दुष्काळी मजले एकीतून झाले बागायती

कायम दुष्काळी असलेले मजलेगावचे चित्र पालटवण्यास येथील ग्रामस्थांची एकी यशस्वी झाली. जलसंधारणाच्या कामांमधून दोनशे एकर बागायती क्षेत्र ६०० एकरांवर पोचले. उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले.
जलसंधारणाच्या कामामुळे जानेवारीत तुडुंब भरलेल्या विहीरी
जलसंधारणाच्या कामामुळे जानेवारीत तुडुंब भरलेल्या विहीरी

कायम दुष्काळी असलेले मजले (ता. हातकणंगले. जि. कोल्हापूर) या आपल्या गावचे चित्र पालटवण्यास येथील ग्रामस्थांची एकी यशस्वी झाली. श्रमदानाला त्यांनी सर्वाधिक प्राधान्य दिले. त्यातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांमधून दोनशे एकर बागायती क्षेत्र ६०० एकरांवर पोचले. उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले. कौलारू घरांच्या जागी सिमेंटची आकर्षक घरे उभी राहिली.   कोल्हापूर -सांगली महामार्गावर हातकणंगले तालुका ठिकाणापासून तीन किलोमीटरवर मजले गाव आहे. जिल्हा बागायती पट्ट्यात येत असला तरी काही गावे आजही दुष्काळी पट्ट्यात आहेत. जवळपास नदी नसल्याने पिण्याच्या पाण्याचीही भ्रांत आहे. लहान गाव असल्याने राजकीय इच्छाशक्तीही कमी पडते. मजले हे त्यापैकीच साडेतीन हजार लोकसंख्येचे छोटेखानी गाव आहे. शेजारी डोंगर, माळरानाच्या जमिनी व पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकणारे ग्रामस्थ हे गावचे नेहमीचे चित्र. पंचकल्याण पूजेने केले ‘प्रेरित‘ सर्वधर्म समभाव जपणाऱ्या मजले गावात सन २०१८ मध्ये जैन समाजाची पंचकल्याण महापूजा झाली. आठ दिवस चाललेल्या या सोहळ्याच्या निमित्ताने सर्व धर्मांचे लोक एकत्र आले. याच वेळी जलसंधारण कामांची बीजे पेरली गेली. याच एकोप्याचा वापर करून गावातील पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याचे एकमताने ठरले. यातून जलमित्र फौंडेशनची स्थापना झाली. ग्रामपंचायतीने मोठे सहकार्य केले. यामुळे कामाच्या ताकदीची मोळी आणखी घट्ट झाली. अठरा फेब्रुवारी, २०१८ मध्ये गावात शिवारफेरी काढून जागृती करण्यात आली. चळवळीस प्रारंभ झाला भेटींद्वारे बनला आराखडा जलसंधारणाच्या कामात राज्यभर लौकिक मिळविलेला हिवरे बाजार गावाला (जि. नगर) भेट देऊन मजले ग्रामस्थांनी तेथील परिस्थिती व संकल्पना समजावून घेतली. पाणी फाउंडेशन संस्थेद्वारे पहिला क्रमांक मिळविलेल्या वेळू गावाचाही दौरा केला. त्यातून आपल्या कामांची दिशा पक्की झाली. युवकांनी तांत्रिक आराखडा तयार करायचा. त्यासाठी आर्थिक मंजुरी मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यायचा असे नियोजनबद्ध प्रयत्न सुरू झाले. श्रमदानाचा आदर्श गावाजवळच्या डोंगरात छोटे बांध घालण्यास प्रारंभ झाला. प्रत्येक ग्रामस्थ आपल्या वेळेत येऊन श्रमदान करू लागला. राबणाऱ्या हातांसाठी चहा- नाष्टा अशी सेवा प्रत्येक घरातून झाली. गावांसाठी राबणारे गावचेच हात प्रत्येकाला प्रेरित करत होते. यातून एकोपा अजून वाढला. कामांची व्याप्तीही वाढू लागली. एक मे २०१९ ला महाश्रमदान झाले. यात गावाबाहेरील राजकीय व्यक्ती, खासगी कंपन्या, सरकारी अधिकारी अशा एक हजाराहून अधिक हातांनी गावच्या एकीला सलाम केला. श्रमदानात योगदान दिले. पाणीदार गाव करण्याची चळवळ बळकट झाली. बघता बघता साठ लाख रुपयांहून अधिक निधी विविध लोकप्रतिनिधी संस्थांच्या प्रयत्नाने संकलित झाला. त्यातून कामांना गती आली. असे पालटले चित्र गावात दोन खासगी पाणीपुरवठा संस्था आहेत. यातून दोनशे एकर क्षेत्र बागायती झाले होते. गावासाठी शासकीय अशी पिण्यासाठी अथवा शेतीसाठीच्या पाण्याची योजना नव्हती. यामुळे शेतीसाठी तर सोडाच पण पिण्याच्या पाण्याचेही वांधे होते. गावात चारशे कुटुंबे आहेत. यापैकी तीनशेहून अधिक कुटुंबांनी कूपनलिका खोदल्या आहेत. पण पाणी नसल्याने त्यांना वणवण फिरावे लागायचे. जलसंधारणाची कामे झाल्यानंतर गेल्या वर्षीपासून अनपेक्षितपणे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. याचा फायदा विहिरी व कूपनलिकांना झाला. डिसेंबरनंतर कोरड्या होणाऱ्या विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या. कूपनलिकांना पाणी आल्याने पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न मिटला. पिकांत विविधता केवळ जिरायती पिके घेणारे गाव ऊस, केळी, हळदीसारखी नगदी पिके घेऊ लागले. विशेष म्हणजे गावातील सुमारे पंचवीस टक्के ग्रामस्थ मजुरी सोडून पुन्हा शेतीकडे वळले ही सर्वांत मोठी उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल. सध्या शिवारात सुमारे चारशे एकरांवर ऊस, एकशे पंचवीस एकरांवर केळी, तीस एकरांवर हळद तर शंभर एकरांवर अन्य पिके डोलत आहेत. बागायती क्षेत्र ६०० एकरांवर पोचले आहे. उत्पन्नाचे स्रोत तयार झाल्याने कौलारू घरांची जागा सिमेंटच्या घरांनी घेतली आहे. गावातून फिरताना एकेकाळी हे गाव कोरडवाहू होते हे सांगूनही विश्‍वास बसणार नाही अशी स्थिती आहे. झालेली कामे

