Antibiotic-Free Animal Treatment : शेतकऱ्यांसाठी गोठ्यातील गाय, बैल, म्हैस अशी मोठी जनावरे आणि शेळ्या, मेंढ्यासारखी लहान जनावरेही मोलाची असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, हा त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा एक भाग असतो. अलीकडे जनावरांची संख्या अधिक ठेवून व्यावसायिक पद्धतीने उत्पादन घेणारेही असंख्य शेतकरी आहेत. या दुधाळ किंवा मांसल जनावरांच्या पचनशक्तीची काळजी घेतली तर त्यांच्या दूध आणि मांसाच्या उत्पादन व दर्जात फार फरक पडतो. त्यासाठी ओल्या आणि कोरड्या चाऱ्याचे नियोजन अत्यंत मोलाचे ठरते. .त्याच प्रमाणे एका गोष्टीकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते, ते म्हणजे जनावरांच्या पिण्याचे पाणी. कारण ही जनावरे दिवसभरात आपल्या वजनाच्या दहा टक्के इतके पाणी पितात. जनावरांना दिले जाणारे पाणीच जर ऑक्सिजनेटेड (डिझॉल्व्ह) दिले तर त्यांच्या पचनसंस्थेतील हानिकारक जिवाणूंचे निर्मूलन होऊन पचन प्रक्रिया वेगाने घडविणाऱ्या चांगल्या जिवाणूंच्या संख्येत वाढ होऊ शकते, असे अनेक प्रयोगांमध्ये सिद्ध झाले आहे. सलग तीस दिवस ऑक्सिजनेटेड पाणी दिल्यामुळे हा परिणाम मिळाला होता. जनावरांच्या पचनक्षमतेमध्ये वाढ झाल्याने खाललेल्या चाऱ्यातून मिळणारे अन्नघटक उत्तमरीत्या शोषले गेले. परिणामी त्यांच्या दूध उत्पादनामध्ये वाढ मिळण्यासोबतच दर्जातही वाढ नोंदवली होती. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे जनावरांची पुनरुत्पादन क्षमता नैसर्गिकरीत्या वाढते..Oxygenated Water : आरोग्यपूर्णतेसाठी ऑक्सिजनयुक्त पाणी.शुद्ध पाण्याचे महत्त्वबहुतांश शेतकऱ्यांचे गोठे हे शेतामध्ये असतात. तिथे उपलब्ध विहीर किंवा बोअरवेलचे पाणी जनावरांसाठी दिले जाते. शेतामध्ये वापरले जाणारे रासायनिक घटक (उदा. तणनाशक, बुरशीनाशके, कीटकनाशके व रासायनिक खते) हे चाऱ्याद्वारे जनावरांच्या आहारात जातात. त्याच प्रमाणे अतिरिक्त शिल्लक अंश हे निचऱ्याद्वारे पाण्यामध्ये उतरत असतात. त्यांचे विषारी अवशेष चारा आणि पाण्यासोबत जनावरांच्या शरीरात जातात. यामुळे जनावरांच्या आरोग्यावर, दूध उत्पादनावर आणि पुनरुत्पादन क्षमतेवरही गंभीर परिणाम घडवतात. त्यामुळेच जनावरांनाही शुद्ध पाणी देण्याबाबत पशुवैद्यक आग्रही असतात. अशा स्थितीमध्ये ऑक्सिजनेटेड पाणी जनावरांनाही पिण्यासाठी दिल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतात. विशेषतः शरीरातील विषारी घटकांचे अंश कमी होण्यास मदत होते. त्यांची चयापचय क्रिया सुधारते. परिणामी आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्याचा प्रत्यय दुधाचे वाढलेले प्रमाण व वाढलेल्या दर्जातून दिसून येतो. पॅथोजन कमी झाल्याचे मलमूत्र तपासणीतून कळू शकते..दुधाची टिकवणक्षमता वाढविण्यासाठी...गाई म्हशींचे दूध काढल्यानंतर वीस मिनिटात त्यांचे चिलिंग केले पाहिजे. या प्रक्रियेत दुधाचे तापमान सामान्यतः चार अंश सेल्सिअसपर्यंत खाली आणले जाते. त्यामुळे दुधाचे मूळ गुणधर्म टिकून राहतात. पण व्यावहारिक पातळीवर अनेक कारणांमुळे दूध काढणीनंतर वीस मिनिटांच्या आत चार अंश तापमानामध्ये नेऊन साठवणे शक्य होतेच असे नाही. कारण बहुतांश शेतकऱ्यांकडे स्वतःची चिलिंग यंत्रणा नसते. त्यामुळे दूध काढणीनंतर ते दूध संकलन केंद्रावर पोचेपर्यंत बराच काळ जातो. यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. दुधाचा सामू बदलतो. दूध केंद्रावर अनेक शेतकऱ्यांचे दूध एकत्रित केले जाते. त्याच्यावर चिलिंगची प्रक्रिया केली जाते. त्यानंतर ते टँकरद्वारे दूरवर पाठवले जाते. या प्रवासात लागणाऱ्या वेळेप्रमाणे त्यातील जिवाणूंचे प्रमाण (बॅक्टेरियल लोड) वाढत जातो. दूध खराब होण्याची शक्यता वाढते.