गाजराचे गाव म्हणून कवलापूरची ओळख

कवलापूर (जि. सांगली) गावातील शेतकऱ्यांनी वाडवडिलांपासून गाजर पिकवण्याची परंपरा कायम ठेवली आहे. कमी कालावधीत ताजे व चांगले उत्पादन व उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकऱ्यांनी त्यास पसंती दिली आहे. मकर संक्रांतीच्या काळात गाजराला मोठी असते. त्यादृष्टीनेही गावातील अर्थकारणास चालना मिळते.
कवलापूर गावातील गाजर शेती व दर्जेदार उत्पादन.
कवलापूर गावातील गाजर शेती व दर्जेदार उत्पादन.
Published on
Updated on

कवलापूर (जि. सांगली) गावातील शेतकऱ्यांनी वाडवडिलांपासून गाजर पिकवण्याची परंपरा कायम ठेवली आहे. कमी कालावधीत ताजे व चांगले उत्पादन व उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकऱ्यांनी त्यास पसंती दिली आहे. मकर संक्रांतीच्या काळात गाजराला मोठी असते. त्यादृष्टीनेही गावातील अर्थकारणास चालना मिळते.   सांगली जिल्ह्यात सांगली-तासगाव राज्य मार्गावर कवलापूर हे गाव द्राक्ष आणि ऊस या पिकांसाठी प्रसिद्ध आहे. दोन्ही नगदी पिके असल्याने त्यांचा उत्पादन खर्चही जास्त असतो. उत्पन्नासाठी किमान वर्षभर वाट पाहावी लागते. त्यातही द्राक्ष हे हवामानाला संवेदनशील असल्याने त्यात जोखीमही मोठी असते. त्यातूनही अलीकडील काळात या भागात द्राक्षाची लागवड वाढली आहे. तरीही इथल्या शेतकऱ्यांनी गाजर हे आपले पारंपरिक पीक टिकवून धरले आहे. इथला शेतकरी एक एकरापासून ते वीस एकरांच्या पुढेही गाजराची लागवड करतो. त्याचे कारण म्हणजे कमी मुदतीत म्हणजे साडेतीन महिन्याच्या काळात हे पीक चांगले व ताजे उत्पन्न मिळवून देते. दीर्घ मुदतीच्या अन्य पिकांना चांगला आर्थिक आधार देते. अशी होते गाजराची शेती कवलापूर गावाला गाजर पिकाची परंपरा शतकाहून अधिक वर्षांची असल्याचे शेतकरी सांगतात. प्रामुख्याने पारंपरिक वाणाचाच वापर होतो. गावातील जमिनी थोड्या खारवट, काळ्या चिकट आहेत. अशा जमिनीत गाजराची गोडी चांगली उतरते. गावात सुमारे ४० टक्क्यांहून अधिक शेतकरी या पिकात गुंतले आहेत. गावचे एकूण क्षेत्र सुमारे २५०० ते २६०० हेक्टर क्षेत्र आहे. पैकी ३०० ते ३५० हेक्टर किंवा त्याहून कमी-जास्त प्रमाणात गाजराची शेती होत असावी. लागवडीचा कालावधी सप्टेंबरच्या दरम्यान सुरू होतो. गावशिवारात बहुतांशी शेतकरी गाजराची काढणी करण्यात व्यस्त असलेले चित्र डिसेंबरपासून पाहण्यास मिळते. गाजरे धुण्यासाठी यंत्राचा वापर होतो. त्यासाठी दररोज १५० ते २०० मजुरांना काम मिळते. परराज्यांतूनही मजूर कामास येतात. शंभरहून अधिक टेम्पोतून गाजरे विक्रीस जातात. यंदा सप्टेंबरच्या दरम्यान लागवड झाली. त्या दरम्यान पोषक वातावरण होते. यामुळे उत्पादन चांगले आणि दरही अपेक्षित मिळतील अशी आशा होती. मात्र ऐन वाढीच्या काळात व पुढे डिसेंबरमध्येही पाऊस झाला. शेतात पाणी साचले. त्याचा परिणाम झाला. त्यामुळे काही प्रमाणात गाजराचा दर्जा कमी