काजू बोंडापासून प्रक्रियायुक्त पदार्थ

​महाराष्ट्रात विशेषतः कोकणात काजूपासून बी व काजू टरफलापासून तेल काढणे असे प्रक्रिया उद्योग सुरू असले तरी सुमारे ९० टक्के काजूची बोंडे फेकून दिली जातात. वाया जाणाऱ्या काजू बोंडापासून सिरप, नेक्टर, जॅम, चटणी, कॅन्डी, सरबत, स्कॅश, टॉफी, काजू फेनी, लोनचे, बार, बर्फी, पावडर असे अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करणे शक्य आहे.
 juice and jam made from cashew bond
juice and jam made from cashew bond

महाराष्ट्रात विशेषतः कोकणात काजूपासून बी व काजू टरफलापासून तेल काढणे असे प्रक्रिया उद्योग सुरू असले तरी सुमारे ९० टक्के काजूची बोंडे फेकून दिली जातात. वाया जाणाऱ्या काजू बोंडापासून सिरप, नेक्टर, जॅम, चटणी, कॅन्डी, सरबत, स्कॅश, टॉफी, काजू फेनी, लोनचे, बार, बर्फी, पावडर असे अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करणे शक्य आहे. काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. महाराष्ट्र शासनाच्या फळबाग लागवड योजनेमुळे काजू पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात काजूपासून बी व काजू टरफलापासून तेल काढणे असे प्रक्रिया उद्योग सुरू असले तरी सुमारे ९० टक्के काजूची बोंडे फेकून दिली जातात. काजू बोंडामध्ये पाणी ८७.९ टक्के, प्रथिने ०.२ टक्के, स्निग्ध पदार्थ ०.१ टक्के, पिष्टमय पदार्थ ११.६ टक्के, व क जीवनसत्च २६८ मिलिग्रॅम प्रति १०० ग्रॅम फळात असते. शिवाय कॅल्शियम फॉस्फरस व लोह इ. खनिजद्रव्ये थोड़या प्रमाणात असतात. वाया जाणाऱ्या काजू बोंडापासून सिरप, नेक्टर, जॅम, चटणी, कॅन्डी, सरबत, स्कॅश, टॉफी, काजू फेनी, लोनचे, बार, बर्फी, पावडर असे अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करणे शक्य आहे.

काजूगर निर्मिती काजू बीवर प्रक्रिया करून पिवळसर पांढऱ्या रंगाचे काजूगर मिळतात. मार्च ते मे या कालावधीत उपलब्ध होणाऱ्या काजूवर वर्षभर प्रक्रियेसाठी काजू बिया वाळवून योग्य प्रकारे साठवणे गरजेचे असते. बियांपासून काजूगर मिळविण्यासाठी त्या वाफाळणे, थंड करणे, विशिष्ट कटरचा वापर करून त्यावरील टरफल वेगळे करणे. काजूगरावरील साल (टेस्टा) काढण्यासाठी नियंत्रित तापमान ठेवून वाळविणे, विशिष्ट धारदार संयंत्र वापरून टेस्टा बाजूला करणे, प्रतवारी, योग्य आर्द्रता राखण्यासाठी कंडिशनिंग करणे या प्रक्रियांचा समावेश होतो. पॅकींगसाठी निर्वात पोकळी व नायट्रोजन फ्लशिंग पद्धतीचा वापर करावा.

काजू बोंडापासून प्रक्रियायुक्त पदार्थ सरबत

  • काजू बोंडापासून पेय तयार करण्यासाठी चांगली पक्व, कीडविरहित व ताजी बोंडे निवड़ावीत. निवडलेली काजू बोंडे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. ही बोंडे मलमलच्या कापडात बांधून २ टक्के (२० ग्रॅम मीठ प्रतिलिटर पाणी) मिठाच्या द्रावणात १० ते १५ मिनिटे शिजवून घ्यावीत. सर्व काजू बोंडे मिठाच्या द्रावणातून बाहेर काढून स्वच्छ पाण्यात थंड होण्यासाठी ठेवावीत. थंड झाल्यावर बोंडातील रुस बास्केट प्रेसच्या सहाय्याने काढून घ्यावे. काढलेला ५०० ग्रॅम काजू बोंडाचा रस हा ३ ते ४ तास मोठ्या स्टीलच्या पातेल्यात तसाच ठेवावा. त्यामुळे रसातील जड कण पातेल्याच्या तळाशी बसतील.
  • पातेल्यातील वरचा रस दुसऱ्या पातेल्यात मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा. या गाळलेल्या रसात साखर १५० ग्रॅम, सायट्रिक आम्ल २ ते ३ ग्रॅम, पाणी ३५० मि.ली. हे सर्व घटक चांगले मिसळून मिश्रण पुन्हा मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. नंतर १० मिनिटे मिश्रण गरम करून ३ ग्रॅम पोटॅशियम मेटाबायसल्फाईड त्यात मिसळावे. ते गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीत भरावे. नंतर बाटल्या त्वरित बंद करून बाटल्या उकळत्या पाण्यात ३० मिनिटे बुडवून ठेवाव्यात. बाटल्या थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात.
  • सिरप  काजू बोंडापासून रस काढून घ्यावा. १ किलो रसासाठी २ किलो साखर व ३० ग्रॅम सायट्रिक आम्ल एकत्र मिसळून साखर विरघळेपर्यंत गरम करावे. मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. नंतर त्यामध्ये सोडियम बेंझोऐट हे परिरक्षक ७१० मिलिग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात मिसळावे. अशा प्रकारे तयार केलेला सिरप निर्जंतुक केलेल्या बाटलीत भरावा. नंतर बाटल्यांना झाकण लावून हवाबंद कराव्यात. बाटल्या थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात. काजू सिरपमध्ये त्याच्या चार पट या प्रमाणात पाणी मिसळून काजू सरबत तयार करून आस्वाद घ्यावा.

