थायलंडची टोलेजंग कोंबडी

थायलंडमधील लामफांग राज्यात कोंबडा हे राजकीय चिन्ह आहे. कोंबड्यांच्या पुतळ्यांनी सर्व बागा भरल्या आहेतच, पण मंदिराबाहेरही हे कोंबडे हमखास उभे असतात. खाण्यामध्ये चिकनला प्राधान्य असल्याने इथं पोल्ट्री उद्योग फोफावला आहे.
थायलंडमधील लोकांचं कोंबडी प्रेम केवळ खाण्यापुरते नाही, तर इतिहासापर्यंत मुरलेले आहे.
थायलंडमधील लोकांचं कोंबडी प्रेम केवळ खाण्यापुरते नाही, तर इतिहासापर्यंत मुरलेले आहे.

थायलंडमधील लामफांग राज्यात कोंबडा हे राजकीय चिन्ह आहे. कोंबड्यांच्या पुतळ्यांनी सर्व बागा भरल्या आहेतच, पण मंदिराबाहेरही हे कोंबडे हमखास उभे असतात. खाण्यामध्ये चिकनला प्राधान्य असल्याने इथं पोल्ट्री उद्योग फोफावला आहे. त्यातील ६०-७० टक्के चिकन स्थानिक पातळीवरच फस्त होतं. उर्वरित ३०-४० टक्के निर्यातीतून परकीय चलन येतं. रवर उंच इमारत दिसतेय. आजूबाजूच्या घरांच्या मानाने ती सोनेरी पांढरी इमारत बरीच उंच आहे. जरा जवळ गेल्यावर तिचा विचित्र आकार नजरेत भरला. तो चक्क कोंबड्याचा भला मोठा पुतळा होता. मोठा म्हणजे किती मोठा असावा? ४-५ मजली इमारतीएवढा उंच. या महाकाय पक्ष्याला ‘कोंबडीच्या’ अशी शिवी घालायची हिंमत कोणी करणार नाही. इतर पक्ष्यांसारखं आकाशात उंच उडू न शकणाऱ्या पक्ष्याचा आकाशाशी स्पर्धा करणारा पुतळा उभारणाऱ्या बुटक्या चणीच्या थाई लोकांचं नवल वाटलं. थायलंडमध्ये  जागोजागी कोंबड्याचे पुतळे दिसतात. मंदिराच्या बाहेर तर हमखास असतात. आयुथयात तर संपूर्ण बगीचाभर ते पसरलेत. सध्या मी लामफांग राज्यातून प्रवास करतोय आणि कोंबडा हे इथलं राजकीय चिन्ह आहे. त्यामुळे आपल्या राजकीय चिन्हाचे पुतळे त्यांनी सर्वत्र लावलेत. पण यापेक्षाही वेगळा इतिहास या पुतळ्यामागे आहे. थायलंडमध्ये कोंबड्यांच्या झुंजी प्रसिद्ध आहेत. खासकरून ग्रामीण भागात त्यांचं प्रमाण जास्त आहे. जसा प्राचीन भारतात युधिष्ठिराने जुगार खेळला होता, तसाच थायलंडच्या इतिहासात आयुथयाच्या (म्हणजे अयोध्या) नरेशन राजाने बर्माच्या राजाबरोबर कोंबड्याच्या झुंजीवर जुगार खेळल्याची कथा प्रचलित आहे. नरेशन राजा बर्माच्या तुरुंगात होता. तेव्हा त्याने येथील चॅम्पियनला कोंबड्यांच्या झुंजीत हरवलं. बर्माच्या राजाने दिलेलं विजेत्याचं बक्षीस नाकारत त्याने ‘माझ्या देशाला स्वातंत्र्य दे!’ अशी निडर मागणी केली.  