  • तलावाचे खोलीकरण. माती पुनर्भरण, आच्छादन
  • तलाव एक- ४०, ७५२ घनमीटर
  • तलाव दोन १३, ८७५ घमी
  • तीन वनतळी 
  • डीप सीसीटी- ५ किलोमीटर
  • सीसीटी -५ किमी.
  • वृक्षारोपण- ८००० झाडे 
  • छोटे माती बंधारे ४
  • नवे चर- २ किलोमीटर
  • प्रतिक्रिया माझी केवळ दोन एकर शेती बागायत होती. जलसंधारणाच्या कामांनंतर विहिरी व कूपनलिकांना पाणी आल्याने बागायती क्षेत्र वाढविणे शक्य झाले. सध्या आठ एकर क्षेत्रात बागायती पिके आहेत. यामध्ये ऊस, केळी, हळद आदींचा समावेश आहे. दोन लाखांपर्यंत असलेले वार्षिक उत्पन्न पंधरा लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे. -अविनाश पाटील ९८५०५५७७५३ पूर्वी पावसाच्या पाण्यावर समाधान मानायला लागायचे. पाण्याचा शाश्‍वत स्रोत निर्माण झाल्याने यंदापासून बागायती पिके घेत आहे. दोन एकरांत सेंद्रिय हळद घेतली आहे. हा अनुभव आनंददायी आहे. -अशोक पाटील ९२२५६२८०९६ जलसंधारणासाठी झटणाऱ्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतीने कोणताही किंतू न ठेवता मदत केली. तांत्रिक मंजुरी घेणे, आर्थिक मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेतला. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध संस्थांनीही आपुलकीने आम्हाला मदत केली. दुष्काळी गावची ओळख आम्ही पुसून काढली याचा अभिमान आहे. -सिकंदर कोठावळे, सरपंच ८०५५५२३७३७ पूर्वी सेंट्रिंग कामावर मजुरीसाठी जायचो. आता केवळ शेती करू लागलो आहे. भाजीपाला पिके घेतली आहेत. शेतातच वास्तव्य केले आहे. अजित जाधव

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com