द्राक्षबागेत नवीन फुटी वेगाने वाढण्याची समस्या

सध्याच्या स्थितीमध्ये द्राक्षबागेत पावसाळी वातावरण दिसून येते. पाऊस जरी संपला नसला तरी वातावरणात जास्त आर्द्रता व त्यानंतर झालेली पानगळ या गोष्टी पाहता द्राक्षबागेमध्ये नवीन फुटी वाढून विपरीत परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसून येते. त्याचे नियोजन कसे करावे, याची माहिती या लेखातून घेऊ.
 द्राक्षबागेत नवीन फुटी वेगाने वाढण्याची समस्या
द्राक्षबागेत नवीन फुटी वेगाने वाढण्याची समस्या

सध्याच्या स्थितीमध्ये द्राक्षबागेत पावसाळी वातावरण दिसून येते. पाऊस जरी संपला नसला तरी वातावरणात जास्त आर्द्रता व त्यानंतर झालेली पानगळ या गोष्टी पाहता द्राक्षबागेमध्ये नवीन फुटी वाढून विपरीत परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसून येते. त्याचे नियोजन कसे करावे, याची माहिती या लेखातून घेऊ. बऱ्याच बागेत या पूर्वी झालेल्या पावसामुळे व त्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव यामुळे पानगळ झाली. आता शेंड्याकडील वाढ सुरू असून, त्या फुटीवरही रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येतो. त्याला कारण म्हणजे काडीच्या खालील बाजूला असलेली रोगग्रस्त पाने होत. बऱ्याच बागेत फळछाटणीला उशीर असल्यामुळे शेंड्याकडील फुटी काढून टाकण्याचा बागायतदारांचा प्रयत्न असतो. परंतू, असे केल्यास शेंड्याकडील फूट पूर्ण काढून टाकली तरी मागील डोळे कापसतात. फुटी फुटण्यास सुरुवात होते. अशा स्थितीत छाटणी लवकर घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. जर छाटणीस उशीर आहे, अशा स्थितीत शेंड्याकडील फूट पूर्णपणे कमी न करता अर्धी फूट काढून घ्यावी. त्या शेजारी असलेल्या बगलफुटीवर फक्त टिकली मारावी. असे केल्यास नवीन फुटीची वाढ व काडीवर उपलब्ध असलेला जुना डोळा यामध्ये संतुलन निर्माण करता येईल. दुसऱ्या परिस्थितीमध्ये बागेत मागील रोगग्रस्त पाने गळून पडली. शेंड्याकडे फूट सुरू झाल्यामुळे काडीची परिपक्वता थांबली. ज्या बागेत काडी परिपक्व होणे गरजेचे आहे. त्याकरिता वेलीस पुरेसा वेळ मिळणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. या फुटीवरील नवीन पाने हिरवीगार, ताजी व अन्नद्रव्यांनी परिपूर्ण दिसतील. या पानांची वाढ होण्याकरिता लागलेले अन्नद्रव्य त्याच काडीमधून घेतले गेले आहे. ही नवीन पाने वाढण्याकरिता जोमाने अन्नद्रव्यांचे शोषण पाने व काडीतून करून घेते. त्यामुळे काडीवर उरलेली जुन्या पानांवर अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येईल. या अन्नद्रव्यांपैकी पालाश हे महत्त्वाचे अन्नद्रव्य कमी असल्याचे दिसेल. ही कमतरता पानांच्या वाट्या झालेल्या लक्षणावरून कळून येईल. याकरिता बागेत पालाशची उपलब्धता एसओपी (०-०-५०) स्वरूपात करता येईल. सध्या बागेत पाऊस नसला तरी पाण्याची उपलब्धता ही फक्त खताच्या वापरापुरतीच मर्यादित करावी. यामुळे पुन्हा निघणारी नवी फूट टाळता येईल. तिसऱ्या परिस्थितीत बागेत काडीवर पाने असून, निघालेल्या फुटीवर मुख्यतः फेरस व मॅग्नेशिअमची कमतरता जास्त प्रमाणात दिसून येते. या स्थितीत जुन्या काडीवरील पाने जळाली नसल्यामुळे डोळा सुप्तावस्थेत आहे. हा डोळा काही दिवस तसाच टिकवून ठेवण्याकरिता शेंड्याकडील फूट थोड्याफार प्रमाणात (पाच ते सहा पाने) वाढवून शेंडा पिंचिंग करावे. त्यासोबत बोर्डो मिश्रण एक टक्के या प्रमाणे आठ ते दहा दिवसाच्या अंतराने दोनवेळा फवारणी करावी. असे केल्यास शेंड्याकडे निघालेल्या कोवळ्या फुटीवर स्कॉर्चिंग येईल व ती पाने पूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत राहणार नाही. या स्थितीचा फायदा घेऊन आपल्याला काडी परिपक्व करून घेता येईल. त्याच सोबत फळछाटणीकरिता वेळ मिळेल. फळछाटणीपूर्वी कोणत्याही बागेतील काडी पूर्ण परिपक्व असणे गरजेचे असेल. ही परिपक्वता पडताळून पाहण्याकरिता सबकेनच्या एक डोळा खाली काप घ्यावा. सरळ काडी असलेल्या परिस्थितीत पाच ते सहा डोळ्यांच्या मध्ये काप घ्यावा. जर या काडीमधील पीथ तपकिरी रंगाचा असल्यास काडी पूर्ण परिपक्व झाल्याचे समजावे. काडीतील पीथ जर दुधाळ रंगाचा असल्यास काडीची परिपक्वता करून घेणे महत्त्वाचे असेल. त्यासाठी बागेत पालाशची उपलब्धता ०-०-५० हे पाच ग्रॅम किंवा ०-४०-३७ हे अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे तीन चार फवारणीद्वारे करावी. यासोबत जमिनीतून उपलब्धता करायची झाल्यास अडीच ते तीन किलो प्रति एकरी या प्रमाणे ठिबकद्वारे द्यावे.

जास्त पानगळ झालेल्या बागेत डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव दिसून येईल. डाऊनीच्या नियंत्रणासाठी पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस अॅसीड ४ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर पाणी (टॅंक मिक्स) यांची फवारणी घ्यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com