मनुष्यामध्ये रेबीज विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेला बाधित करतो. ज्यामुळे मेंदूचे विकार उद्भवतात. सुरुवातीला ताप, डोकेदुखी, अशक्तपणा जाणवतो. लक्षणे तपासून तातडीने उपचार करावेत. रेबीज हा विषाणूमुळे होणारा झुनोटिक आजार आहे. हा आजार प्राण्यांपासून मानवास होऊ शकतो. रेबीज टाळता येण्यासारखा आजार आहे. रेबीज विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेला संक्रमित करतो. यामुळे मेंदूचे विकार होतात, मृत्यू ओढवतो. संक्रमण झाल्यानंतर सुरुवातीला इतर आजारासारखीच लक्षणे म्हणजेच ताप, डोकेदुखी, अशक्तपणा, अस्वस्थता जाणवतो. आजार वाढत गेल्यानंतर विशिष्ट लक्षणे दिसतात. ज्यामध्ये निद्रानाश, चिंता, आंशिक अर्धांगवायू, अन्न गिळण्यामध्ये अडचण येते. मृत्यू हा सहसा लक्षणे दिसायला लागल्यावर काही दिवसामध्ये होतो.
आजाराचा प्रसार संक्रमण झालेला प्राणी, संक्रमण नसलेल्या प्राण्याला किंवा मनुष्याला चावल्यामुळे होतो. फार क्वचितवेळा संक्रमित प्राण्याच्या लाळेचा संपर्क त्वचेच्या जखमेशी आल्यास प्रसार होतो. एका मनुष्यापासून दुसऱ्या मनुष्याला फार कमी वेळा प्रसार होतो, परंतु संक्रमण असलेल्या मनुष्याचा एखादा अवयव संक्रमण नसलेल्या मनुष्यामध्ये प्रत्यारोपणासाठी वापरला गेला तर हा आजार होऊ शकतो. वटवाघूळ, कोल्हे, रॅकुन्स, स्कंक्स व जंगली मांजरांमुळे मोठ्या प्रमाणात प्रसार होतो. रेबीज पसरविणाऱ्या कमी धोकादायक प्रजातीमध्ये कुत्रा, मांजर, हरीण, अस्वल, घोडे, जनावरे, डुक्कर यांचा समावेश होतो. विषाणू जास्त वेळापर्यंत यजमानाच्या शरीराबाहेर हवेमध्ये राहू शकत नाही. या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या प्राण्याच्या शरीरामध्ये २४ तासांपेक्षा कमी वेळापर्यंतच हा विषाणू दिसतो. रेबीजचे विषाणू लाळेमध्ये सर्वाधिक दिसतात. रेबीजग्रस्त प्राणी चावला असेल तरी योग्य उपचार घेतल्यास आजार आटोक्यात येतो. रेबीजच्या विषाणूने एकदा शरीरात प्रवेश केल्यानंतर तो मज्जातंतूच्या मदतीने मेंदूपर्यंत पसरतो. विषाणू मेंदूपर्यंत पोहचण्यासाठी ३ ते ८ आठवडे कुत्र्यामध्ये, २ ते ६ आठवडे मांजरांमध्ये आणि ३ ते ६ आठवडे मनुष्यामध्ये घेऊ शकतो. तथापि हा कालावधी ६ महिन्यापर्यंत कुत्रा आणि १२ महिन्यांपर्यंत मनुष्यामध्ये वाढत गेल्याचे काही वेळा आढळून आले आहे. विषाणू मेंदूपर्यंत पोहचला की तेथून पुढे तो लाळग्रंथीपर्यंत जातो. लाळेव्दारे इतर प्राण्यांना संक्रमित करायला सुरुवात करतो. विषाणू मेंदूमध्ये पोहचल्यानंतर संक्रमित प्राण्यांमध्ये आजाराचे तीन टप्पे दिसतात. प्राण्यांमध्ये काळजी किंवा भीती, अस्वस्थता, चिंता, एकाकीपणा आणि तापाची लक्षणे दिसतात. शांत प्राणी चिडचिडे होतात. आक्रमक प्राणी शांत होतात. फेफरे येऊन मृत्युमुखी पडतात. प्राण्यांमध्ये पक्षघाती टप्प्यामध्ये तोंडामधील लाळ वाढत जाते. श्वास मंद होतो. अखेरीस श्वसन क्रियेत बिघाड येऊन मृत्यू ओढावतो. मनुष्यामध्ये रेबीज विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेला बाधित करतो. ज्यामुळे मेंदूचे विकार उद्भवतात. सुरुवातीला ताप, डोकेदुखी, अशक्तपणा जाणवतो. चावलेल्या जखमेच्या जागी खाज सुटते, वेदना होतात. ही लक्षणे २ दिवसांपासून ते १ आठवड्यांपर्यंत दिसू शकतात. आजार वाढत जाईल तसा निद्रानाश, अर्धांगवायू, गिळण्याची अडचण, तोंडातील लाळेमध्ये वाढ, पाण्याची भीती दिसते. लक्षणे दिसायला लागल्यानंतर काही दिवसांत मृत्यू संभवतो. हा आजाराचा शेवटचा टप्पा ३ ते ७ आठवड्यांपर्यंत दिसतो. काही वेळा तो ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंत वाढतो. रेबीज संक्रमण झालेल्या प्राण्याने चावा घेतल्यानंतर १२ तासांच्या आत उपचार करावा. काही कारणास्तव ते शक्य न झाल्यास ४८ तासांच्या आत उपचार होणे गरजेचे असते. रेबीज झालेल्या प्राण्याने चावल्यामुळे झालेली जखम साबण व पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. विषाणूविरोधी द्रव उपलब्ध असेल तर त्याने जखम स्वच्छ धुवून घ्यावी. संक्रमण झाल्यानंतर रेबीज इम्युनोग्लोब्युलीन व रेबीज लसीची इंजेक्शन आवश्यक आहे. प्राण्याने चावलेल्या दिवशी पहिले इंजेक्शन दिले जाते. त्यानंतर ३, ७, १४ आणि काही वेळी २८ व्या दिवशी इंजेक्शन दिले जाते. लसीकरणामुळे शरीराची रोगप्रतिशक्ती वाढते. शरीरामधील विषाणू कमी होण्यास मदत होते. योग्य उपचार झाल्यास आजार नियंत्रणात येतो. संपर्क - डॉ. मनोजकुमार आवारे, ९४२१००७७८५ ( डॉ. वर्षा थोरात मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. मनोजकुमार आवारे हे बाएफ, उरूळीकांचन, जि. पुणे येथे कार्यरत आहेत.)