पशू सांभाळ, दैनंदिन निगा, चारा-पाण्याची सोय, दूध दोहन, पशू उपचार आणि कुक्कुटपालन व्यवसायातील कामे प्रत्येक व्यावसायिकाची अत्यावश्यक सेवा असते आणि त्यात कोणताही खंड अपेक्षित नसतो. "गोठ्यात सांभाळा-सुरक्षित ठेवा हाच सल्ला गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, पक्षी यांच्यासाठी अधिक सोयीस्कर आहे. पशुपालन करताना गोठ्यात मुक्त संचार पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो. मात्र जनावरे बांधून असल्याच्या त्यांच्या गळ्यातील दोर बारा ते पंधरा फूट लांब करावा. जनावरांना गोठ्यात जखडून सतत ठेवू नका.
चारा साठवून ठेवलेला असल्यास कुट्टी करून द्यावा, म्हणजे पुरेल. गहू, सोयाबीनचे काड प्रक्रिया करून वापरा. चारा कमी पडत असल्यास खुराक, पशुखाद्य प्रमाण वाढवा. पशुखाद्य, औषधी पुरवठा सुरु आहेच. दूध संकलन, वाहतूक सुरक्षित आहे. मात्र शिस्तीच्या सूचना पाळाव्यात. जनावरांना पाणी स्वच्छ, निर्जंतुक, भरपूर उपलब्ध करावे. दररोज जनावरांचे प्रकृतीस्वास्थ्य तपासा. आणि सकाळ-संध्याकाळ मालीश करणारा हात सुरु ठेवावा. धारा नियमीत काढाव्यात. दूध पूर्ण काढावे. भरपूर दूध प्या अन इतरांना पाजवा. वासरे भरपूर पाजा. शिल्लक दुधाचे दही, ताक, तूप तयार करा. यातील ताक उन्हाळा असल्याने पातळ करून दीड लीटर जनावरांना पाजावे, म्हणजे पचन सुधारू शकेल. पशू उपचार सेवा सुरु आहेत. पशुवैद्यकाशी संपर्क करून उपचाराचा सल्ला मिळवा. एकही जनावर आजारपणात उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या. सर्व यंत्रणांचे दूरध्वनी, ई-मेल, भ्रमणध्वनी क्रमांक संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. दररोज उद्याचे पूर्वनियोजन करा. म्हणजे मजूर, चारा, दूध, उपचार, विक्री यशस्वीपणे राबविता येईल. शेळ्या मेंढ्यांना घरीच झाडपाला पुरवावा. चरायला सोडलेली जनावरे मोकाटपणे शेतात घुसणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशुखाद्य प्रमाण वाढवून चाऱ्याची गरज कमी करता येईल. कुट्टी चारा वापरता येईल. कुटुंबातील सर्व व्यक्तींची रोगक्षमता वाढविण्यासाठी प्रथिने मिळणारी पशुजन्य उत्पादने स्वस्त आणि सहज उपलब्ध (दूध, अंडी, मांस) आहेत ही बाब लक्षात ठेवावी. अवकाळी पावसाचा तडाखा यात तीन आठवड्यात मधून मधून असताना जोरदार वारे, विजा, पाऊस यातून गोठे आणि पशुधन सुरक्षित करावे. भिजलेला, पावसाने आडवा झालेला चारा संपूर्ण आणि कडक उन्हात एक दोन दिवस वाळवूनच जनावरांना द्यावा. काळा पडलेला, साठवलेला चारा अजिबात वापरु नका. जनावरे रस्त्यावर मोकाट सोडू नका. जनावरे सोडून देणे, दुर्लक्ष करणे, चारा-पाणी न देणे, कोंबड्या सोडून देणे हा दंडनीय अपराध आहेत. कारण त्यातून पशू पक्षी अत्याचार होतो. मानवी आरोग्य आणि पशुधन सांभाळ यात सध्या कोरोना महामारीचे परस्पर वहन नाही म्हणून पशुधन सांभाळताना कानाडोळा करू नका. तज्ज्ञांच्या सूचना पाळाव्यात. घर, गोठे निर्जंतुक करण्यास मोहीम राबवा. परिसर स्वच्छ ठेवावा. ओल आणि माश्या, डास परजीवी यांचा प्रादुर्भाव होणार नाही याकडे लक्ष द्यावे. उन्हाळा सुरु असल्याने पशू आहारात खाण्याचा सोडा (२० ग्रॅम), गूळ (१५० ग्रॅम), क्षार पावडर (५० ग्रॅम) आणि ईडलिंबू यांचा नियमीत वापर करावा. याचबरोबरीने पातळ ताक जनावरांना पाजावे. जनावरांची रोगप्रतिकार क्षमता, आहार, व्यायाम, परिसर स्वच्छता यातून वाढविता येते. वनस्पतिजन्य औषधी अश्वगंधा, शतावरी, तुळस (दररोज ५ ग्रॅम, आवळकंठी १० ग्रॅम) खुराकात वापरा. उन्हाळी चारा उत्पादन कार्यक्रम, बियाणे वाटप उपक्रमात पशुसंवर्धन विभागास सहकार्य करून पुढील काळासाठी चारा लागवडीस प्राधान्य द्यावे. जनावरांची वाहतूक पूर्णपणे टाळावी. दुधाळ जनावरांची खरेदी-विक्री नकोच. कारण शेतकऱ्यांचे अर्थकारण ढासळत आहे. तेव्हा पुढे महिनाभर जनावरांचा बाजार हा विषय नको. गोशाळा व्यवस्थापनास श्रम, चारा, मदत असा सहकार्याचा मार्ग अवलंबा. उरलेले अन्न, पडून राहिलेल्या भाज्या, उतरलेली फळे यांचा वापर टाळा. मात्र विक्री न झालेल्या भाज्या, ताजी फळे, फळांच्या साली, न खराब झालेल्या अन्नाचा वापर १० टक्केपेक्षा कधीही अधिक होणार नाही याकडे लक्ष द्या. हायड्रोपोनिक्स चारा, अझोला उत्पादन, पर्यायी प्रक्रिया चारा यांचा भरपूर उपयोग करा. दूध विक्रीत, रतीब घालताना तोंड-नाकावर कपडा, सुरक्षित अंतर, कामापुरता वेळ याबाबत सजग रहा. मटणाची वाढती मागणी लक्षात घेता बोकड वाहतुकीचा मोह टाळा. स्थानिक विक्री वाढवा. जिल्हाअंतर्गत कोंबडी, मासे, बोकड यांची मागणी पूर्ण करा. शुद्ध पैदाशीसाठी गायी भरवण्यासाठी उन्नत वळूकडे वाहनातून नेणे टाळा आणि उपलब्ध असलेल्या त्याच जातीच्या वळूबीज रेतमात्रा वापरा. गोठ्यात मजुरवर्ग नियुक्त असल्यास त्यांचे आरोग्य, वर्तन, कुटुंबस्वास्थ्य, आर्थिक ताण समजावून घ्या. गोठा, परिसर, उघड्या ठिकाणी थुंकणे टाळा. पशूसल्यासाठी संपर्क- यंत्रणेपर्यंत पोहचा. प्रश्न मांडा, शिफारस, सल्ले स्वीकारा. पशुसंवर्धन विभाग, १८००-२३३-०४१८ महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर- १८००-२३३-३२६४ संपर्क- डॉ.नितीन मार्कंडेय, ९४२२६५७२५१ ( पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी)