
जनावरांना आहार देताना तो संतुलित (Balance) असला पाहिजे. संतुलित आहार म्हणजे त्या आहारातून जनावरांच्या सर्व गरजा पूर्ण होतात. सर्वसाधारणपणे जनावरांच्या आहारात आपण ओला व कोरडा चारा आणि पशुखाद्याचा समावेश करत असतो. हिरवा चारा देत असताना त्यात एकदल आणि द्विदल असा दोन्ही प्रकारचा चारा असणे आवश्यक आहे. ल्युसर्न(lucerne), चवळी(cowpea), स्टायलो (stylo) ही द्विदल वर्गातील चारा पिके आहेत. द्विदल चारा अधिक पौष्टिक असतो. या चाऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाणही जास्त असते.
चवळी द्विदल वर्गातील पिक असल्यामुळे पिकाच्या मुळावर गाठी असतात. रायझोबियम जिवाणूंच्या गाठी हवेतील नत्र शोषून घेऊन जमिनीत साठवतात. चवळी पिकामध्ये नत्र स्थिरीकरणाचे प्रमाण हेक्टरी २५ ते ३० किलोपर्यंत असते. यामुळे जमिनीचा पोत व सुपीकता सुधारण्यास मदत होते. जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढीस लागते. लवकर वाढ होणारे चारा पिक म्हणून चवळीची लागवड केली जाते. सर्वसाधारणपणे कोणत्याही द्विदल चाऱ्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. चवळीसारख्या चाऱ्यापासून जनावरांना भरपूर प्रमाणात नत्र आणि स्फुरद मिळत असते. चवळीमध्ये प्रथिनांचे प्रमाण १३ ते १५ टक्क्याच्या जवळपास असते.
चवळीसाठी उष्ण व कोरडे हवामान गरजेचं असते. चवळीच्या उत्तम वाढीसाठी २५ ते ३७ अंश सेल्सिअस तापमान योग्य असते. काही वेळेस चवळी, मका किंवा ज्वारीबरोबर आंतरपीक म्हणूनही घेतले जाते.चांगल्या वाढीसाठी मध्यम ते भारी निचरा होणारी जमीन आवश्यक असते. खताचा योग्य प्रमाणात वापर केल्यास हलक्या जमिनीतही चवळीचे चांगले उत्पादन घेता येते.
पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० सेंटीमीटर ठेवावे. पेरणीपूर्वी बियाण्यास अॅझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. खरिपासाठी जून ते ऑगस्ट दरम्यान बियाण्याची पेरणी करावी. सुधारित वाणांमध्ये श्वेता, यु.पी.सी.९२०२, यू.पी.सी. ५२८६, बुंदेल लोबिया -१ व ईसी ४२१६ या वाणांचा वापर करावा.
चवळीचे चारा पिक म्हणून उत्पादन घेताना ४० किलो प्रती हेक्टरी बियाण्यांची गरज पडते. चाऱ्यासाठीची कापणी पिक ५० टक्के फुलोऱ्यात असताना केल्यास, सकस हिरवा चारा मिळतो. पेरणीनंतर ६० ते ७० दिवसांनी कापणी करावी. उत्तम व्यवस्थापनामध्ये हेक्टरी ३०० ते ३५० क्विंटल चाऱ्याचे उत्पादन मिळते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.