झाला. बियाण्याची विक्री शेतकऱ्यांना बियाणे दर वर्षी विकत आणावे लागत नाही. स्थानिक कवलापूर नावाने ते बियाणे परिसरात प्रसिद्ध आहे. त्याची विक्री प्रामुख्याने सोलापूर, विजापूर, संकेश्‍वर या ठिकाणी होते. त्यास प्रति किलो २०० रुपयांपासून ते ३५० रुपयांपर्यंत दर मिळतो. संक्रातीस मोठी मागणी संक्रातीला कवलापूरच्या गाजरांना अधिक मागणी असते. साहजिकच या काळात दरही अधिक मिळतो. संक्रांतीच्या दोन महिने आधी व पुढे एक महिना असे त्याचे ‘मार्केट’ राहते. गावातील बबन गावडे सांगतात, की आमच्या गावची जमीन गाजरास पोषक आहे. आजोबांच्या काळापासून आम्ही या शेतीत आहोत. त्या वेळी क्षेत्र कमी होते. हळूहळू त्यात वाढ झाली. बाजारपेठा वाढल्या. माझी गाजराची दोन एकर शेती आहे. परिसरातील काही शेतकऱ्यांची शेती मक्त्याने घेऊनही गाजर पिकवले जाते. त्यादृष्टीने दरवर्षी क्षेत्र चाळीस एकरांवर असते. गाजराचे क्षेत्र खंडाने घेण्याची पंरपरा पहिल्यापासूनच आहे. हंगामात तीन ते पाच पाणी देणे गरजेचे असते. अन्य निविष्ठांचा वापर व खर्च त्या मानाने कमी असतो. बांधावरच बाजारपेठ एकरी उत्पादन १५ ते २५ टनांपर्यंत मिळते. एकरी खर्च सुमारे २० ते २५ हजार रुपये होतो. गावात गाजराची शेती मोठ्या प्रमाणात असल्याचा व एकाच ठिकाणी माल उपलब्ध होण्याचा फायदा व्यापाऱ्यांनाही होतो. शेतकऱ्यांनाही जागेवर मार्केट मिळते. त्यामुळे वाहतुकीच्या खर्चात बचत होते. बांधावर रोखीने पैसे मिळतात. कोल्हापूर, पंढरपूर, पुणे, सोलापूर, सातारा, कऱ्हाड, तसेच कर्नाटक राज्यातील बेळगाव, संकेश्‍वर, रायबाग आदी ठिकाणी या गाजरांना बाजारपेठ उपलब्ध आहे. २५ व ५० किलोच्या गोणीतून गाजरे पाठवली जातात. प्रति किलो ३० ते ४० रुपये दर मिळतो. प्रतिक्रिया गाजराच्या शेतीचे धडे वडिलांकडूनच मिळाले. गाजर पिकवण्याबरोबर बियाणेही करतो. त्यातून अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध केला आहे. प्रवीण मुळे, ९९७५४९४४९३

मकर संक्रांत आणि गाजर मकर संक्रांत व शेतीचे व त्यातही गाजराचे वेगळे महत्त्व आहे. जीवनात सुख, संपत्ती, धन-धान्याची कमतरता पडू नये म्हणून तीळ-गूळ, ऊस, गाजर, गव्हाच्या लोंब्या, हरभऱ्याचे दाणे, बोर असे शेतीतील उत्पादन एकत्र करून त्यांची या सणाला पूजा केली जाते. त्यामुळे या दिवशी गाजराला बाजारपेठेत मागणी राहते. मकर संक्रातीनिमित्ताने कवलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्‍वराला गाजराची पूजा बांधण्यात येते. सुमारे तीन ते साडेतीन महिन्यांत गाजरातून एकरी सरासरी पन्नास हजार ते त्यापुढे उत्पन्न मिळू शकते. कवलापूर गावातील क्षेत्र एक हजार एकरांपर्यंत धरले, तरी गावात गाजरातून काही लाख रुपयांची उलाढाल निश्‍चित होते. यातून मिळणाऱ्या नफ्यातून शेतकऱ्यांना पुढील पिकांसाठी तसेच अवजारांसाठी भांडवल उपलब्ध होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com