याला टिकविण्याच्या टप्प्यामध्ये एक छोटासा बदल केला तरी हे नुकसान टाळता येणे शक्य आहे. दुधाच्या धारा काढून झाल्यानंतर त्यात विशिष्ट मात्रेत ऑक्सिजन असलेले पाणी अल्प प्रमाणात मिसळता येते. त्यामुळे दुधामध्ये हानिकारक जिवाणू निर्मितीची प्रक्रिया तीन ते चार तासांनी पुढे ढकलली जाते. म्हणजे दुधाची टिकवणक्षमता तीन ते चार तासांनी वाढवली जाते. यासाठी पशुपालकांना किंवा डेअरीला येणारा प्रति लिटर खर्चही खूप कमी असू शकेल..Animal Care : जनावरांतील सांसर्गिक श्वसनलिका दाह.औषधी कंपन्यांतही उपयोगीऔषधांची निर्मिती करताना सर्व परिसरात अतिस्वच्छ व पूर्ण निर्जंतुक असणे गरजेचे असते. या उद्योगामध्ये यंत्रांसोबत तिथे वापरली जाणारी सर्व भांडी निर्जंतुक असली पाहिजेत. सध्या वापरल्या जाणाऱ्या रासायनिक निर्जंतुकांना पर्याय म्हणून ऑक्सिजनेटेड पाणी लोकप्रिय ठरत आहे.उपचारांमध्ये उपयोगगाय वा म्हैस व्यायल्यानंतर त्यांचे गर्भाशय आतून स्वच्छ होण्याची प्रक्रिया नैसर्गिकरीत्या होत असते. मात्र काही वैद्यकीय कारणांमुळे तसे होत नाही. प्रसूतीच्या प्रक्रियेमध्ये गर्भाशयाला जखमा झालेल्या असू शकतात. बऱ्याच वेळा गर्भाशयात फायब्रॉसिस सारख्या विकारांनी गर्भाशय व्यापले जाते. अशा समस्यांवरील उपचारांमध्ये पुन्हा प्रतिजैविकांचा (अँटिबायोटिक्स) वापर केला जातो. या प्रतिजैविकांच्या वापरामुळे हानिकारक जिवाणूंसोबतच चांगल्या जिवाणूंचाही नाश होतो. परिणामी जनावरांची प्रतिकारशक्ती कमकुवत राहते..प्रतिजैविकांच्या अतिवापराचे या प्राण्यांच्या शरीरावरही वाईट परिणाम होतात. पुन्हा गरोदर राहण्याच्या समस्या निर्माण होतात. आरोग्यावर परिणाम करणाऱ्या या घटकांसोबतच त्यांच्या दुधामध्ये प्रतिजैविकांचे अंश उतरू शकतात. ते दूध पिणाऱ्यांच्या शरीरात पोचून दुष्परिणाम करू शकतात. हे सर्व टाळण्यासाठी जनावरांच्या प्रसूतीनंतर गर्भाशय (युटेरस) विशिष्ट मात्रेच्या ऑक्सिजनेटेड पाण्याने धुवून घेण्याचे प्रयोग फायद्याचे दिसले आहेत. त्यामुळे अँटिबायोटिक वापरण्याची गरज पडत नाही आणि संभाव्य दुष्परिणाम टळतात..गाई म्हशींना सार्वत्रिक होणारा आजार म्हणजे कासदाह (मस्टायसिस). हा कासेला होणारा आजार आहे. दूध काढल्यानंतर पुढील सात ते आठ मिनीट त्यांच्या सडांची तोंडे उघडीच राहतात. ती उघडी असतानाच जनावर खाली बसल्यास जमिनीवर अस्वच्छतेमुळे सडांच्या तोंडाला जिवाणूंचा प्रादुर्भाव होतो. त्यातून स्तनांना जखमा होतात. या जखमांमुळे जनावरे संपूर्ण दूध काढू देत नाहीत. या आजारावरील उपचारामध्ये प्रतिजैविकांचा वापर केला जातो. त्या पेक्षा या आजाराच्या उपचारामध्येही विशिष्ट मात्रा असलेले ऑक्सिजनचे पाणी इंजेक्शनद्वारे सडांना टोचता येते. किंवा दूध काढणीनंतर सड या पाण्याने धुतल्यास दुभती जनावरे कासदाहापासून दूर राहू शकतात. गुजरातमधील दुग्ध व्यवसायातील मोठ्या डेअरी उद्योगसमूहाने या उपचार पद्धतीचा वापर सुरू केला आहे. त्यांना समाधानकारक परिणाम मिळत आहेत. अलीकडे महाराष्ट्रामध्येही काही व्यावसायिक स्वतःच्या पातळीवर याचा वापर करू लागले आहेत.- सतीश खाडे ९८२३०३०२१८,(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.