शेती, शिक्षण अन ग्रामविकासामध्ये दिशादर्शक

रोजगार हमी योजनेतून स्थानिकांना रोजगार
रोजगार हमी योजनेतून स्थानिकांना रोजगार

समानता, स्वातंत्र्य आणि सहानुभूतीमुळेच व्यक्तीचा विकास होतो या विचाराने प्रेरित होऊन १९८७ मध्ये कोंडी (जि. भंडारा) गावातील युवकांनी ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ या संस्थेची स्थापना केली. भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये संस्थेने महिला सक्षमीकरण, पर्यावरण व्यवस्थापन, मानवाधिकार व सामाजिक न्याय आणि शेती, ग्राम विकास क्षेत्रात दिशादर्शक काम केले आहे.

ग्रामीण भागात सामाजिक बदलात महत्त्वाचे योगदान देण्यासाठी चोवीस युवक एकत्रीत आले. या युवकांनी ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाच्या माध्यमातून युवक, महिला, शेतमजूर, लहान शेतकरी व वंचित समाजाचे प्रश्न डोळ्यापुढे ठेवून काम सुरू केले. बचत गट चळवळ, शेतकरी विकास मंच, आदिवासी विकास मंच, शिक्षण हक्क चळवळ, जैवविविधता संरक्षण मंच, महिला विकास मंच स्थापन करून पूर्व विदर्भातील जिल्ह्यामध्ये व्यापक प्रश्नांना दिशा देण्यात संस्था यशस्वी झाली आहे. बचत गट चळवळ   भंडारा, गोंदिया जिल्ह्यात महिलांना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सशक्त करून संघटित क्रयशक्ती वाढविण्यासाठी बचत गटांना सुरुवात झाली. २००२ ते २०१० मध्ये रमाई सक्षमीकरण योजना आणि स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेअंतर्गत दोन्ही जिल्ह्यांतील १० तालुक्यांमधील ३१७ गावात ८५६ बचत गटाची स्थापना होऊन १२,४८९ महिला सहभागी झाल्या. त्यांची बँकेत पत वाढली. दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, पशूपालन, मसाला उद्योग, कृषिपूरक व्यवसाय, झेरॉक्स, किराणा असे सेवा व्यवसाय सुरू झाले. त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली. 

  • पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांतील वीस तालुक्यांमध्ये अत्याचार जागृती अभियानास सुरुवात. यामध्ये शारीरिक, मानसिक व सामाजिक अत्याचारांची उकल करण्यासाठी प्रशिक्षणे, जनजागृती, माहिती. चित्रफितीच्या माध्यमातून प्रबोधन.
  • विधवा, निराधार, घटस्फोटीत महिलांकरिता ‘एकल महिला संघटन’ जिल्हा स्तरावर स्थापन.
  • परसबागा उपक्रम   संस्थेने २०१७ ते २०१९ मध्ये भंडारा जिल्ह्यातील गोलेवाडी, चिखल पहेला, सोनेगाव व एटेवाही गावात ३२५ महिला व युवकांची आरोग्य तपासणी केली. लोकांच्या आहारात पुरेसा भाजीपाला उपलब्ध होण्यासाठी परसबागेत रानभाज्या तसेच विविध भाजीपाला लागवडीचा उपक्रम सुरू केला. सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी तालुक्यातील १८८ महिलांनी परसबागा तयार केल्या. काही महिला भाजीपाल्याची विक्री बाजारपेठेत करतात.  ग्रामीण आरोग्य सुधारणा   राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर लोक आधारीत देखरेख व नियोजन प्रक्रिया राबविण्यात आली. तुमसर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, गोबरवाही, लेंडेझरी व चुल्हाड अंतर्गत ४१ गावे आणि लाखनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, सालेभाटा, पिंपळगाव, मुरमाडी (तुपकर) यांच्या कार्यक्षेत्रातील ४५ गावांमध्ये आरोग्य सेवांचे मूल्यांकन करण्यात आले. यातून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालयामधून चांगल्या सेवा लोकांना मिळू लागल्या आहेत.  गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर  

