पास्ता, शेवया, कुरडयासाठी गव्हाचे नवे वाण विकसित 

कुंदेवाडी (ता.निफाड) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्राने पास्ता, शेवया व कुरड्यासाठी प्रक्रियायोग्य असा 'बन्सी' प्रकारातील 'एनआयडीडब्ल्यू-११४९' हा नवा गहू वाण विकसित केला आहे.
पास्ता, शेवया, कुरडयासाठी गव्हाचे नवे वाण विकसित 
पास्ता, शेवया, कुरडयासाठी गव्हाचे नवे वाण विकसित 

नाशिक : राज्यात रब्बी हंगामात गहू हे प्रमुख पीक आहे. मात्र बदलते हवामान,सिंचनसुविधा व तांबेरा प्रादुर्भावामुळे कमी उत्पादन या प्रमुख अडचणी आजवर राहिल्या आहेत. यावर सातत्याने अभ्यास करून कुंदेवाडी (ता.निफाड) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्राने अधिक उत्पादकता व तांबेरा प्रतिबंधक वाण विकसित केले आहेत. यामध्ये राज्यातील मागणी अभ्यासून पास्ता, शेवया व कुरड्यासाठी प्रक्रियायोग्य असा 'बन्सी' प्रकारातील 'एनआयडीडब्ल्यू-११४९' हा नवा गहू वाण विकसित केला आहे.पुढील वर्षापासून त्याचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. 

अखिल भारतीय समन्वित गहू सुधार प्रकल्पाच्या अनेक चाचण्या येथील कृषी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर सुरू असतात.त्याच अनुषंगाने २४ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या यासंबंधी वार्षिक बैठकीत'एनआयडीडब्ल्यू ११४९' या 'बन्सी' प्रकारातील वाणाची भारतातील द्वीपकल्पीय विभागासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यासाठी नियंत्रित पाण्याखाली लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. हा वाण पास्ता,शेवया,कुरडया आदींसाठी उपयुक्त असल्याचे परिणाम तपासून याबाबत घोषणा करण्यात आली आहे.केंद्रीय पीक वाण प्रसार समितीने त्यावर शिक्कामोर्तब केले असून तो प्रसारित केला जाणार आहे. 

पुढील वर्षीपासून कृषी संशोधन केंद्र निफाड यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी बीजोत्पादन घेऊन बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याकामी केंद्राचे प्रमुख व  गहू विशेषज्ञ डॉ.सुरेश दोडके, गहू पैदासकार डॉ.उदय काचोळे,गहू पैदास विभागाचे साहाय्यक प्राध्यापक  डॉ. नीलेश मगर,कनिष्ठ गहू रोग शास्त्रज्ञ डॉ.भानुदास गमे, मृदविज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ.योगेश पाटील,कीटक शास्त्र सहायक प्राध्यापक प्रा.भालचंद्र म्हस्के, कवकशास्त्रज्ञ डॉ.बबनराव इल्हे यांच्या टीमने ही कामगिरी केली  आहे. यापूर्वी प्रक्रिया योग्य बिस्कीट उद्योगासाठी 'फुले सात्त्विक' हा वाण दिला आहे.  ठळक वैशिष्टे: 

  • द्वीपकल्पीय विभागातील जिरायती किंवा एका ओलिताखाली (एक पाणी पेरणीनंतर ४२ दिवसांनी) वेळेवर पेरणीसाठी शिफारसीत 'बन्सी' वाण 
  • तांबेरा रोगास प्रतिकारक 
  • प्रथिनांचे प्रमाण ११.५० टक्के 
  • शेवया, कुरडया व पास्ता यासाठी उत्तम 
  • पक्व होण्याचा कालावधी ११०-११५ दिवस 
  • उत्पादनक्षमता ३५ ते ४० क्विंटल/हेक्टरी (एका ओलिताखाली) 
  • प्रतिक्रिया:  महाराष्ट्रात प्रामुख्याने बन्सी/बक्षी प्रकारातील वाण अस्तित्वात वा उपलब्ध आहेत. त्यास कुरडया,पास्ता,शेवई व नूडल्स निर्मितीसाठी मोठी मागणी असते. हीच बाजू अभ्यासून जुन्या वाणांचे संवर्धन यासह निर्यातक्षम मागणी असलेल्या बाबीचा विचार करून उत्पादकता असलेला वाण विकसित केला आहे. त्याचा गहू उत्पादकांना फायदा होणार आहे. पुढील वर्षी त्याचे बियाणे उपलब्ध होणार आहे.  -डॉ. सुरेश दोडके, गहू विशेषज्ञ, कृषी संशोधन केंद्र, कुंदेवाडी, ता.निफाड, जि.नाशिक.   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com