शाश्वतता, जागतिक दर्जा, विस्तारीकरण उद्योगात यशासाठी महत्त्वाचे ः प्रमोद चौधरी

‘ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स ॲवॉर्ड’ने २७ कृषी उद्योजकांचा सन्मान
‘ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स ॲवॉर्ड’ने २७ कृषी उद्योजकांचा सन्मान
Published on
Updated on

पुणे ः कोणताही उद्योग शाश्वत असायला हवा, तुमची उत्पादने जागतिक दर्जाची असली पाहिजेत, त्याचबरोबर उत्पादनांच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी उद्योगाचे विस्तारीकरण महत्त्वाचे आहे, अशी यशाची त्रिसूत्री प्रसिद्ध उद्योजक आणि प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी राज्यातील कृषी उद्योजकांना सांगितली. निमित्त होते ‘सकाळ ॲग्रोवन' तर्फे आयोजित बिझनेस एक्सलन्स ॲवॉर्डस वितरण सोहळ्याचे!         

पुण्यात झालेल्या रंगतदार सोहळ्यात व्यासपीठावर प्रमुख पाहुणे प्रमोद चौधरी, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, ‘ॲग्रोवन'चे संपादक आदिनाथ चव्हाण उपस्थित होते. बियाणे, खते, कीटकनाशके, जैविक उत्पादने, सूक्ष्म सिंचन, प्रक्रिया, शेती यांत्रिकीकरण, रोपवाटिका, सेंद्रिय उत्पादने, वित्तपुरवठा, जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजकांना श्री. चौधरी यांच्या हस्ते टाळ्यांच्या कडकडाटात ‘ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स अॅवॉर्ड’ बहाल करण्यात आले.  

या वेळी श्री. चौधरी म्हणाले, ‘‘उद्योजकांना विविध अडचणींमुळे पहिल्या टप्प्यात उद्योगाचा विस्तार म्हणजे स्केल कमी ठेवावा लागतो. मात्र, उद्योगाला समृद्धी व स्थिरता देण्यासाठी विस्तारीकरण महत्त्वाचे आहे. जास्त ग्राहकांपर्यंत तुमचे दर्जेदार उत्पादन गेले पाहिजे. त्यासाठी थोडी तरी निर्यात करायला हवी. त्यातूनच उद्योगाची प्रगती होते.  आपल्या सीमा तोडून पुढे पाहत उद्योगाचा विस्तार करणे हे उद्योजकाचे कर्तव्यच आहे. मात्र, तुमचा उद्योग शाश्वतपणा, विस्तारीकरण आणि जागतिक श्रेणीचा अंगिकार करणारा असावा. शेतकरी व शेती उद्योजक हे एकाच गाडीचे दोन चाके आहेत. शेतीची प्रगती दोघांच्या परिश्रमातून होते आहे. शेतीच्या मूल्यसाखळीत तसेच पुरवठा साखळीत सुरू असलेल्या कामांमुळे उत्पादकता वाढते. त्यामुळे शेतकरी समृद्ध होतात आणि उद्योजकांनाही दोन पैसे मिळतात. त्यामुळे शेतीला हातभार लावणाऱ्या उद्योजकांचा हा सन्मान मला मोलाचा वाटतो.”

प्रक्रिया उद्योगावर कर नको ः पवार  श्री. पवार या वेळी म्हणाले की, “उद्योजकांना प्रेरणा मिळावी व त्यांचा उत्साह वाढावा हा उद्देश या पुरस्कार उपक्रमामागे आहे. कृषी उद्योजकांची शेतीमधील भूमिका मोलाची आहे. म्हणून कृषी उद्योजकांच्या अडचणी ‘ॲग्रोवन'च्या माध्यमातून आम्ही बेधडकपणे मांडल्या आहेत. माझ्या मते कृषी प्रक्रिया उद्योगावर कर लावू नयेत. कारण शेतीमालाचे काढणीपश्चात नुकसान टाळायचे असेल तर प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहनच द्यायला हवे.”

“समाजाच्या विविध घटकांना डोळ्यासमोर ठेवून ‘सकाळ'मध्ये सातत्याने विविध उपक्रम सुरू असतात. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही राज्य व केंद्र शासनाच्या मदतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत आहोत. शिवाय सहा महिन्यांत चार लाख ७५ हजार महिलांना ‘तनिष्कां'च्या माध्यमातून इंटरनेटचे प्रशिक्षण दिले गेले. महिला सुशिक्षित झाल्यास क्रांती होऊ शकते, यावर आमचा विश्वास आहे. ‘तनिष्कां'च्या सहभागामधूनच आम्ही ७५० गावांचा पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. सतत टीका करण्याऐवजी मदत सकारात्मक उभारणी करण्याकडे ‘सकाळ’चा कल आहे, असेही श्री. पवार यांनी सांगितले. 

ॲग्रोवन कृषी उद्योगांचेही व्यासपीठ  ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण प्रास्ताविकात म्हणाले की, “शेती क्षेत्रात काम करणाऱ्यांचा यथायोग्य सन्मान होत नव्हता. त्यामुळेच आम्ही शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान करण्यासाठी स्मार्ट अॅवॉर्डस उपक्रम सुरू केला. तसेच, कृषी उद्योगातील उद्योजकांसाठीही आता ‘ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स ॲवॉर्डस’ प्रथमच दिले जात आहेत. कृषी उद्योजकांच्या अडचणी ‘ॲग्रोवन’ने गेल्या वर्षभरात सतत मांडल्या. परराज्यांत उद्योगांना सुविधा आणि आपल्या राज्यात मात्र अडवणूक होत होती. त्यावर आम्ही संशोधन केले. कृषी खात्यामधील अडवणुकीविरोधात वृत्तमालिका सुरू केल्या. त्याचा लाभ कृषी उद्योजक व शेतकऱ्यांनाही होतो आहे. हे व्यासपीठ शेतकऱ्यांबरोबरच कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांचेही आहे.” मकरंद टिल्लू यांनी आपल्या खुमासदार निवेदनातून सोहळ्याला रंगत आणली.   शेती क्षेत्रातील कार्बन समस्या हाताळणे शक्य “शेतीमधील कार्बन समस्या आणि शाश्वतता याचा गांभीर्याने विचार झालेला नाही. कारण, कार्बनचे प्रदूषण सतत वाढते आहे. त्याचे रुपांतर पुढे घातक हरितगृह वायूमध्ये होते. त्यामुळे तापमानवाढ, दुष्काळ, महापूर, वादळे अशी स्थिती उद्भवत आहे. शेती व त्या आधारित उद्योगातून या समस्येशी कसा सामना करता येईल याचा विचार झाला पाहिजे. शेतीत कार्बनचे १०० युनिट घातले तर उत्सर्जनावाटे फक्त दहा युनिट बाहेर गेले पाहिजेत, अन्यथा ही संकटे वाढतात. या संकल्पनेचा अभ्यास शेतीत झालेला नाही. तज्ज्ञांनी त्याचा विचार करावा. जैवइंधनात आम्ही तो विचार करतो. जैवइंधनात कार्बन शोषले जातात. कृषी आधारित जैव इंधनाची उत्पादने पर्यावरणाचे संतुलन राखतात,” याकडेही श्री. चौधरी यांनी लक्ष वेधले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com