संतुलित खाद्य व्यवस्थापनातून दूध उत्पादनवाढ शक्य

संतुलित, संपूर्ण आहार तंत्रामुळे जनावरांची प्रजनन क्षमता सुधारते.
संतुलित, संपूर्ण आहार तंत्रामुळे जनावरांची प्रजनन क्षमता सुधारते.
Published on
Updated on

जनावरांची दूध देण्याची क्षमता ही प्रामुख्याने जनावरांच्या जाती, प्रजाती, आनुवांशिकता, वेत व वय यावर अवलंबून असते, तर काही अंशी नैसर्गिक ऋतुचक्रावर अवलंबून असते. त्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात चढ-उतार होत असला तरीही आवश्यक समतोल आहार, पालन-पोषण, काळजी, निगा, आरोग्य व योग्य व्यवस्थापन केल्यास दूध  उत्पादनामध्ये वाढ करता येऊ शकते.  प्रत्येक वेगवेगळ्या जनावरांमध्ये (उदा. गाय, म्हैस, बकरी इ.), एकाच प्रकारच्या जनावरांमध्ये परंतु वेगवेगळ्या जातींनुसार (उदा. गवळाऊ, जर्सी गाय इ.), तसेच एकाच गायीच्या वेगवेगळ्या वासरांमध्ये दुधाचे व दुधातील स्निग्धांशांचे प्रमाण वेगवेगळे असते. त्यामुळे एकाच जातीच्या दोन गायी-म्हशींनी सारखेच दूध व स्निग्धांशांचे प्रमाण द्यावे, असा अट्टाहास करू नये. उन्हाळ्यात दूध उत्पादन व दुधातील स्निग्धांश थोडे कमी, तर हिवाळ्यात थोडे अधिक असते. विदेशी वंशाच्या गायीच्या तुलनेत देशी गायींचे दूध उत्पादन कमी असते, कारण त्यांचा विकास व जडणघडण येथील उष्ण वातावरणाशी जुळवून घेत होत असते. 

दुधाळ गायी-म्हशींचे सरासरी दुग्ध उत्पादन (किलो प्रतिवेत)  देशी वंशाच्या गायी 

  • साहिवाल ः २२७० 
  • गीर ः १५९० 
  • रेड सिंधी ः १५००-१८०० 
  • थारपारकर ः ११३६ 
  • विदेशी वंशाच्या गायी 

  • होलेस्टन फ्रिजियन ः ६५०० 
  • जर्सी ः ४५०० 
  • ब्राउन स्विस ः ५२५० 
  • संकरित गायी 

  • फुले त्रिवेणी ः ३०००-३५०० 
  • करण स्विस ः ३३५५ 
  • करण फ्रिझ ः ३७०० 
  • म्हशी 

  • मुऱ्हा ः २००० 
  • सुरती ः १६०० 
  • मेहसाना ः १५००-१९०० 
  • जाफराबादी ः १५०० 
  • नागपुरी ः १४००-२००० 
  • पंढरपुरी ः १५०० 
  • गाभण काळात व नंतर घ्यावयाची काळजी.. 

  • गाभण काळात शेवटचे तीन महिने वासरांची सुदृढता व मुबलक दूध उत्पादनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असतात. 
  • गाभण जनावरांचा गोठा स्वच्छ, कोरडा व सूर्यप्रकाश पडेल असा ठेवावा. गोठ्याचे जंतुनाशकाची फवारणी करून निर्जंतुकीकरण करावे. 
  • जनावराची हालचाल होईल अशा प्रकारे गोठ्याची रचना असावी. यामुळे जनावरांना पुरेसा व्यायाम मिळेल. 
  • गाभण जनावरांना उंचावर किंवा डोंगराळ भागात चरायला नेऊ नये, कारण उंचावरून घसरून गर्भाशयाला इजा होऊ शकते. 
  • गाभण जनावरांच्या शेवटच्या ४०-५० दिवसांत दूध काढणे बंद करावे. 
  • एक ते दीड किलो अतिरिक्त चारा द्यावा, ज्यामध्ये १२ ते १३ टक्के प्रथिने असावीत. 
  • व्याल्यानंतर दूध उत्पादनासाठी गाय/म्हशीला पुरेसा आहार द्यावा. 
  • आहाराचे व्यवस्थापन.. 

