मुरघासाचे फायदे, जनावरांसाठी वापर

मुरघास खड्ड्याबाहेर काढल्यानंतर १० मिनिटे सावलीत पसरून मगच जनावरांना खायला द्यावा.
मुरघास खड्ड्याबाहेर काढल्यानंतर १० मिनिटे सावलीत पसरून मगच जनावरांना खायला द्यावा.

चाऱ्याच्या कमतरतेमुळे दूध उत्पादनामध्ये सातत्य राहत नाही, जनावरांचे वजन घटते, प्रजननक्रियेवर परिणाम होतो, जनावरे विविध रोगांना बळी पडतात. यावर उपाय म्हणून उपलब्ध चाऱ्यापासून मुरघास बनवून ठेवावा. म्हणजे चारा कमतरतेच्या काळात जनावरांना हिरवा, पौष्टिक व पाचक चारा उपलब्ध होईल.

मुरघास तयार होताना घडणारी रासायनिक प्रक्रिया

  • मुरघास करण्यासाठी भरलेल्या हिरव्या चाऱ्यात जे रासायनिक बदल घडतात, त्यामुळे हिरवा चारा खराब न होता साठवला जातो.
  • मुरघासाचा खड्डा चाऱ्याने भरून, चांगला दाबून पूर्णपणे हवाबंद केल्यानंतर हिरव्या चाऱ्यातील वनस्पतीपेशींचा श्वासोच्छ्‍वास काही काळ चालू असतो. त्यासाठी चाऱ्याच्या थरामध्ये अडकलेला ऑक्सिजन वनस्पतीपेशी वापरतात.
  • चाऱ्यात असणाऱ्या साखरेचे ज्वलन होऊन कार्बन डाय-ऑक्साईड, पाणी आणि उष्णता तयार होते. काही तासांमध्ये आतील शिल्लक राहिलेला ऑक्सिजन संपून जातो व पूर्णपणे ऑक्सिजनविरहित वातावरण खड्ड्यात तयार होते.
  • - या सर्व प्रक्रियेमुळे प्रथम आम्ल तयार करणाऱ्या जिवाणूंची संख्या वाढून चाऱ्यातील साखरेचे लक्टिक अॅसिड आणि व्होलाटाइल फॅटी अॅसिडमध्ये (अॅसिटिक, प्रोपिओनिक आणि ब्युट्रिक अॅसिड) रूपांतर होते. या सर्वांमध्ये अॅसिटिक अॅसिडचे प्रमाण सर्वांत जास्त, तर ब्युट्रिक अॅसिडचे प्रमाण सर्वांत कमी असते.
  • तयार झालेली अाम्ले चारा खराब करणाऱ्या अनावश्यक जिवाणूंची वाढ थांबवतात. या सर्व प्रक्रिया घडत असताना चाऱ्याचा सामू ३.७ इतका खाली येतो. तेव्हा चाऱ्यात जिवाणूंमुळे घडणारी आंबवण्याची प्रक्रिया थांबते.
  • फक्त बाहेरून मध्ये हवा जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते. अशाप्रकारे हा मुरघास असाच हवाबंद अवस्थेत न उघडता ठेवला तर फार काळ टिकवून ठेवला जातो.
  • चांगला मुरघास कसा ओळखावा

  • चांगला तयार झालेला मुरघास हा चमकदार, हिरवट - पिवळ्या किंवा सोनेरी रंगाचा असतो आणि त्याला आंबट गोड वास येतो.
  • चांगल्या मुरघासाचा सामू ३.५ ते ४.२ इतका असतो.
  • जर मुरघासाचा रंग काळसर व बुरशीयुक्त असेल, तर तो खराब झाला असे समजावे. तसेच, खराब मुरघासात पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्याला घाण वास येतो.
  • जनावरासाठी वापर

  • ४ ते ६ आठवड्यांनंतर खड्डा/बॅग एका बाजूने उघडून आवश्यक मुरघास काढून घेऊन खड्डा/बॅग व्यवस्थित झाकावा. दररोज कमीत कमी अर्धा ते १ फूट जाडीचा थर काढून घ्यावा.
  • काढलेल्या मुरघासाचा वास जाण्यासाठी थोडावेळ उघडा ठेवावा. त्यानंतर जनावरांना खाण्यास द्यावा.
  • गाई- म्हशींना जास्तीत जास्त १५ ते २० किलो, तर शेळ्या-मेंढ्यांना १ ते १.५ किलोपर्यंत मुरघास द्यावा. सुरवातीला जास्त न देता हळू-हळू प्रमाण वाढवत जावे.
  • जनावरांना दिवसभर फक्त मुरघास न देता इतर चारा व खाद्य द्यावे.
  • मुरघास देणे चालू असलेल्या जनावरांना दररोज ५० ग्रॅम खाण्याचा सोडा द्यावा.
  • बुरशीयुक्त व खराब मुरघास जनावरांना खाऊ घालू नये.
  • दूध काढताना मुरघास जनावरांना खाऊ घालू नये.
  • फायदे

  • हिरवा चारा त्याच्या गुणधर्मासह टिकविला जातो.
  • पावसाळ्यात हिरवा चारा वाळविणे शक्य नसते, अशा वेळेससुद्धा मुरघास तयार करता येतो.
  • मुरघास खाण्यास रुचकर, कसदार, चवदार असल्यामुळे जनावरे आवडीने खातात व पचण्यास योग्य असतो.
  • एकाच हंगामात चारा पिके घेऊन त्यापासून मुरघास तयार करून दुसऱ्या हंगामात इतर पिकांसाठी जमीन वापरता येते.
  • खरीप आणि रब्बी हंगामातील जास्तीचा हिरवा चारा साठवून गरजेनुसार चारातुटीच्या काळात वापरता येतो. वाळलेल्या चाऱ्यापेक्षा साठवणुकीस जागा कमी लागते.
  • पशुखाद्यावरील खर्च कमी होऊन दूध उत्पादनात सातत्य राहते.
  • संपर्क ः डॉ. शरद साळुंके, ९४०४९५७५१७ (कार्यक्रम साहाय्यक (पशुविज्ञान), मांजरा कृषी विज्ञान केंद्र, लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com