थायलंडमध्ये कोंबडीचा संदर्भ एका वेगळ्या ठिकाणी येतो. इथं कोंबडखताचा तुरुंग देखील आहे. डोक्यात कोंबडगोंधळ उडालाय ना? सांगतो ! १८९३ मध्ये थायलंडवर फ्रान्सचा कब्जा होता. त्यांनी ‘चंताबुरी’ प्रभागात एक १३ फूट लांब आणि २३ फूट उंच तुरुंग बांधला. त्याचं नाव होतं ‘लायेम सिंग’ म्हणजे ‘कोंबडीच्या विष्ठेचा तुरुंग’. तुरुंगाच्या तळमजल्यावर कैद्याला कोंडायचे आणि वरच्या भागात कोंबड्या पाळायच्या. तळमजल्याचे छत जाळीदार असल्याने वरच्या मजल्यावरील कोंबड्यांची विष्ठा सरळ खालच्या कैद्यांवर पडे.  कोंबडखतात नत्राचं प्रमाण बक्कळ असतं. ओलावा मिळाल्यावर त्याचं रूपांतर अमोनियात होतं. त्याला एक उग्र व विषारी वास असतो. खालचा कैदी वासानेच अर्धमेला होत असे. एकदा या कोंबडीच्या जेलची अमोनियायुक्त हवा खाल्ल्यावर कैदी गुन्हा करायचं सोडाच, पण आयुष्यात कोंबडीलाही हात लावत नसेल.  ९४.५ टक्के लोक बौद्ध (बुद्धिष्ट?) असलेल्या या देशात ९६ टक्क्यांपेक्षाही जास्त लोक मांसाहारी आहेत. चिकन, मटण, पोर्क, मासे, समुद्री अन्न यांसारख्या ‘वशाट’ अन्नाला इथं मोठी मागणी आहे. देशातील एकूण उत्पादनांपैकी ६०-७० टक्के चिकन, स्थानिक लोक फस्त करतात. उरलेलं ३०-४० टक्के निर्यात होतं. चिकनला इथं जरा जास्त मागणी आहे, कारण ते पोर्क आणि बीफपेक्षा स्वस्त पडतं. थाई माणसे मांसाहार अंमळ जास्त करतात. आपल्यासारखं ‘संडे टू संडे’ मटण त्यांच्याकडे नसत. अगदी रोज चिकन-मटणावर ते हात मारतात. थाई माणसाच्या किरकोळ अंगकाठीवर जाऊ नका. हा इवलासा जीव वर्षाकाठी दरडोई २९ किलो चिकन फस्त करतो. म्हणजे चार लोकांच्या चौरस थाई कुटुंबात महिन्याकाठी जवळपास १० किलो चिकनचं आधण शिजतं.   सध्याच्या कोविड १९ परिस्थितीत या पोल्ट्री व्यावसायिकांचं कसं काय चाललंय, हे समजून घेण्यासाठी काही ओळखीच्या लोकांना संपर्क साधला. शासनाचे आकडे तपासले. त्यातून कळलं की येथील पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात रोडावलीय. पर्यायाने स्थानिक बाजारपेठेतील मागणी बरीच कमी झालीय. पण थोड्याफार प्रमाणात वाढलेल्या निर्यातीने या बेसहारा व्यवसायाला जरासा सहारा दिलाय. स्थानिक बाजार घटल्याने चिकनचा साठा वाढला आहे. मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाल्यामुळे, भरवशाच्या पार्टीने पाठिंबा काढलेल्या सरकारसारखे चिकनचे भाव कोसळले आहेत. कोंबड्याच्या पुतळ्याबरोबर व्हिडिओ, फोटो काढण्याचे कोंबडचाळे आम्ही आटोपले. पोटातील कावळे आता कोंबड्याची मागणी करू लागले. पण या महाकाय कोंबडीचा पुतळा पाहूनच माझा पुतळा झाला होता. रिस्क न घेता पोटातलं संभाव्य पक्षिसंमेलन टाळून, आज मी शाकाहारी खाण्याचा मानस जाहीर केला आणि बुलेटला किक मारली. ‘‘बरं झालं तू शाकाहारी होण्याचा निर्णय घेतलास, नाहीतर आज तुझी खैर नव्हती,’’ असं म्हणत त्या ‘बहुमजली कोंबडीच्याने’ माझ्याकडे खुन्नसभरा