गाई,म्हशीतील कासदाह ओळखा, उपचार करा

कासदाह हा दुधाळ जनावरांचा घातक आजार आहे. जनावरांचे सड किंवा कास खराब झाल्यास जनावरांची उत्पादकता कमी होते. परिणामतः: अशा जनावरांचे बाजार मुल्यही कमी होते. आजाराची लक्षणे ओळखून त्वरित उपचार करावेत.
inspect the udder every time before milking for avoiding the mastitis disease
inspect the udder every time before milking for avoiding the mastitis disease

कासदाह हा दुधाळ जनावरांचा घातक आजार आहे. जनावरांचे सड किंवा कास खराब झाल्यास जनावरांची उत्पादकता कमी होते. परिणामतः: अशा जनावरांचे बाजार मुल्यही कमी होते. आजाराची लक्षणे ओळखून त्वरित उपचार करावेत. जनावरांमध्ये कासदाहास बऱ्याच वेळा जिवाणू जबाबदार असतात. जिवाणूंबरोबर काही प्रकारच्या बुरशी व मायकोप्लाझमा हे सुध्दा कासदाहाचे प्रमुख अपायकारक घटक आहेत. कासदाह हा आजार त्यापासून होणाऱ्या संसर्गामुळे व दिसणाऱ्या लक्षणांमुळे साधारणतः: दोन मोठ्या प्रमाणात मोडतो ते म्हणजे लक्षणीय आणि सुप्त कासदाह. लक्षणीय कासदाह हा पुन्हा त्याच्या तीव्रतेनुसार अतितीव्र, तीव्र आणि दुर्धर असे वर्गीकरण केले जाते. वार अडकलेल्या गाई किंवा म्हशीमध्ये कासदाह होण्याची शक्‍यता तीन पटीने वाढते. भाकड काळात किंवा विल्यानंतर लगेच झालेल्या जंतुसंसर्गामुळे पहिल्या तीन महिन्याच्या कालावधीत कासदाह होण्याचे प्रमाण प्रचंड वाढते. दुधाळ जनावरांच्या सडांच्या टोकाला किंवा कासेवरील जिवाणू ग्रंथींपर्यंत पोहोचून आजार निर्माण करतात. दूध काढतेवेळी दूषित पाण्यामुळे कास धुतल्यामुळे हा आजार पसरतो. दूध काढणाऱ्या व्यक्तीच्या अस्वच्छ सवयी किंवा त्यांच्या आजारास कारणीभूत ठरतात. कासदाहाची लक्षणे लक्षणीय स्तनदाह

  • कासेला सूज येते. जनावरांना ताप येतो.
  • कासेला हाताने स्पर्श केल्यास कास गरम व कडक जाणवते. सुजेमुळे जनावरांना प्रचंड वेदना होतात. कासेत दूध राहिल्यामुळे कासदाहाची तीव्रता वाढते.
  • दुधामध्ये गाठी तयार होतात. तसेच बाधीत सडातून दुधाच्या गुठळ्या किंवा पू येतो. दुधाचा रंग आणि चव बदलते. उत्पादन कमी होते.
  • कासेच्या वेदनेमुळे जनावरांची हालचाल मंदावते, खाणे कमी होते.
  • सुप्त कासदाह

  • सुप्त कासदाहाचा संसर्ग झाल्यावर जनावरांमध्ये प्रत्यक्षरीत्या कासेच्या संसर्गाची किंवा विकृतीची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
  • दुधातील सोमॅटीक सेलची म्हणजेच ठरावीक पेशींची संख्या वाढते. हेच सुप्त कासदाहाचे मुख्य सूचक लक्षण असते. दूध उत्पादनातील घट होते.
  • आजार निदानासाठी चाचणी १) बाधीत दुधातील पेशींची संख्या मोजणे (सोमॅटीक सेल काऊंट)

  • या चाचणीमध्ये दुधामध्ये प्रति मिलिलीटर आढळणाऱ्या एकूण पेशी मुख्यतः: पांढऱ्या रक्तपेशी मोजल्या जातात.
  • भारतामध्ये साधारणतः: एक लक्ष पेशी दुधाच्या प्रति मिलिलीटर शक्यतो काही परिणाम दाखवत नाही. असे जनावर बहुतांश वेळा निरोगी असते. हेच प्रमाण जर दोन लक्ष पेशी दुधाच्या प्रती मिलिलीटर वाढले तर दूध उत्पादन कमी होते. जनावरांमध्ये सुप्त कासदाह आहे असे समजले जाते.
  • जर बाधीत जनावरांमध्ये हेच प्रमाण तीन लक्ष पेशी दुधाच्या प्रतिमिलीलीटर आढळल्यास जनावरास औषधोपचार करण्याची गरज भासते. याच वेळी गोठ्यातील इतर जनावरांची तपासणी करणे गरजेचे असते.
  • बऱ्याच ठिकाणी डेअरीमध्ये घेतल्या जाणाऱ्या दुधाचे नमुने तपासणी दूध संकलन केंद्रावर किंवा प्रयोगशाळेमध्ये केली जाते.
  • २) कॅलिफोर्नीया मस्टायटिस टेस्ट

