तापमानात होणारा बदल, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता किंवा टंचाई आणि वैरणात होणारा बदल इत्यादींचा परिणाम जनावरांची वागणूक, आरोग्य तसेच प्रजननावर दिसतो. यामुळे जनावरांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनात घट होते. हे लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात. पावसाळ्यात जनावरांचा गोठा नियमित स्वच्छ ठेवावा. गोठ्यात पावसाची झडप येणार नाही किंवा छतामधून पाणी गळणार नाही याची दक्षता घ्यावी. गोठ्याच्या आजूबाजूला गवत, झाडे झुडपे वाढू देऊ नका. पावसाळ्याच्या सुरुवातीला जनावरांना जंतनाशकाची मात्रा द्यावी. गोठा आणि परिसराचे नियमित निर्जंतुकीरण करावे. जनावरांना द्यावयाचे खाद्य पावसाने ओले होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे व्यवस्थापन
गोठा गळत असेल तर त्याचा प्रत्यक्ष परिणाम जनावरांच्या प्रजनन आणि कार्यक्षमतेवर होतो. कारण अशा गोठ्यामधील वातावरण ओलसर व कोंदट राहते. गोठ्यामध्ये हवा खेळती राहिली नाही, तर अमोनिया वायूंची निर्मिती होते. त्यामुळे जनावरांच्या डोळ्यावर सूज येते. शरीराची आग होऊन खाज सुटते. यामुळे जनावर स्वस्थ राहत नाही. परिणामी दूध उत्पादन क्षमता कमी होते. पावसाळ्यात उगवणारे गवत मऊ असल्याने जनावरे कमी वेळात अधिक गवत खातात, कोरडा चारा कमी खातात. या गवतात पाण्याचे प्रमाण अधिक असते, तंतुमय पदार्थाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे जनावरांची अन्न पचनाची क्रिया बिघडून हगवण लागते. पावसाळ्यात जनावरांना हिरव्या गवतासोबतच वाळलेला कोरडा तंतुमय चारा द्यावा. पावसाळ्यात वातावरणात आद्रता अधिक असल्याने हे वातावरण विविध प्रकारचे जीवाणू तसेच विषाणूंच्या वाढीस पोषक ठरते. त्यामुळे जनावरे आजारी पडतात. हे लक्षात घेऊन पशुवैद्यकाकडून लसीकरण करून घ्यावे (उदा. एकटांग्या, घटसर्प, लाळ्या खुरकूत इत्यादी). ५) पावसाळा सुरू होण्याअगोदर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना जंतनाशक द्यावे. पावसाळा संपल्यावरसुद्धा वर्षभर शिफारशीनुसार नियमित जंतनाशक द्यावे. पावसाळ्यात एका जनावरांपासून दुसऱ्या जनावरांत गोचीडाचा प्रसार वेगाने होतो. गोचीड जनावरांचे शरीरातील रक्त शोषतात. थायलेरीया रोगाचा प्रसार करतात. गोचीड वारंवार चावा घेत असल्याने जनावर स्वस्थ राहत नाही. परिणामी दूध उत्पादन कमी मिळते. हे लक्षात घेऊन गोठ्यात गोचिडनाशकाची फवारणी करावी. गोठ्याच्या आजूबाजूला झाडे झुडपे वाढणार नाही याची दक्षता घ्यावी. अधिक दूध उत्पादनक्षम गाई, म्हशींमध्ये कासदाह रोगाचे प्रमाण जास्त असते. पावसाळ्यात गोठा अस्वच्छ असल्याने याचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. त्यामुळे कासदाह होणार नाही, याची काळजी घ्यावी. पावसाळ्यात पशूखाद्य ओले होणार नाही, याची काळजी घ्यावी. खाद्य ओले झाल्यास बुरशीची वाढ होते. असे बुरशीजन्य खाद्य जनावरांनी खाल्ले तर बुरशीजन्य आजार होतात. बऱ्याचदा विषबाधा होते. संपर्क - डॉ. रणजीत इंगोले, ९८२२८६६५४४ (सहाय्यक प्राध्यापक, पशुविकृतीशास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)