कटाक्ष टाकला. चिकन पुराण  थायलंडमधून जवळपास ९ लाख टन चिकन निर्यात होतं. शिजवलेलं, कच्चं आणि कोंबडीचा पंजा या स्वरूपात ही निर्यात असते. शिजवलेल्या चिकनमध्ये ५० टक्के जपान, ३९ टक्के युरोपिय युनियन आणि ५ टक्के दक्षिण कोरियाला निर्यात होतं. थायलंडचं कच्चं चिकन ३९ टक्के जपान, २५ टक्के चीन आणि १३ टक्के मलेशियाच्या किचनमध्ये पोहोचतं. वर्षाला १८ लाख टन ब्रॉयलर चिकनचं थायलंडमध्ये उत्पादन होतं. इथला शेतकरी आधुनिक पद्धतीने कोंबडीपालन करतो. मोठमोठाले पोल्ट्रीफार्म देशभर पसरलेत. पोल्ट्री फार्म्समध्ये योग्य काळजी घेतल्याने सुदैवाने बर्ड फ्लूसारख्या रोगांपासून थाई कोंबडी वाचलीय. जवळपास सर्वच पोल्ट्रीत बाष्पीभवनावर आधारित कूलिंग यंत्रणा लावल्या आहेत. परिणामी, रोग आणि पक्ष्यांची मर दोन्हीही लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत. थायलंडच्या पोल्ट्री व्यावसायिकांना सरकारचा खंबीर पाठिंबा आहे. आपल्या देशातील पोल्ट्री उत्पादकांना फायदा मिळावा म्हणून बाहेरच्या देशातून कोणतं चिकन आयात करावं, याबाबत शासन चौकस असतं. अमेरिकेसारख्या दादा देशातील चिकन उत्पादनावर चक्क आयातबंदी आहे. याचबरोबर गोठविलेल्या आणि शिजविलेल्या चिकनच्या उत्पादनावर भरभक्कम ३० टक्के आयातकर आकारला जातो. मात्र या व्यवसायात काही अडचणीही आहेत. वाढता उत्पादनखर्च ही पोल्ट्री व्यावसायिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरतेय. कोंबडीच्या खाद्यात मक्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. थायलंडच्या मका उत्पादकांना दिलेला हमीभाव आणि मका आयातीवरील मर्यादा, कोंबडीच्या जिवावर उठल्यायेत. एकूण उत्पादनखर्चाच्या ६०-७० टक्के कोंबडीच्या दाणापाण्यावर खर्च होतात. सध्या भारतातही तीच गत आहे. प्रत्येक पक्ष्यागणिक तोटा वाढतोय. चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला खातेय! कोंबडीच्या पोषणासाठीच्या मक्यामुळे नफा मात्र कुपोषित होतोय. प्रोटिनचा हा धंदा तोट्याकडे निघालाय, असं वाटायला लागलंय.  अजून एक समस्या डोकं काढतेय. मक्यावर फवारलेली कीटकनाशके कोंबडीच्या खाद्यातून चिकनमध्ये पोहोचताहेत. कोंबडीच्या शरीरावर वाढणाऱ्या परजीवी किडींच्या नियंत्रणासाठीही रासायनिक घटक वापरले जाताहेत. भविष्यात या रसायनांना जैविक पर्याय निर्माण व्हावेत आणि चिकनला बसलेला हा ‘रासायनिक तडका’ कमी व्हावा, ही आशा.  - डॉ. सतीलाल पाटील, ९९२२४५९७८४ (लेखक हे ग्रीन-व्हिजन लाइफ सायन्सेस  प्रा. ली. कंपनीचे संचालक आणि ‘ड्रीमर अँड डुअर्स’ पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com