राजगिरा ः मुबलक पोषकद्रव्यांचा स्रोत

राजगिरा
राजगिरा
Published on
Updated on

अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये विविध प्रकारचे अन्नपदार्थं तयार केले जातात व ग्राहकांकडूनसुद्धा त्या पदार्थांना भरपूर मागणी असते. पदार्थनिर्मिती करीत असताना त्यातील पोषकमूल्यांकडे दुर्लक्ष केले जाते. बेकरी पदार्थ, नुडल्स, पास्ता, शेवया इ. तयार करण्यासाठी गहू किंवा तांदूळ पिठाचा वापर केला जातो. पोषणमूल्याचा विचार करता गहू व तांदूळ या धान्यामध्ये पोषकद्रव्यांचे प्रमाण अतिशय कमी असून त्यांपासून तयार केलेले विविध प्रकारचे अन्नपदार्थंसुद्धा नेहमीच्या सेवनासाठी पोषक नाहीत. “प्स्युडो कडधान्ये” हा एक धान्यपिकांमधील दुर्लक्षित परंतु अतिशय पोषक प्रकार आहे. प्स्युडो कडधान्य संवर्गामध्ये प्रामुख्याने राजगिरा, किनवा, बकव्हीट/कुट्टू आणि चिया इ. धान्यांचा समावेश होतो. प्स्युडो कडधान्यांमधील प्रथिने, तंतूमय पदार्थ, जीवनसत्त्वे व खनिजे इ. चे प्रमाण नेहमीच्या वापरातील गहू किंवा तांदूळ धान्यांपेक्षा भरपूर प्रमाणात आहे. गव्हामधील ‘ग्लुटेन’ या प्रथिनामुळे काही लोकांना ‘सिलीयाक’ हा आजार होतो. प्स्युडो कडधान्यांमध्ये ग्लुटेन नसल्यामुळे ही धान्ये सिलीयाक रुग्णांसाठी सुरक्षित आहेत. राजगिरा राजगिरा धान्याची लागवड प्रामुख्याने भारत, चीन, अमेरिका इ. देशांमध्ये केली जाते. राजगिरा किंवा अॅमरंथ धान्य हे कॅल्शियम आणि लोहाचा उत्तम स्रोत आहे. मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम अशी शरीराला आवश्यक असलेली खनिजे राजगिऱ्यात पुरेशा प्रमाणात आहेत. जीवनसत्त्वे ‘ब-६’ आणि ‘ई’ सुद्धा राजगिऱ्यात आहेत. पचनास हलका असल्याने केवळ उपवासालाच नव्हे तर सर्वांनी विशेषत: वयस्कर लोकांनी राजगिरा रोजच्या आहारात आवश्य घ्यावा. राजगिऱ्यापासून लाह्या, लाडू, डोसे, उपमा इ. घरगुती पदार्थ तयार केले जातात. बाजारातील अन्नपदार्थ जसे की, बेकरी, नुडल्स, पास्ता, शेवया इ. तयार करताना त्यातील प्रमुख धान्यपिठात (गहू किंवा तांदूळ पीठ) १०-२० टक्के राजगिरा पीठ मिसळून पदार्थांचे पोषनमूल्य वाढविता येते. राजगिऱ्यामधील प्रमुख अन्नद्रव्यांचे सरासरी प्रमाण

  • प्रथिने (ग्रॅम) ः १३.५
  • तंतुमय पदार्थ (ग्रॅम) ः १२.२
  • कॅल्शिअम (मिलिग्रॅम) ः १८०.१
  • मॅग्नेशिअम (मिलिग्रॅम) ः २७९.२
  • झिंक (मिलिग्रॅम) ः २.६
  • लोह (मिलिग्रॅम) ः ९.२
  • फॉस्फरस (मिलिग्रॅम) ः ५५७.२
  • पोटॅशियम (मिलिग्रॅम) ः ५०८
  • जीवनसत्त्व-ब१ (मिलिग्रॅम) ः ०.१
  • जीवनसत्त्व-ब२ (मिलीग्रॅम) ः ०.२
  • जीवनसत्त्व-ब३ (मिलिग्रॅम) ः ०.९
  • जीवनसत्त्व-ब५ (मिलिग्रॅम) ः १.५
  • जीवनसत्त्व-ब६ (मिलिग्रॅम) ः ०.६
  • जीवनसत्त्व-ब९ (मायक्रोग्रॅम) ः ८२
  • जीवनसत्त्व-इ (मायक्रोग्रॅम) ः १.५
  • राजगिराचे आरोग्यविषयक फायदे

  • कॅल्शिअम भरपूर असल्याने हाडे मजबूत राहतात.
  • जीवनसत्व 'क' भरपूर मात्रेत असल्याने त्वचा, केस आणि हिरड्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरते.
  • राजगिऱ्यातील प्रथिनांमध्ये मध्ये इन्सुलिनवर नियंत्रण राखण्याचा विशेष गुणधर्म आढळतो. त्यामुळे मधुमेही रुग्णांमध्ये उपयुक्त ठरते.
  • राजगिऱ्यातील तंतुमय पदार्थामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
  • मॅग्नेशिअम अधिक असल्याने डोकेदुखीमध्ये उपयुक्त ठरते.
  • तंतुमय पदार्थ व असंतृप्त स्निग्ध आम्ले असल्यामुळे रक्तवाहिन्यातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.
  • संपर्क ः डॉ. अमोल खापरे, ८०५५२२६४६४ (अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) 

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com