  • आदिवासीबहुल क्षेत्रामध्ये शासकीय प्राथमिक शिक्षण व्यवस्था आणि परिस्थितीचा अभ्यास करून संस्थेने वीस गावांच्यामध्ये गुणवत्ता शिक्षण केंद्राची स्थापना केली. पहिली ते पाचवीमधील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्याची ओढ, आनंददायी शिक्षण, भाषा, गणित व निसर्ग अभ्यास सोप्या पद्धतीने शिकविण्याकरिता गावातील दहावी, बारावी शिकलेल्या युवकांना जयपूर येथे एक महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले. ही मुले शालेय विद्यार्थ्यांना सकाळी शाळेच्या अगोदर दोन तास आणि सायंकाळी शाळा सुटल्यानंतर दोन तास शिकवितात.  
  • मुलांना चांगला पोषण आहार  मिळावा, शिक्षणाची ओढ निर्माण करण्याकरिता हंगामी वसतीगृहाची स्थापना करण्यात आली. याचा ३०० विद्यार्थ्यांना लाभ मिळाला. मुलांची भाषा, गणिताच्या पाया मजबूत होऊन पुढे शिक्षणाची गुणवत्ता सुधारली. यामध्ये सातत्य राहण्यासाठी तुमसर तालुक्यात शिक्षण हक्क जागृती अभियान सुरू करण्यात आले. प्रत्येक गावात शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करून त्यांना प्रशिक्षित करण्यात आले. बारा गावात शाळा विकास आराखडा लोकसहभागातून तयार करण्यात आला. यामुळे शाळांमध्ये सुधारणा झाली. तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्तादेखील वाढली.  
  • सेंद्रिय शेती उपक्रम 

  •   संस्थेने रासायनिक शेती व सेंद्रिय शेतीचा तुलनात्मक अभ्यास भंडारा, गोंदिया जिल्ह्यात केला. या माध्यमातून विविध पिकांतील जैवविविधतेचा विषय समोर आला. संस्थेने स्थानिक बियाणांच्या संशोधनावर भर दिला. संस्थेने तुमसर तालुक्यातील २० गावांमध्ये १७०० शेतकऱ्यांसोबत २,५०० एकरासाठी सेंद्रिय शेती प्रमाणपत्र मिळवून दिले. 
  •   कृषी विभागाच्या सेंद्रिय शेती योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील पाच गावात १०० हेक्‍टर जमिनीवर १९९ शेतकऱ्यांसोबत सेंद्रिय शेतीचा प्रयोग तीन वर्षे राबविण्यात आला. भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व पवनी तालुक्यांमध्ये सुद्धा ३०० हेक्‍टरवर सेंद्रिय शेतीला सुरुवात झाली. शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. कृषी विभागाने संस्थेला जिल्हास्तरावर नियोजन व मूल्यमापन प्रक्रियेत सहभागी करून घेतले आहे.
  • ‘एसआरआय'पद्धतीने लागवड

  • संस्थेने २०१२ ते २०१५ या कालावधीमध्ये भंडारा, गोंदिया जिल्ह्याच्या आठ तालुक्यांतील ६५ गावात शेतकऱ्यांना सघन भात उत्पादन पद्धतीचे प्रशिक्षण दिले. या तंत्रज्ञानामुळे प्रचलित पद्धतीपेक्षा उत्पादनात वाढ झाली. हे लक्षात घेऊन शासनाने सदर प्रकल्पाची प्रात्यक्षिके सुरू केली. शासकीय योजनेमध्ये या पद्धतीचा समावेश करण्यात आला. 
  • लुप्त होणाऱ्या भाताच्या प्रजातीचे संकलन करून त्याचा पुनर्वापर व संवर्धनास सुरुवात.
  • पारंपरिक जातींचे संवर्धन 

  • भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये ६ तालुक्यांतील ६४ गावांमध्ये २०१४ ते २०१८ मध्ये १,११८ शेतकऱ्यांसोबत २२९ एकरांमध्ये ‘महाराष्ट्र जनुक कोष’ कार्यक्रमांतर्गत शेती पीक जाती विविधता संवर्धन आणि संरक्षणाचे कार्य सुरू झाले.
  • भाताच्या पारंपरिक ३२ जाती, बारा कडधान्ये, पाच तेलवर्गीय पिके, बारा मसालावर्गीय पिके व चार धागावर्गीय पिकांच्या जातींचे संवर्धन सुरू. 
  • शेतकऱ्यांनी पारंपरिक जातींचे शास्त्रशुद्ध पद्धतीने बीजोत्पादन सुरू केले. तीन जिल्ह्यात पारंपरिक बियाणे कोष निर्मिती. ३६ ग्राम जैवविविधता व्यवस्थापन समितीचे सबलीकरण करून चार ठिकाणी जैवविविधता रजिस्टर निर्मिती. 
  • वनउपज, बौद्धिक संपदा जागृती     भंडारा, गोंदिया जिल्ह्यात मोह, पळस फूल, रानभाज्या, वेगवेगळ्या ऋतूमध्ये उपलब्ध होणारी फळा-फुलांची लोकांमध्ये जागृती होण्याकरिता पळस फुलापासून चहा, सरबत, रंग तसेच फुलांपासून सरबत, चटणी विविध व्यंजने, रानमेवा तयार करण्याच्या पद्धती महिलांना शिकवण्यात आल्या. नैसर्गिक संसाधने व ग्रामीण बौद्धिक संपदा जागृती अभियानामध्ये संस्थेने भंडारा,चंद्रपूर जिल्ह्यातील गावात विविध उपक्रम राबविले आहेत.