  • या चाचणीमध्ये विशिष्ट प्रकारचे रसायन एका चार खणी पॅडलमध्ये घेऊन त्यात प्रादुर्भाव झालेल्या सडाचे दूध घेतात. ठरावीक काळानंतर प्रादुर्भाव झालेल्या दुधाचे नमुने द्रव पदार्थाला चिकटतात आणि जेली तयार होते.
  • ही एक स्वस्त व गोठ्यात तपासणी करण्याजोगी सोपी चाचणी आहे.
  • प्रतिबंधात्मक उपाय

  • व्यायल्यानंतर गाय किंवा म्हशीला स्वच्छ धुऊन वेगळे ठेवावे. गोठ्यात खाली मऊ गवत किंवा रबर मॅट टाकाव्यात. गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा.
  • दूध काढण्याअगोदर व दूध काढल्यानंतर जंतूनाशक द्रावणाने दूध काढण्याऱ्याचे हात व जनावरांची कास धुवावी.
  • दूध काढण्याची जागा कोरडी असावी. कास धुतल्यानंतर स्वच्छ टॉवेलने पुसून घ्यावी.
  • धार काढण्यापूर्वी व धार काढल्यानंतर जनावरांचे सड विशिष्ट प्रकारच्या द्रावणात (टिट डीप) बुडवावेत.
  • धार काढल्यानंतर जनावरांच्या सडाची छिद्रे अंदाजे अर्धा तास उघडे असतात. त्यामुळे जनावरांना अर्धा ते पाऊण तास खाली बसू देऊ नये. यासाठी त्यांना चारा किंवा आंबवण खाण्यास द्यावे.
  • दुधातील जनावरे शक्‍य असल्यास दिवसातून एक वेळ स्वच्छ धुवावीत. दूध काढण्याच्या वेळा किंवा दोन धारेमधील अंतर नियमीत ठेवावे. दूध काढण्याची भांडी, यंत्र वेळच्यावेळी स्वच्छ व कोरडे करावेत.
  • दूध काढल्यानंतर जनावरांच्या कासेमध्ये दूध राहणार नाही याची खात्री करून घ्यावी.
  • शक्‍य असल्यास वासरांना बाटलीने किंवा भांड्याने दूध पाजावे.
  • आठवड्यातून एकदा सर्व दुधाळ जनावरांची सुप्त कासदाहाच्या निदानासाठी योग्यती चाचणी करावी. ते प्रमाण साधारणतः: १५ टक्यांपेक्षा जास्त असल्यास त्वरित योग्य ती उपाययोजना करावी.
  • कासदाह बाधित जनावरांची धार सगळ्यात शेवटी काढावी. असे दूध नष्ट करावे.
  • भाकड काळातील गाभण जनावरांना व्यवस्थित आटवावे.
  • उपचार पद्धती

  • जनावरांना पशुवैद्यकाच्या मदतीने योग्य ते व योग्य वेळेवर उपचार करावेत. हे उपचार कमीत कमी तीन किंवा पाच दिवस करावेत.
  • बाधीत जनावरांना उपचार होईपर्यंत वेगळे ठेवावे. अशा जनावरांचे दूध नष्ट करावे.
  • प्रतिजैवकांच्या उपचाराला जनावर प्रतिसाद देत नसल्यास बाधित दुधाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवून उपचारासाठी योग्य ते प्रतिजैवक निवडून उपचार करावेत.
  • प्रतिजैविकांबरोबर कासेला सूज व वेदना असल्यास त्यासाठी योग्य ते उपचार करावेत.
  • वारंवार बाधीत होणाऱ्या जनावरांना गोठ्यातून कमी करावे किंवा तसे शक्‍य नसल्यास त्यांची प्रतिकार शक्ती वाढवण्याचे प्रयत्न करावेत.
  • संपर्क - डॉ. हेमंत कदम,९४२२४००२५५ (बाएफ मध्यवर्ती संशोधन केंद्र,उरूळी कांचन,जि.पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com