    स्कॅश

  • काजू बोंडापासून स्कॅश तयार करण्यासाठी दिल्याप्रमाणे काजू बोंडापासून रस काढून घ्यावा. १ किलो काजू स्कॅश तयार करण्यासाठी ३०० ग्रॅम काजू बोंडाचा रस, ४०० ग्रॅम साखर, ७५ ग्रॅम सायट्रीक आम्ल व ३५० मि.ली. पाणी एकत्र मिसळून मलमलच्या कापडातून पुन्हा गाळून घेऊन १० मिनिटे गरम करावे. गरम असतानाच त्यात ७५० मिलिग्रॅम पोटॅशियम मेटाबायसल्फाईड हे परिरक्षक मिसळावे.
  • तयार झालेला स्क्वॅश निर्जंतूक केलेल्या काचेच्या बाटल्यात भरून हवाबंद करून लेबल लावून थंड किंवा कोरडया जागेवर साठवून ठेवावे. काजू स्क्वॅशपासून सरबत तयार करताना त्यामध्ये दोन ते तीन पट पाणी टाकून थंड करून पिण्यासाठी वापरतात.
  • चटणी चटणी तयार करण्यासाठी प्रथम काजू बोंडाच्या १ किलो गरामध्ये १ किलो साखर व ६० ग्रॅम मीठ मिसळून एकत्र ठेवावे. त्यानंतर वेलची १५ ग्रॅम, दालचिनी २० ग्रॅम, लाल मिरची पूड २० ग्रॅम, आले १५ ग्रॅम, बारीक चिरलेला कांदा ५० ग्रॅम व लसूण २० ग्रॅम हे सर्व मसाले एकत्र बारीक करून ते मलमलच्या कापडात बांधून पुरचुंडी तयार करून ती उकळत ठेवलेल्या मिश्रणात सोडावी. मिश्रण जॅमप्रमाणे घट्ट झाल्यावर ती पुरचुंडी काढून घ्यावी. त्यात ८० मि.ली. व्हिनेगार व २५० मिलिग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात सोडियम बेंझोऐट हे परिरक्षक मिसळावे. थोडा वेळ उकळून घ्यावे. अशाप्रकारे तयार केलेली चटणी गरम असतानाच निर्जतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांत भरुन त्यावर पातळ मेणाचा थर द्यावा. बाटल्यांना झाकणे लावून त्या थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात.

    जॅम

  • काजू बोंडापासून जॅम तयार करण्यासाठी काजू बोंडापासून लगदा करून घ्यावा. काजू बोंडापासून जॅम तयार करण्यासाठी सर्वप्रथम चांगली, पक्व, कीडविरहित व ताजी बोंडे निवडावीत. निवडलेली काजू बोंडे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. धुतलेली सर्व काजू बोंडे मलमलच्या कापडात बांधून २ टक्के (२० ग्रॅम मीठ प्रतिलिटर पाणी) मिठाच्या द्रावणात १० ते १५ मिनिटे शिजवून घ्यावीत. सर्व काजू बोंडे मिठाच्या द्रावणातून बाहेर काढून स्वच्छ पाण्याने ३ ते ४ वेळा धुवून घ्यावीत. स्टेनलेस स्टील कटरच्या सहाय्याने बोंडाचा बीकडील भाग कापून घ्यावा.
  • कापलेली सर्व फळांचा मिक्सरमध्ये चांगला लगदा करावा. या लगद्यामध्ये एकास एक या प्रमाणात साखर मिसळून घट्ट होईपर्यंत मिश्रण चांगले उकळावे. मिश्रणाचा टिएसएस ६८.५ टक्के इतका आल्यास जॅम तयार झाला असे समजावे. जॅम थोडा थंड झाल्यावर निर्जंतुक केलेल्या काचेच्या बरण्यांमध्ये भरावा. बरणीवर थोडे पॅराफिन वॅक्स ओतावे. अशा रितीने उत्तम प्रतीचा टिकाऊ जॅम तयार होतो. बरण्या थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात, त्यामुळे जॅम चांगला रहातो.
  • संपर्क- सचिन शेळके, ८८८८९९२५२२ (आचार्य पदवी विद्यार्थी, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, सॅम हिग्गिनबॉटम कृषि, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज, उत्तरप्रदेश)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com