
अॅग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर ः उजनी धरणाच्या (Ujani Dam) पाणलोट क्षेत्रात पुन्हा पाऊस (Rain) झाल्याने धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. परिणामी, शंभर टक्क्यांवर स्थिर राहिलेली उजनी धरणाची पाणी पातळी आता पुन्हा वाढू लागली आहे. मंगळवारी (ता. ६) धरणामध्ये ११० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा पोहोचला. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती टळण्यासाठी आता धरणातूनही पुढे भीमा नदीसह मुख्य कालवा, वीजनिर्मितीला पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
यंदा पावसाने उशिरा, पण दमदार हजेरी लावल्याने वेळे आधीच उजनी धरणाने शंभर टक्क्यांची पातळी गाठली. त्यामुळे धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतीसह पिण्याच्या पाणी योजनांचा प्रश्न सुटला. त्यामुळे सोलापूरकरांना दिलासा मिळाला. त्यानंतर गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून धरणातील पाणीपातळी शंभर टक्क्यांवर स्थिर होती. पुणे जिल्ह्यात काही भागांत पुन्हा पाऊस झाल्याने उजनी धरणाकडे पाणी सोडण्यात येत आहे.
मंगळवारी (ता. ६) दौंडकडून उजनी धरणाकडे ६४५८ क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत होते. पाण्याचा विसर्ग तुलनेने कमी असला, तरी अखंडपणे विसर्ग सुरू असल्याने पाणीपातळीत मात्र झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी धरणात एकूण पाणीपातळी ४९७.२७० मीटरपर्यंत होती. तर एकूण पाणीसाठा १२२.५४ टीएमसी एवढा होता. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा ५८.८८ टीएमसी इतका होता. तर या पाण्याची टक्केवारी १०९.९१ टक्के इतकी होती. पाण्याच्या या वाढत्या विसर्गामुळे सोलापूर जिल्ह्यात नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती उद्भवू नये, यासाठी आता उजनीतूनही पुढे भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे.
वीजनिर्मितीसाठी सोडले पाणी
उजनी धरणातील पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सध्या भीमा नदीत १० हजार क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे. त्याशिवाय मुख्य कालव्यात ११०० क्युसेक, वीजनिर्मितीसाठी १६०० क्युसेक, सीना-माढा योजनेसाठी २९६ क्युसेक, दहिगाव योजनेसाठी ६३ क्युसेक आणि बोगद्यासाठी ६०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.