    रोजगार हमीची अंमलबजावणी रोजगार हमी योजनेची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी संस्थेने २०१५ ते २०१७ पर्यंत भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील ७५ गावांमध्ये ‘दुष्काळ निवारण सहाय्य प्रकल्प’ राबवविला. यामध्ये ग्रामपातळीवर वार्षिक नियोजन, जॉब कार्ड नोंदणी, काम मागणी पत्रके भरणे, शासन पातळीवर समन्वय, मजुरांना कायद्याची जागृती व हक्काबद्दल संघटन बांधणी, योजनेच्या मिळणाऱ्या सोयी सुविधांचे मूल्यांकन वेळेत केल्याने २,२४८३ मजुरांना रोजगार मिळाला. यामुळे १३ तलाव, ३२ विहिरी, ४ छोटे बंधारे, ३ मोठे बंधारे, ३ बोड्या, १ रस्ता, ४० पांदण रस्ते, ३९ नाला सरळीकरण, १ विहिरीचे पुनर्भरण, २० तलावाचे खोलीकरण, २ रोपवाटिका दुरुस्ती, ८ भातखाचरे, ६८ घरकुल, १ मैदान समतलीकरण, ९ गावात वृक्ष लागवड, २ मोहरी बांधकाम, कच्च्या नाल्या अशी कामे झाली.  पाणलोट विकासात भूमिका भंडारा जिल्ह्यांमध्ये वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेअंतर्गत संस्थेची जिल्हा संशोधन संस्था म्हणून निवड झाली. संस्थेने सरपंच, पाणलोट सचिव, संस्था संचालक, तालुका पातळीवरील अधिकारी व कर्मचारी यांना वेगवेगळ्या टप्प्यावर प्रशिक्षण दिले. परिणामी पाणलोट विकास कामांची प्रभावी अंमलबजावणी झाली. शुद्ध पाण्याची उपलब्धता पाणी प्रदूषणामुळे आरोग्यावर परिणाम होतो. यावर मात करण्यासाठी संस्थेने लाखणी, सेंदुरवाफा मुरमाडी, राजेगाव, पिंपळगाव, सडक, केसलवाडा, वाघाये, पोहरा, धर्मपुरी, पालांदूर व पिंडकेपार या गावांमध्ये आय जल केंद्राच्या माध्यमातून शुद्ध पाणी उपलब्धतेची व्यवस्था उभी केली आहे. 

    आदिवासींसाठी वाडी प्रकल्प तुमसर तालुक्यातील आदिवासीबहुल दहा गावांमधील लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत होतात. कारण त्यांच्याकडे लहान लागवड क्षेत्र आहे. गावात रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी ‘नाबार्ड’ द्वारे आदिवासी विकास फंड (वाडी) प्रकल्प २०१३ ते २०१८ पर्यंत राबविण्यात आला. प्रकल्पामध्ये फळबाग, मिश्र पिके, पीक नियोजन, व्यवस्थापन पाणलोट विकास असे उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये ३५० आदिवासी शेतकरी व ५० भूमिहीन कुटुंबांचा समावेश आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना गावातच रोजगाराची संधी तयार झाली. भूमिहीन कुटुंबांना गावरान कोंबडीपालन, बेरारी शेळीपालनाचे प्रशिक्षण दिल्याने गावामध्येच उपजीविकेचे साधन तयार झाले. त्यामुळे स्थलांतर थांबण्यास मदत मिळाली.

    - ०७१८४-२५६९८४ (लेखक ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com