.अशा जमिनीत आले लागवडीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर ताग, धैंचा, चवळी यासारखी हिरवळीची पिके गाडावीत किंवा सेंद्रिय खतांची मात्रा वाढवून द्यावी.

  • जमिनीत चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. लागवडीपूर्वी एक आठवडा अगोदर रोटाव्हेटरने जमीन भुसभुशीत करून चार फूट अंतरावर गादीवाफे करावेत. लांबी जमिनीच्या उतारानुसार १५० ते २०० फूट ठेवावी. म्हणजे पाणी व्यवस्थापन सोपे होते.
  • लागवडीपूर्वी १ ते २ दिवस अगोदर गादी वाफे फावडे किंवा दाताळ्याच्या साहाय्याने एक फूट उंचीचे करून सावरून घ्यावेत. म्हणजे जादा पावसात पाणी साचून कंद कूज होणार नाही.कंद चांगला पोसण्यास वाव मिळतो. गादीवाफ्याच्या तळाची रुंदी ४ फूट, माथा रुंदी ३.५ फूट व उंची १ फूट करून घ्यावी.
  • खत व्यवस्थापन 

  • गादी वाफे सावरताना एकरी १ टन चांगले कुजलेले सेंद्रिय खत किंवा गांडूळ खत, २५० किलो निंबोळी पेंड मिसळावी. कच्चे शेणखत गादीवाफ्यावर वापरू नये.
  • माती परिक्षणाच्या शिफारशीनुसार प्रति हेक्टरी १२० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद आणि ७५ किलो पालाश द्यावे. फेरस सल्फेट ५ किलो झिंक सल्फेट ५ किलो लागवडीच्या वेळेस मातीत चांगले मिसळून द्यावे. लागवडीनंतर अडीच ते तीन महिन्यांची मातीची भरणी करताना फेरस सल्फेट ५ किलो झिंक सल्फेट ५ किलोची मात्रा द्यावी. नत्राची मात्रा उगवणीनंतर २ ते ३ समान हप्त्यात विभागून द्यावी.
  •  माती परीक्षण अहवालानुसार विद्राव्य रासायनिक खताची मात्रा ठिबक सिंचनातून द्यावी.
  • जाती 

  • ताजे आले विक्री करावयाची असल्यास माहीम किंवा सातारी, औरंगाबाद, या अधिक तंतुमय व चवीला तिखट असणाऱ्या जाती निवडाव्यात.
  • प्रक्रिया उद्योगासाठी वरदा, सुप्रभा, वायनाड, रिओ दी जानेरो, मारन या कमी तंतूमय जातींची लागवड करावी.
  •  सुप्तावस्थेनंतर अंकुरण न झालेल्या क्षेत्रामधील आले बियाणाची निवड करावी.
  • एक एकरासाठी १० ते १२ क्विंटल बियाणे लागते.
  • लागवड १० जूनपर्यंत पूर्ण करावी.
  • बेणे निवड 

  • एक महिना साठवणूक केलेल्या बियाण्यातून प्रत्यक्ष लागवडीकरीता ३ ते ४ डोळे अंकुरलेले आणि ३५ ते ५० ग्रॅम वजनाचे तुकडे मोडून बियाणे लागवडीपूर्वी दोन दिवस अगोदर तयार करावे.
  • लागवडीपूर्वी एक दिवस अगोदर रासायनिक बेणेप्रक्रिया करावी. बेणे प्रक्रियेसाठी २०० लिटर पाण्यात २०० ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि २५० मिलि क्विनॉलफॉस मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बियाणे २० मिनिटे बुडवावे. त्यानंतर सावलीत सुकवावे. (ॲग्रेस्को शिफारस)
  • दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष लागवडीपूर्वी २ तास अगोदर बेण्याला जैविक प्रक्रिया करावी. यासाठी २०० लिटर पाण्यात १ किलो गूळ विरघळून घ्यावा. त्यामध्ये ट्रायकोडर्मा प्लस १ किलो, ॲझोटोबॅक्टर १ किलो आणि १ किलो पीएसबी मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बेणे अर्धा तास बुडवून त्यानंतर लागवड पूर्ण करावी. (ॲग्रेस्को शिफारस)
  • लागवड तंत्र  लागवड करण्यापूर्वी १ ते २ दिवस अगोदर गादी वाफा ठिबक सिंचनाने वाफसा येईपर्यंत भिजवून घ्यावा. वाफश्यावर लागवड करावी. लागवड करताना बेणे ४ फूट गादीवाफ्यावर लॅटरलच्या दोन्ही बाजूस ६ बाय ९ इंच अंतरावर ५ सेंमी खोलीवर डोळे तिरकस दिशेने राहील अशा पद्धतीने लावावे.त्यावर हाताने माती टाकावी. पाणी व्यवस्थापन 

  • जमीन हलकी असेल तर ३० सेंमी अंतरावर आणि जमीन मध्यम ते भारी असेल तर ४० सेंमी अंतरावर ४ लिटर डिस्चार्ज असलेले इनलाईन ड्रिपर निवडावेत.
  • गादीवाफ्याची लांबी १५० ते २०० फूट असेल तर १६ एमएम व्यासाची लॅटरल आणि वाफ्याची लांबी २०० फूट पेक्षा जास्त असेल तर २० एमएम व्यासाची लॅटरल निवडावी.
  • लागवड १५ मे ३० मे दरम्यान होणार असेल तर ठिबक सिंचनाबरोबरच सूक्ष्म तुषार सिंचन संच सुरवातीला दुपारी १२ ते ४ या वेळेत सुरू ठेवावा. म्हणजे शेतामधील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. उगवण लवकर होते.जूनमध्ये पाऊस सुरू झाल्या नंतर सूक्ष्म तुषार सिंचन संच काढून ठेवावा.
  • संपर्क ः अंकुश सोनावले,९४२०४८६५८७ (लेखक नागठाणे,जि.सातारा येथे कृषी सहाय्यक आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com