व्यायल्यानंतर वार अडकणे, कासदाह आणि गर्भाशय दाह होणे इत्यादी गोष्टी घडल्यास कालवडीला योग्य प्रमाणात चीक आणि दूध मिळत नाही. यासाठी कालवडीला जन्म देणाऱ्या गाईची गाभण काळात योग्य काळजी घेतली पाहिजे. कालवड सुदृढ जन्माला आली, तर पुढे योग्य आहार नियोजन करून संगोपन सहज शक्य होते. अनेक वेळा गाई विण्यापूर्वी ऊर्जेच्या कमतरतेमुळे बसतात, ताकद कमी पडल्याने वेळेत विण्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास कालवडी जन्मतानाच मृत्यू पावण्याचा धोका वाढतो.
गाभण गाईचे आटवल्यानंतरचे आहार नियोजन
जन्माला येण्यासाठी गाभण काळात पोटातच कालवडीची योग्य वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी गाईच्या आहाराचे योग्य नियोजन करावे. गाय आटविल्यानंतर अनेक पशुपालक गाभण गाईकडे दुर्लक्ष करतात. सात महिन्यांनंतर वासराची गर्भाशयात झपाट्याने वाढ सुरू होते. वासराच्या वाढलेल्या आकारमानामुळे गाईच्या पोटातील जागा कमी होते. त्यामुळे गाईची आहार ग्रहण क्षमता कमी होते. अशा वेळेस कमी चाऱ्यामधून अधिक पोषक घटक गाईला उपलब्ध करून द्यावेत. याच वेळेस गाईच्या शरीरात चरबीच्या स्वरूपात शक्ती साठवली गेली पाहिजे, जेणेकरून व्यायल्यानंतर दुग्धोत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर लागणारी ऊर्जा गाईला सहज उपलब्ध होईल. गाय आटवल्यानंतर १५ दिवस पशुखाद्य बंद करावे, जेणेकरून कासेत दूध तयार होण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद होईल. त्यानंतर पुन्हा भाकड काळातील पशुखाद्य (ड्राय काऊ फीड) सकाळी १ किलो आणि संध्याकाळी १ किलो सुरू करावे. त्याबरोबर उत्तम दर्जाचा हिरवा आणि सुका चारा गाईच्या वजनाच्या प्रमाणात दिला पाहिजे. गाभण गाईची तब्येत खूपच खराब असेल, तर भाकड काळात अधिक ऊर्जेचा स्रोत म्हणून बायपास फॅट दररोज ५० ते १०० ग्रॅम पशुखाद्यातून द्यावे. बायपास फॅटमुळे शरीरात चरबीच्या स्वरूपात ऊर्जा साठवता येईल, त्याच बरोबर विल्यानंतर अचानक आवश्यक असलेली ऊर्जा सहज उपलब्ध होईल. व्यायला झालेल्या गाईचे आहार व्यवस्थापन
संक्रमण काळ व्यवस्थापन हे पुढील वेतातील दूध उत्पादनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे परिणाम करते. यासाठी आहाराचे योग्य नियोजन करावे. विण्यापूर्वी गर्भाशयातील वासराच्या वाढलेल्या आकारामुळे शेवटचे दोन, तीन आठवडे आहार ग्रहणक्षमता १५ टक्क्यांपर्यंत कमी होते. अशा वेळी अधिक पचनीय व अधिक पोषक घटक असलेला आहार द्यावा.