डॉ. व्ही. एस. धायगुडे, डॉ. बी. पी. कामडी
----------
Biosecurity Measures In Poultry : आजारी कोंबडी आणि निरोगी कोंबड्या एकाच शेडमध्ये असतील, तर प्रसार त्वरित होतो म्हणून आजारी कोंबड्या वेगळ्या ठेवाव्यात. काही विषाणूजन्य (Viral Diseases) आजारांवर उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे योग्य व्यवस्थापन करून संसर्ग थांबविणे अत्यंत महत्त्वाचा आहे.
कोंबड्या या इतर प्राण्यांच्या मानाने आजारांना लवकर बळी पडतात. सभोवतालच्या वातावरणात सदैव जिवाणू, बुरशी, विषाणूचे अस्तित्व असते. त्यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण मिळाल्यास त्यांचा प्रादुर्भाव सुरू होतो आणि कोंबड्यांमध्ये मरतुक (Mortality in Poultry) होऊन आर्थिक हानी होते. कोंबड्यांमध्ये निरनिराळ्या वयोगटांत निरनिराळ्या संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होतो.
प्रामुख्याने फुफ्फुसदाह, रक्ती हगवण, पुलोरम, अफलाटॉक्सिन, टायफॉइड, पॅराटायफॉइड, कॉलरा, श्वसनसंस्थेचे विकार, मानमोडी, इन्फेक्शियस ब्राँकायटिस, गंबारो, इन्फेक्शियस लँरिगोट्रॅकायटिस, देवी या आजारांचा प्रादुर्भाव कोंबड्यांमध्ये दिसतो. आजाराच्या प्रादुर्भावामुळे कोंबड्यामध्ये वजन घटणे, मृत्यू होतो. कोंबड्यांचे विविध आजारांपासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. काही विषाणूजन्य आजारांवर उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे योग्य व्यवस्थापन करून संसर्ग थांबविणे अत्यंत महत्त्वाचा आहे.
जैवसुरक्षा म्हणजे आजारास कारणीभूत असलेल्या विविध प्रकारच्या सूक्ष्मजीवांपासून कोंबड्यांची सुरक्षा. जैवसुरक्षेमध्ये कोंबड्यांच्या शेडची लोकवस्ती तसेच इतर पोल्ट्रीफार्मपासून दूर, उंचावर उभारणी करावी. जंगली पक्षी आणि इतर प्राण्यांना शेडच्या परिसरात येण्यास अटकाव करावा. शेडच्या भिंती तसेच जमिनीचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे. शेडच्या दरवाजाजवळ चप्पल, बुटांचे निर्जतुकीकरणासाठी फुटबाथ बांधावा. फार्मला भेट देणाऱ्या व्यक्ती, उपकरणे, वाहनांचे निर्जतुकीकरण करावे, स्वच्छता ठेवावी. योग्य वेळी लसीकरण करावे. मृत कोंबड्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी.
आजाराचा प्रसार ः
आजाराचा प्रसार शेडमधील आजारी कोंबडीच्या विष्ठेतून, नैसर्गिक स्राव यातून दूषित झालेली हवा, पाणी किंवा खाद्यावाटे होतो. शेड अस्वच्छ असल्यास, अशा वातावरणात रोगकारक जंतूंची वाढ झपाट्याने होते आणि संसर्ग होतो. शेडमध्ये प्रत्येक कोंबडीस योग्य जागा न मिळाल्यास, त्यांना स्वच्छ, शुद्ध हवेचा पुरवठा होत नाही. त्यामुळे कोंबडी गुदमरून मृत्युमुखी पडू शकते.
तसेच कोंबडीची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि संसर्ग होऊ शकतो. त्याचप्रमाणे दूषित खाद्य भांडी, पिण्याची भांडी याद्वारे सुद्धा आजाराचा प्रसार होतो. शेडमधील लिटर ओले झाल्यास अशा वातावरणात रोगकारक जंतूंची वाढ झपाट्याने होते, प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. उदा. रक्ती हगवण.
जैव सुरक्षा व्यवस्थापनाचे उपाय ः
१) कोंबड्यांचे शेड असलेली जागा फेन्सिंग करून सुरक्षित करावी. प्रवेशाच्या ठिकाणी “प्रतिबंधित क्षेत्र” म्हणून फलक लावावेत.
