प्रजोत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या वळूंच्या आहारावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कारण पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे विर्याची प्रत कमी होते. त्यामुळे गर्भधारणेचे प्रमाण कमी होऊन गायी-म्हशी उतरण्याचे प्रमाण वाढते. गोठ्यातील गायी-म्हशींचे गाभण राहण्याचे प्रमाण हे जो वळू कृत्रिम रेतनासाठी वापरला जातो त्याच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. पैदाशीच्या वळूला चांगला अाहार पुरवल्यामुळे कळपाची गुणवत्ता वाढते, पुढील पिढ्यांची उत्पादनक्षमता, प्रजोत्पादन क्षमता चांगली ठेवली जाते.
वळूची प्रजोत्पादन क्षमता चांगली राहण्यासाठी त्यांना गरजेपेक्षा जास्त किंवा कमी चारा देणे टाळावे. योग्य प्रमाणात हिरवा चारा, वाळला चारा अाणि पशुखाद्य द्यावे. याशिवाय मुरघासाचाही वापर करावा. गरजेपेक्षा जास्त आहार दिल्यास वळूच्या शरीरामध्ये फॅट जमा होऊन त्यांचे वजन वाढते. त्यामुळे पायावर ताण वाढतो. नैसर्गिक रेतनाची इच्छा कमी होते. गरजेपेक्षा कमी आहार दिल्यास पोषणतत्त्वांची कमतरता होऊन वळूची प्रजोत्पादनक्षमता कमी होते. आहार देताना प्रामुख्याने त्याचे वजन आणि वळूचा नैसर्गिक रेतनासाठी होणारा वापर या गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते. आहारामध्ये शुष्क पदार्थांचे प्रमाण वजनाच्या २ टक्के इतके असावे. पशुखाद्य ज्यामध्ये पचनीय प्रथिने १२-१५ टक्के आणि ७० टक्के एकूण पचनीय घटक आहेत असे पशुखाद्य २-३ किलो दर दिवशी द्यावे. नवीन वळूच्या आहारात हिरव्या चाऱ्याचा मुबलक प्रमाणात वापर करावा, कारण त्यांना "अ'' जीवनसत्त्वाची जास्त प्रमाणात गरज असते. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे वीर्य निकृष्ट दर्जाचे तयार होते. वळूचा नैसर्गिक रेतनासाठी जास्त वापर असेल, त्या वेळी त्याच्या आहारात पशुखाद्याचे प्रमाण वाढवावे. आणि कमी असेल, त्यावेळेस पशुखाद्याचे प्रमाण कमी करावे. नैसर्गिक रेतनासाठी उपयोगात असलेल्या वळूच्या आहारामध्ये प्रामुख्याने फॉस्फरस, सेलेनियम, कॉपर या खनिजांचा "अ'' आणि "इ'' या जीवनसत्त्वांचा समावेश आवश्यक आहे. कारण या घटकांच्या कमतरतेमुळे वळूची प्रजोत्पादन क्षमता घटू शकते. आहारात कॅल्शियमचा जास्त प्रमाणात वापर केल्यास पाठीच्या मणक्याचे हाड आणि इतर हाडे जोडली जातात, त्यामुळे वळूमध्ये नैसर्गिक रेतनावेळी समस्या निर्माण होतात. नैसर्गिक रेतनासाठी उपयोगात असणाऱ्या वळूच्या आहारात सर्व पोषणतत्त्वांच्या योग्य प्रमाणाबरोबरच वळूला योग्यवेळी मुबलक पाणी पिण्यासाठी मिळणे आवश्यक आहे. संपर्क : डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३ (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)