Lumpy Skin : यंदाच्या गळीत हंगामावर ‘लम्पी स्कीन’चे सावट

जनावरांच्या स्थलांतराचा प्रश्न; आजाराची दहशत कायम
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : यंदाच्या गळीत हंगामाला १५ दिवसांचा कालावधी उरला असतानाच या हंगामावर लम्पी स्कीन (Lumpy Skin) आजाराचे सावट आहे. पश्चिम महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यातील येणाऱ्या ऊसतोड (Sugarcane Harvesting) टोळ्या आणि त्यांच्या जनावरांच्या स्थलांतराचा (Migration of animals) प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या जनावारांच्या स्थलांतरास आणि विक्रीस बंदी असल्याने हंगामासाठी या ऊस तोड टोळ्या कशा येणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात सध्या लम्पी स्कीनचा प्रादूर्भाव आटोक्यात असल्याचा दावा करण्यात येत असला तरी त्याची दहशत कायम आहे. पशुसंवर्धन विभागानेही वेगाने लसीकरण सुरू केले आहे.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : बैलपोळ्यावर ‘लम्पी स्कीन’चे सावट

राज्यातील एक कोटी ३९ गोवंशाच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. यापैकी ४४ लाख, १२, ६७७ गोवंशांचे लसीकरण करण्यात आले आहे. सध्या राज्यात १४३६ जनावरे या रोगामुळे मृत झाली असल्याची सरकारी आकडेवारी सांगते. मात्र, प्रत्यक्षात आकडे जास्त आहेत. सध्या राज्यात ३९ हजार ३४१ जनावरे ‘लम्पी स्कीन’ने बाधित आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी विदर्भ आणि मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार येतात. यातील अनेक कामगार स्वत:च्या बैलगाड्या घेऊन येतात. तर मुकादमाकरवी ट्रॅक्टरमालकांसोबत कराराने आलेले असतात. संपूर्ण कुटुंबच स्थलांतरित होत असल्याने त्यांच्यासोबत गायी आणि बैल आणले जातात.
पशुसंवर्धन विभागाने २८ ऑगस्ट रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, जनावरांच्या स्थलांतरास, विक्री आणि वाहतुकीस बंदी आहे. मात्र, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत १५ ऑक्टोंबर रोजी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत लम्पी स्कीनबाबत चर्चा झाली. मात्र, हंगाम सुरू होईपर्यंत आजार आटोक्यात येईल, असे सहकार विभागाचे म्हणणे आहे. तसेच दिवाळी तोंडावर असल्याने हंगामासाठी मजूर येणार नाहीत. १ नोव्हेंबर नंतरच मजूर स्थलांतरित होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे याबाबत फारशा गांभीर्याने चर्चा करण्यात आली नाही.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : लम्पी स्कीन आजाराची नऊ तालुक्यांना मोठी झळ

पशुसंवर्धन विभागाने मात्र, या संभाव्य स्थलांतराची तयारी केली असून साखर आयुक्तालयाकडून साखर कारखान्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या जिल्ह्यातून बैलगाडी मालक येणार आहेत, तेथील पशुसंवर्धन उपायुक्तांना यादी पाठविण्यात आली आहे. ऊसतोड मजुरांसह स्थलांतरित होणाऱ्या गोवंशाचे लसीकरण करण्याबाबत सूचना करण्यात आली आहे.

२८ दिवसांचा कालावधी
जनावरांचे स्थलांतर अथवा वाहतूक करायची असेल तर जनावराच्या लसीकरणास किमान २८ दिवसांचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे. लम्पी चर्मरोगाची लागण झालेल्यांमध्ये अकोला आणि जळगाव जिल्हा आघाडीवर आहे. अकोला, जळगाव, बुलडाणा, अमरावती, नगर, सातरा, लातूर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, बीड, यवतमाळ नागपूर या जिल्ह्यांत सर्वाधिक तालुक्यांत लम्पी स्कीनचा प्रादूर्भाव आहे. लसीकरणाचा वेग असल्याने हा रोग आटोक्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे. लसीकरण केलेल्या जनावरांना टॅगिंक करण्यात येत असून त्यांची ओळख त्याद्वारे पटविण्यात येणार आहे.

धोरणात्मक निर्णयाची गरज
अनेक ठिकाणी जनावरांच्या बाजारास बंदी असून जनावरांची विक्री छुप्या पद्धतीने झाली. त्यामुळे लम्पी स्कीन पसरला. त्याचा मोठा फटका दुग्धव्यवसायाला बसला. त्यामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वी धोरणात्मक निर्णयाची गरज आहे.

‘लम्पी स्कीन’ची राज्यातील स्थिती
एकूण बाधित गावे : २०८३
बाधित जनावरे : ३९३४१
गंभीर आजारी जनावरे : ८०५
मृत जनावरे : १४३६
राज्यातील एकूण पशुधन (गोवंशीय) : एक कोटी, ३९ लाख

एकूण लसीकरण : ४४ लाख ,१२ हजार, ६७७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com