कालवड संगोपनात ओळख, वजन अन् नोंदीचे महत्त्व

कालवडीचा जन्म झाल्यापासून विविध नोंदी ठेवून व्यवस्थापन केल्यास योग्य पद्धतीने नियोजन होऊ शकेल. केंद्र शासनामार्फत जनावरांना विशिष्ट ओळख क्रमांक असलेले बिल्ले बसवून त्यांची नोंदणी करण्यात येत आहे.
Methods of measuring the weight of animals
Methods of measuring the weight of animals

कालवडीचा जन्म झाल्यापासून विविध नोंदी ठेवून व्यवस्थापन केल्यास योग्य पद्धतीने नियोजन होऊ शकेल. केंद्र शासनामार्फत जनावरांना विशिष्ट ओळख क्रमांक असलेले बिल्ले बसवून त्यांची नोंदणी करण्यात येत आहे. कालवड संगोपन करताना छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास संगोपन फायदेशीर होतो. यात प्रामुख्याने कालवडीची ओळख पटवण्यासाठी कानात बिल्ला बसवणे, वेळोवेळी वजन करणे, विविध नोंदी ठेवणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कालवडीची ओळख कालवडीची ओळख आणि तिच्या विविध नोंदी ठेवणे भविष्यात आपल्या गोठ्याची वंश सुधारणा करण्यासाठी गरजेचे आहे. वासरांची ओळख पटविण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जातो, परंतु सर्वांत उत्तम मार्ग हा टॅगिंग करणे, अर्थात कानात ओळख क्रमांक असलेला बिल्ला बसविणे होय. विशिष्ट ओळख क्रमांक

  • केंद्र शासनामार्फत जनावरांना विशिष्ट ओळख क्रमांक असलेले बिल्ले बसवून त्यांची नोंदणी करण्यात येत आहे.
  • बिल्ला बसविताना तो विशिष्ट ओळख क्रमांक असलेला असावा, जेणे करून भविष्यात त्याच क्रमांकाचे दुसरे जनावर असणार नाही. सदर बिल्ला क्रमांक वापरून कालवडीची नोंद आपल्याकडील अॅप्लिकेशन वर किंवा सॉफ्टवेअरमध्ये घ्यावी.
  • पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत केंद्र शासनाकडील ‘इनाफ’ या संगणक प्रणालीवर सुद्धा याची नोंद करून घ्यावी, जेणेकरून आपली कालवड महाराष्ट्रातच नाही, तर भारतात कुठेही विकली गेली तरी तेथे सुद्धा तिची वंशावळ जतन केली जाऊ शकेल. तसेच तिला वेळोवेळी केलेले लसीकरण याबाबत माहिती उपलब्ध होईल.
  • बिल्ला बसविण्याची पद्धत 

  • कालवड सात दिवसांची झाल्यावर बिल्ला कानात बसवून घ्यावा.
  • योग्य आकाराचे व क्रमांक स्पष्ट दिसेल असे बिल्ले घ्यावेत.
  • कालवडीला चांगले बांधून घ्यावे किंवा पकडावे.
  • बिल्ला बसवायच्या अॅप्लिकेटरमध्ये बिल्ला बसवून घ्यावा,
  • कानाच्या मधोमध रक्तवाहिनी टाळून बिल्ला क्रमांक कानाच्या आतमध्ये येईल, अशा प्रकारे बिल्ला बसवावा.
  • कालवडीच्या नोंदी 

  • कालवडीचा जन्म झाल्यापासून विविध नोंदी ठेवून व्यवस्थापन केल्यास योग्य पद्धतीने नियोजन होऊ शकेल.
  • नोंदी ठेवताना कालवडीची ओळख व वैयक्तिक माहिती, वजनाच्या नोंदी, आरोग्य विषयक नोंदी जसे जंतनिर्मूलन, लसीकरण इत्यादी, आहार विषयक नोंदी, प्रजनन विषयक नोंदी प्रामुख्याने ठेवण्यात याव्यात.
  • नोंदींचे फायदे 

  • कालवडीची वंशावळ अर्थात आई, वडिलांची माहिती जतन करता येते, ज्यामुळे कालवड भविष्यात किती दुग्धोत्पादन देऊ शकेल याबाबत अंदाज घेता येतो.
  •  उच्च वंशावळ असेल तर विक्री करताना अधिक दर मिळू शकतो, तसेच भविष्यात कालवडीच्या वडिलांच्या वंशावळीतील वळू पुन्हा वापरला जाणार नाही याची खात्री करून इनब्रीडिंग रोखता येईल.
  • वजनाच्या नोंदी घेतल्याने कालवडीच्या वयानुसार तिची योग्य वाढ होते किंवा नाही याकडे लक्ष देता येते. कमी वाढ असेल तर वेळीच नियोजन करून वजन वाढवता येते.
  • कालवडीच्या आरोग्यविषयक नोंदी जसे जंत निर्मूलन, लसीकरण याच्या नोंदी ठेवल्यास योग्य वेळी जंत निर्मूलन, लसीकरण केले जाते. भविष्यात पुन्हा कधी करायचे याबाबत नियोजन करणे सोपे होते.
  • जंत निर्मूलन व लसीकरण योग्य वेळी झाल्यास कालवडीचे आरोग्य उत्तम राखणे सहज शक्य होते.
  • ब्रुसेल्लोसिससारख्या आजाराची लस आयुष्यात एकदाच ४ ते ८ महिने वयात असताना द्यायची असते, लस योग्य वयातच दिली गेल्याची खात्री करता येते.
  • प्रजननविषयक नोंदी ठेवल्यास पहिला माज कधी व किती वजन असताना आला होता, तिला कधी कृत्रिम रेतन केले, गाभण राहिली किंवा नाही, कालवड कधी विणार इत्यादी गोष्टीबद्दल सर्व माहिती उपलब्ध झाल्यास गाभण काळातील व वितानाचे व्यवस्थापन करणे सोपे जाते. कृत्रिम रेतन करताना कुठला वळू वापरला आहे याबाबत माहिती जतन करता येते.
  • कालवडीचे वजन 