२) कोंबड्यांची शेड लोकवस्ती, तसेच इतर पोल्ट्री फार्मपासून दूर, उंचावर बांधावी.
३) कोंबड्यांच्या शेडच्या अवतीभोवती बिनकामाची झाडे किंवा झुडपे नसावी. जेणेकरून जंगली पक्ष्यांची घरटी नसावीत.
४) अवांतरित लोकांची शेडमध्ये ये- जा प्रतिबंधित करून त्याची योग्य नोंद ठेवावी.
५) प्रत्येक शेडमध्ये कामगारांसाठी वेगळे पादत्राणे तसेच कपडे उपलब्ध करून द्यावेत.
६) प्रत्येक शेडच्या सुरुवातीला स्वच्छ फूटबाथ असावेत.
७) मृत कोंबडी काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी (जाळणे, खोल खड्ड्यात पुरावे)
८) दुसऱ्या शेडला किंवा आजाराचा प्रसार असलेल्या शेडला भेट दिल्यानंतर स्वतःच्या शेडमध्ये जाऊ नये.
९) विविध शेडमधील उपकरणे वापर करण्यापूर्वी आणि वापर झाल्यानंतर निर्जंतुक करावे.
१०) उंदीर, कीटक सापांचा प्रवेश शेडमध्ये होणार नाही याची काळजी घ्यावी.
११) खाद्य, पाणी आणि तूस यांमध्ये कुठल्याही प्रकारचे संसर्गजन्य जिवाणू किंवा विषाणू नसावेत.
१२) एखाद्या आजाराचा उद्रेक झाला असल्यास कमीत कमी तीन आठवड्यांनंतर नवीन कोंबड्या आणाव्यात.
१३) आजारी कोंबडी आणि निरोगी कोंबड्या एकाच शेडमध्ये असतील, तर प्रसार त्वरित होतो म्हणून आजारी कोंबड्या वेगळ्या ठेवाव्यात.
१४) आजाराचा प्रसार झालेल्या शेडमधील भांडी, उपकरणे, काम करणारे कामगार, त्यांच्या अंगावरील कपडे, वाहतुकीचे वाहन यातूनही आजाराच्या जिवाणू विषाणूंचा प्रसार होतो. त्यामुळे त्यांचा प्रवेश निषिद्ध करावा.
१५) मृत कोंबड्या जाळून टाकाव्यात. कारण शेडबाहेर टाकले तर कुत्रा, घारी, कावळ्यांमार्फत आजाराचा प्रसार होतो.
१६) जंगली व स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांना प्रक्षेत्रावर प्रतिबंध करावा.
१७) मृत कोंबडीची त्वरित विल्हेवाट करणे अत्यावश्यक आहे. विल्हेवाटीसाठी जाळणे अथवा पुरणे यापैकी कोणताही एक पर्याय निवडावा.
१८) अंडी, मांस इत्यादींच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे.
१९) नियमितपणे कोंबड्यांचे रक्तद्रव्य, विष्ठा, नाकातील तसेच घशातील स्राव नमुने गोळा करून पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी.
२०) शेडमधील लिटर दररोज दोन-तीन वेळा हलवावे. लिटरवर जास्त प्रमाणात पाणी सांडणार नाही याची काळजी घ्यावी.
२१) कमी जागेत जास्त कोंबड्यांची गर्दी झाल्यास वातावरणात अमोनियाचे प्रमाण वाढते. तसेच कोंबड्या एकमेकांच्या जास्त जवळ असल्याने संसर्ग लवकर पसरतो. यावर उपाय म्हणून लिटरची स्वच्छता ठेवावी.
२२) शेडमध्ये सतत खेळती, आल्हाददायक हवा ठेवावी. आजारी कोंबड्यांना इतरांपासून वेगळे ठेवावे.
२३) कोंबड्यांना नियमितपणे लसीकरण करावे. मानमोडी व देवी आजारावरील प्रतिबंधक लस नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाने, तालुका लघू पशुवैद्यकीय चिकित्सालयात उपलब्ध असते.
२४) मरतुक आढळल्यास पशुवैद्यकाच्या साहाय्याने शवविच्छेदन करून योग्य उपाययोजना कराव्यात. जेणेकरून मरतुक थांबेल, आर्थिक हानी होणार नाही.
----------------------------------------------------------------
संपर्क ः डॉ. व्ही. एस. धायगुडे, ९०८२२९२३४१
(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.