या काळात ट्रान्झिशन फीडचा आहारात वापर करावा. या काळात पोषणाची योग्य काळजी न घेतल्यास विल्यानंतर शरीरातील ऊर्जेच्या कमतरतेमुळे किटोसीस आजार होतो. विण्यापूर्वी गाभण जनावरांची कॅल्शिअमची गरज फक्त १० ते १२ ग्रॅम प्रतिदिन इतकी असते, परंतु व्यायल्यानंतर दुग्धोत्पादन सुरू करण्यासाठी कॅल्शिअमची गरज १० पट वाढते. अशी अचानक वाढलेली गरज फक्त हाडांमधील कॅल्शिअम रक्तामध्ये आणले तरच पूर्ण केली जाऊ शकते. असे न झाल्यास जनावरे मिल्क फिवर (दुग्धज्वर), कासदाह, जार/वार अडकणे, गर्भाशय दाह इत्यादी आजारांना बळी पडतात. आजारपण टाळण्यासाठी गाभण काळातील शेवटचे २१ दिवस क्षार- खनिज मिश्रण, मीठ, रुमेन बफर इत्यादी धन भारीत आयन असलेल्या गोष्टी बंद करून ऋण भारीत आयन असलेल्या क्षारांचे ॲनिओनिक मिश्रण सुरू करावे. अनिओनिक मिश्रण खाऊ घातल्यास जनावरांच्या पोटातील आम्लता वाढते. त्यामुळे रक्ताचा सामू कमी होतो. तो वाढविण्यासाठी हाडांमधील कॅल्शिअम हे कॅल्शिअम कार्बोनेटच्या स्वरूपात रक्तात आणले जाते, यामुळे शरीरात साठवलेले कॅल्शिअम गाईला वापरण्याची सवय लागेल आणि व्याल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आवश्यक असणारी कॅल्शिअमची गरज तेच साठे वापरून सहज भागवली जाते. गाभण काळात गाईची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. तसेच व्यायल्यानंतर चिकाद्वारे वासराला रोगप्रतिकारक शक्ती देण्यासाठी गाईच्या शरीरात विविध रोगांविरुद्ध अँटिबॉडीज तयार होणे आवश्यक असते. अनेक पशुपालक गाभण काळात गाईंचे लसीकरण करून घेत नाहीत. परंतु गाभण काळातसुद्धा लस उत्पादक कंपनीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लसीकरण करावे. जेणेकरून गाईच्या शरीरात विविध रोगांविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती निर्माण होऊन, ती कालवडीला चिकाद्वारे मिळू शकेल. काही प्रकारचे जंत गर्भाशयातच कालवडीला प्रादुर्भाव करतात. गाभण काळात सातव्या महिन्यात गाईला जंतनिर्मूलन करून घ्यावे, जेणेकरून त्यांच्या प्रदुर्भावास अटकाव होईल. यासाठी गाभण काळात सुरक्षित असणारी व सर्व प्रकारच्या जंतांवर प्रभावी औषधांचा वापर वजनानुसार आणि पशुवैद्यकांच्या सल्ल्याने करावा. गोचीड, उवा, पिसवा इत्यादी बाह्यपरोपजीवींचे नियंत्रण करावे. गाय आटवताना शेवटची धार काढून झाल्यावर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने कासेमध्ये अँटिबायोटिकच्या ट्यूब सोडाव्यात. यामुळे गाभण काळात होणाऱ्या कासदाह आजारास प्रतिबंध होतो. गाय दुधावर असताना वारंवार उद्भवणारा कासदाह असेल, तर अधिक प्रभावी उपचार आणि जास्त दिवस कासेत टिकून राहणाऱ्या अँटिबायोटिकच्या ट्यूब सोडून करता येतो. संक्रमण काळातील आजार जास्त दूध देणाऱ्या जनावरांमध्ये फॅटी लिव्हर आजार दिसतो. जनावरांच्या शरीरातील फॅट हे कमी होऊन रक्तावाटे यकृताकडे नेले जाते, त्यांना नॉन इस्टरीफाइड फॅटी ॲसिड्स (एनईएफए) असे म्हणतात. यकृतामध्ये त्यांचे दुधामधील फॅटी ॲसिड्समध्ये रूपांतर होते, त्यास व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन्स (व्हीएलडीएल) म्हणतात. गाभण काळात व ताज्या व्यायलेल्या गाई, म्हशींमध्ये हे रूपांतर होत असते. थोडक्यात, जनावरांच्या अंगावरील फॅटचे दुधामधील फॅटमध्ये रूपांतर होत असते. याचे कार्य तीन प्रकारे चालते.