  • कालवडीचे वजन माहीत असणे, तिच्या योग्य व्यवस्थापनासाठी अत्यंत आवश्यक आहे.
  • कालवडीची जन्मतः वजन नोंद घ्यावी. तसेच दर महिन्याला वजनाची नोंद ठेवल्यास अपेक्षित वजनवाढ होते का? यावर लक्ष ठेवता येते. योग्य वजन वाढ मिळत नसेल तर वेळीच उपाययोजना करता येतात.
  • वजन घेण्यासाठी दोन पद्धती वापरतात, एक म्हणजे वजन काटा वापरून प्रत्यक्ष वजन घेणे आणि दुसरे कालवडीच्या शरीराची मोजमापे घेऊन त्यानुसार अंदाजे वजन काढणे.
  • वजन काटा वापरून वजन करणे 

  • खरेतर वजन काटा वापरून वजन घेणे हीच योग्य पद्धत आहे. त्यामुळे कालवडीचे अचूक वजन मोजता येते.
  • परंतु सर्वच पशुपालकांकडे जनावरांचे वजन घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटा असेल असे नाही. तसेच मोठ्या जनावरांसाठी मोठा वजन काटा आवश्यक असतो, ज्याचा खर्च कोणत्याच पशुपालकांना करणे शक्य नसतो.
  • शरीराचे मोजमापे घेऊन अंदाजे वजन काढणे 

  • छातीचा घेर आणि लांबी मोजून (चित्रात दाखवल्याप्रमाणे) खाली दिलेल्या सूत्रानुसार सुद्धा अंदाजे वजन काढता येते.
  • पुढच्या पायाच्या मागे छातीचा घेर मोजावा आणि लांबी चित्रात दाखविल्याप्रमाणे पुढील पायाच्या सांध्यापासून शेपटी जवळील हाडाच्या उंचवट्यापर्यंत मोजावी. लांबी व छातीचा घेर हा इंचात मोजावा आणि खालील सूत्र वापरून वजन काढावे.
  • वजन (किलो) = [छातीचा घेर(इंच) × छातीचा घेर(इंच) × लांबी(इंच)] / ६६० छातीचा घेर मोजून वजन काढणे  फक्त छातीचा घेर मोजून कालवडीचे अंदाजे वजन घेता येते. यासाठी खास वजन घेण्याचे टेप बाजारात उपलब्ध आहेत किंवा आपल्याकडील टेप ने छातीचा घेर मोजून खालील तक्त्यानुसार वजन काढावे. गाईच्या छातीचा घेर आणि त्यानुसार अंदाजे वजनाचा तक्ता  

    छातीचा घेर (सेंमी.)  वजन (किलो)  छातीचा घेर (सेंमी.) वजन (किलो)
    ७० ३४ १४० २२८
    ८० ४९ १५० २७५
    ९० ६८ १६० ३२९
    १०० ९० १७० ३८९
    ११० ११७ १८० ४५५
    १२० १४९ १९० ५२८
    १३० १८६ २०० ६०९

    कालवडींची शिफारस केलेली दैनंदिन वाढ दर्शविणारा तक्ता

    वय (महिने) दैनंदिन वजन वाढ (ग्रॅम)  कालवडीचे एकूण वजन (किलो)
    ० ते २  ५५० ते ६००  ७४ -७५
    ३ ते ८  ८०० ते ८५०  २२०-२३०
    ९ ते १५  ६७५ ते ७२५  ३६५-३८५
    १६ ते २२  ६०० ते ६५०  ४९५-५३०
    २३ ते २४  ३०० ते ३५०  ५१०-५५०

    संपर्क :  डॉ. सचिन रहाणे, ९९७५१७५२०५ (डॉ. सचिन रहाणे हे पशुवैद्यकीय दवाखाना डिंगोरे, ता. जुन्नर, जि. पुणे येथे पशुधन विकास अधिकारी आणि डॉ. दिनेश भोसले एबी व्हिस्टा कंपनीचे विभागीय विक्री संचालक (दक्षिण आशिया)आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com