‘अॅग्रोवन’चा वर्धापन दिन राज्यभर अमाप उत्साहात
पुणे - गावशिवारातील यशोगाथांपासून ते जागतिक स्तरावरील कृषिविषयक ज्ञान-तंत्रज्ञानाची वैविध्यपूर्ण माहिती कष्टकरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या ‘सकाळ- अॅग्रोवन’चा १७ वा वर्धापन दिन राज्यभर अमाप उत्साहात बुधवारी (ता.२०) साजरा झाला. देशातील एकमेव कृषी दैनिक ठरलेल्या आपल्या लाडक्या सोबत्याला शुभेच्छा देण्यासाठी राज्यात झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये शेतकरी, शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी, कृषी उद्योग व निविष्ठा क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. दुसऱ्या बाजूला समाज माध्यमांवरदेखील ‘अॅग्रोवन’वर शुभेच्छांचा वर्षाव झाला. वर्धापन दिनाच्या निमित्ताने दोन स्वतंत्र विशेषांकांचा नजराणा सादर होत असून, त्यातील पहिला विशेषांक ‘भरडधान्य’ या विषयावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
देशातील कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ ठरलेल्या ‘ॲग्रोवन’ने दिमाखदारपणे अठराव्या वर्षात पदार्पण केले आहे. ‘बळिराजाचा सच्चा सोबती असलेल्या ‘अॅग्रोवन’ची सतत भरभराट होत राहो,’ अशा मनःपूर्वक शुभेच्छा गावशिवारातील शेतकरी देत होते. सकाळपासून सुरू झालेल्या शुभेच्छा संदेशांमध्ये शेती क्षेत्रातील संस्था, संघटना, कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच सरपंचांचा समावेश होता. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही वाचकांनी भल्या सकाळी आपल्या शेतावर जाऊन विशेषांकासह ‘सेल्फी’ काढल्या. विविध जिल्ह्यांमध्ये कृषी तंत्रज्ञान चर्चासत्रे घेण्यात आली. महिला शेतकरी, युवक तसेच प्रयोगशील शेतकरी यात सहभागी झाले होते. ‘भरडधान्य’ विशेषांकाचे गावागावत जोरदार स्वागत वाचकांनी केले. मंगरुळपीर (जि. वाशीम) येथे गेल्या काही वर्षांपासून ‘अॅग्रोवन कट्टा’ हा उपक्रम शेतकरी चालवतात. या कट्ट्यावर विशेषांकाचे वाचन करीत ‘अॅग्रोवन’चा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला.
शेतकऱ्यांच्या जाहिरातीद्वारे ‘अॅग्रोवन’ला शुभेच्छा
औरंगाबादच्या देवगावचे (ता. पैठण) शेतकरी दीपक जोशी यांनी ‘अॅग्रोवन’ला शुभेच्छा देण्याचा संकल्प शेतकरी वाचकांसमोर ठेवला. त्याला ६२ शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे वर्गणी जमा करून ‘अॅग्रोवन’च्या मराठवाडा आवृत्तीला शुभेच्छा जाहिरात दिली. याबाबत श्री. जोशी म्हणाले, “दोन जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी एकत्र येत ऐच्छिक वर्गणी गोळा केली. त्यातून आम्ही ‘अॅग्रोवन’ला जाहिरातीच्या रूपाने शुभेच्छा संदेश दिला आहे. पहिल्या अंकापासून ‘अॅग्रोवन’ सतत आमच्यासाठी लढतो आहे. आम्हाला होत असलेल्या लाभाच्या मोबदल्यात या दैनिकाने कधीही अपेक्षा ठेवली नाही. त्यामुळेच हा उपक्रम आम्ही राबवला.”
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.