यकृतामध्ये आलेल्या फॅटचे पूर्ण ज्वलन होऊन संपूर्ण शरीराला त्यावाटे ऊर्जा पुरविली जाते. यामध्ये यकृत पूर्ण क्षमतेने काम करीत असते. यकृतामध्ये आलेल्या फॅटचे अपूर्ण ज्वलन होते. किटोन बॉडी तयार होतात. त्यांचे रक्तामधील प्रमाण वाढते. शरीरातील सर्व स्नायू या किटोन बॉडीचा इंधन म्हणून वापर करतात. यकृतामध्ये आलेल्या काही फॅटचे ‘व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन्स’मध्ये रूपांतर होते. कासेमध्ये त्याचा दुधामधील फॅट म्हणून वापर केला जातो. या सर्व शारीरिक चयापचयाच्या प्रक्रियेमध्ये यकृतात फॅटी असिड्सच्या रूपांतरासाठी कोलीन हा घटक आवश्यक असतो. जास्त दूध देणाऱ्या गाई, म्हशींमध्ये या घटकाची कमतरता असल्यास यकृत पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. फॅटी अॅसिड्सचे अपूर्ण ज्वलन होऊन रक्तामध्ये किटोन बॉडीचे प्रमाण वाढते. जनावर किटोसीस या आजाराला बळी पडते. यामध्ये दुभती गाय, म्हशीचे दूध अचानक कमी होते, त्यांची भूक मंदावते. उपचारासही असे जनावर थंड प्रतिसाद देते. दुधामधील घट व उपचाराचा खर्च यामुळे दुहेरी नुकसान होते. व्यायल्यानंतर यकृतात ग्लुकोज तयार करण्याचे प्रमाण दुपटीने वाढते. या काळात ग्लुकोजनिर्मिती वेगाने झाली नाही तर दूध उत्पादनात घट होते. फॅटी लिव्हर असणाऱ्या गाई, म्हशींमध्ये कमतरता असलेला कोलीन हा घटक तोंडावाटे दिल्यास यकृतावरील चरबी निघून जाण्यास मदत होते. यकृतावरील चरबी निघून गेल्यास त्याची कार्यक्षमता वाढते. शारीरिक क्रियांसाठी लागणाऱ्या ग्लुकोजचे उत्पादन यकृतात मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होते. त्यामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होते. गाभण गाय वेळेत आटवावी. म्हणजे त्यांच्या कासेला किमान ६० दिवसांचा आराम मिळेल, जो पुढील वेतात पूर्ण क्षमतेने दूध देण्यासाठी आवश्यक आहे. गाभण गाईंना ऋण भारीत क्षार मिश्रण (ॲनिओनिक मिक्श्चर) विण्याआधी फक्त २० दिवस द्यावे. अनेक पशुपालक गरजेपेक्षा जास्त दिवस देतात. ज्यामुळे त्याचे फायदे होण्यापेक्षा दुष्परिणाम दिसून येतात. गाभण गाईंच्या आहारात शेवटचे २० दिवस मीठ, अधिक प्रथिने असलेला चारा बंद करण्यात यावा. रोज सकाळ, संध्याकाळी थोडासा व्यायाम द्यावा. जेणेकरून रक्ताभिसरण चांगले राहून कासेला हलपा कमी राहील. विण्याची प्रक्रिया सुलभ होईल. निवारा व्यवस्था इतर गाईपासून वेगळी करावी. जमीन निसरडी नसावी, खाली बसायला सुके भुसकट किंवा गवताची सोय करावी. गाभण काळात अंग बाहेर येणे, गर्भाशयाला पीळ पडणे यासारखे आजार उद्भवू शकतात. योग्य लक्ष ठेवून तशी काही लक्षणे दिसताच पशुवैद्यकांकडून उपचार करून घ्यावेत. संपर्क ः डॉ. सचिन रहाणे, ९९७५१७५२०५ (डॉ. रहाणे हे पशुवैद्यकीय दवाखाना, डिंगोरे, ता. जुन्नर, जि. पुणे येथे पशुधन विकास अधिकारी आहेत. डॉ. घोगळे हे पशुआहार तज्ज्ञ आहेत.)