  • दुधाळ जनावरांच्या चारा खाद्यावर एकूण उत्पन्नाच्या जवळजवळ ६० टक्के खर्च होतो व तो यापेक्षा जास्त असू नये. म्हणून दूध व्यवसायामध्ये आहाराच्या व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 
  • ज्या संतुलित आहारामुळे चाऱ्याचे रूपांतर जास्तीत जास्त दूध घटकामध्ये होईल, तो आहार किफायतशीर मानला पाहिजे. 
  • दुभत्या जनावराला देण्यात येणारा चारा हा त्याचे वय, जात, लिंग, शरीरक्रिया, गाभणकाळ व दूध उत्पादन यावर अवलंबून असतो. 
  • दुधाळ जनावरांना खुराक हा शरीर पोषणासाठी, शरीराची वाढ होण्यासाठी, गर्भाची वाढ होण्यासाठी व दूध उत्पादनासाठी दिला जातो, त्यास सर्वसमावेशक असा संतुलित आहार म्हणतात. 
  • दुधाळ जनावरांच्या चाऱ्याचे पुढील पाच भागांत वर्गीकरण करता येईल. 

    चाऱ्याचे वर्गीकरण 

  • खुराक ः ढेप, चुरी, भुसा, भरडा, टरफले, कोंडा 
  • हिरवा चारा ः बरसीम, लुसर्ण, ज्वारी, मका, गजराज, पॅराग्रास, नेपियर, चवळी 
  • सुका चारा ः कडबा, कुट्टी, गव्हांडा, धानाचे तनीस 
  • मुरघास ः मुरघास चारा 
  • इतर ः मीठ, खनिज, जीवनसत्त्वे 
  • दुधाळ जनावरांसाठी आहार 

  • जनावर व्याल्यानंतर पहिले चार दिवस जवळपास २ किलो गव्हाडा, १.५ किलो गूळ, २ चमचे मीठ व क्षारयुक्त मिश्रण द्यावे. 
  • पहिले तीन महिने दिवसातील संपूर्ण २८ ते ३० किलो आहार तीन वेळा विभागून दिल्यास दूध उत्पादन चांगल्या प्रकारे मिळते. 
  • रोजच्या शरीर पोषणासाठी जवळजवळ १ ते १.५ किलो देशी गायींसाठी, तर २ किलो खुराक संकरित गाय/  म्हशीसाठी द्यायला हवा. 
  • दुधाळ जनावराला वजनाच्या २ ते ३.५ टक्के सुका चारा द्यावा, त्यापैकी २/३ भाग वैरण व १/३ भाग आंबोण देणे  फायद्याचे ठरते. 
  • प्रती तीन लिटर दुधामागे प्रत्येक दिवशी एक ते दीड किलो अतिरिक्त खुराक द्यावा. 
  • दुधाळ गायी व म्हशीला प्रतिदिन १५ ते २० किलो हिरवा चारा बारीक तुकडे करून, तसेच ४ ते ८ किलो सुका चारा दिल्यास दुग्ध उत्पादनात फायदा मिळू शकतो. 
  • आहारामध्ये जास्त प्रथिने, खनिज मिश्रण असलेले खाद्य द्यावे. 
  • शेवग्याच्या झाडाचा पाला खनिज गुणधर्मासाठी उत्तम आहे. 
  • दुधाळ जनावरांना दररोज २० ग्रॅम खनिज मिश्रण खाद्यातून दिल्यास दुग्ध उत्पादनात वाढ होते. 
  • मुबलक प्रमाणात स्वच्छ पाणी पाजावे. 
  • इतर व्यवस्थापन 

  • काही महत्त्वाच्या बाबींची काळजी व व्यवस्थापन केल्यास दुधाच्या व स्निग्धांशांच्या प्रमाणात फरक जाणवतो. 
  • दूध एकाच माणसाच्या हाताने ठरावीक वेळेतच व समान अंतराने काढावे. 
  • शेवटची धार पूर्णपणे काढावी, त्यात स्निग्धांशांचे प्रमाण वाढते. 
  • जनावरे स्वच्छ ठेवावीत व आरोग्याची काळजी घ्यावी. 
  • जास्त दूध देणाऱ्या जनावरांच्या पुढील पिढीचे संगोपन करावे. 
  • संपर्क ः सचिन रामटेके, ९५४५८७२२१२  (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)   

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com