डाॅ. सचिन गायकवाड, प्रणिता खांडेभराड, के.जी. सोळंकीभारतातील दुग्धव्यवसायामध्ये म्हशींना अनन्य साधारण महत्त्व आहे. जगात म्हशींची सर्वात जास्त संख्या (सुमारे १०९.८५ दशलक्ष म्हशी) भारतात आढळते. महाराष्ट्रामध्येत्यांची संख्या ५.६ दशलक्ष इतकी आहे.भारतात उत्पादीत एकूण दुधामध्ये म्हशींच्या दुधाचा वाटा ५५ टक्के आहे.दुग्धोत्पादनासाठी उत्तम जातींची ओळख या लेखातून करून घेऊ. दुधाळ म्हशींच्या प्रमुख जाती ः मुऱ्हा, सुरती, मेहसाणा, जाफराबादी, निलीरावी, नागपुरी, पंढरपुरी, तोडा, भदावरी इ. यापैकी महाराष्ट्रामध्ये मुऱ्हा, सुरती, मेहसाणा, जाफराबादी, नागपुरी, पंढरपुरी इ. म्हशींचे पालन प्रामुख्याने केले जाते. .मुऱ्हा‘मुऱ्हा’ ही जात हरियाणा राज्यातील रोहटक, कर्नाल, हिस्सार व गुरगाव या जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर प्रदेशामधील मेरठ या जिल्ह्यामध्ये आढळते. या म्हशी आकाराने मोठ्या असून, त्या मानाने डोके लहान व मान आखूड असते. या म्हशी प्रामुख्याने काळ्या रंगाच्या असतात. शिंगे गोल, लहान, चपटी, प्रथम मागे व नंतर पुढे वळलेली असतात. या जनावरांची छाती रुंद व पाय आखूड असतात. त्यांचे कान व शेपटी लांब असते. त्यांच्या शेपटीचा गोंडा काळ्या रंगाचा असतो. डोके, शेपटीचा गोंडा व पायावर क्वचित पांढरा रंग आढळून येतो. या जातीतील म्हशींचा दूध देण्याचा काळ हा साधारणतः ३०० दिवस असतो. म्हशींचे वजन हे अंदाजे ३५० ते ७०० किलोपर्यंत असून, एका वेतात सुमारे २००० ते २५०० लिटरपर्यंत दूध देण्याची क्षमता असते. त्यांच्या दुधामध्ये ७ टक्के स्निग्धांश असतात. पहिल्या वेताचे वय साडेचार ते पाच वर्षे असून दोन वेतातील अंतर हे १८ ते २० महिने असते..Indigenous Buffalo Breed : राज्याला मेळघाट, गौळाऊ म्हैस मिळणार.मेहसानाया जातीच्या म्हशी गुजरात राजाच्या मेहसाना व बडोदा जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या आढळतात. यांची उत्पत्ती सुरती व मुऱ्हा जातीच्या म्हशींपासून झालेली असावी. या म्हशी सुरती म्हशीप्रमाणे भुऱ्या किंवा करड्या व मुऱ्हाप्रमाणे काळ्या रंगाच्या असतात. त्यांचे आकारमानही या दोन जातीच्या दरम्यान आढळते. या जातीच्या म्हशींची शिंगे मुऱ्हाप्रमाणे कमी वळलेली व मुरडलेली असतात. या म्हशींच्या कपाळावर व शेपटीवर पांढऱ्या रंगाची केस असतात. या म्हशींची लांबी कमी असते. डोके जाड व पाय आखूड असतात. छाती भरदार दिसते. या म्हशींची प्रजनन क्षमता ही चांगली असून त्या लवकर वयात येतात. त्यामुळे त्यांचा नागरी भागात बराच प्रसार झालेला आहे. या म्हशींचे प्रथम वेतातील वय साडेतीन वर्षे तर दोन वेतातील अंतर हे सोळा महिने असते. एका वेतातील सरासरी दूध उत्पादन १८०० ते २४०० हजार लिटर पर्यंत असते..जाफराबादीही म्हैस गुजरात राज्यातील अमरेली जिल्ह्यामधील जाफराबाद येथील मूळची जात आहे. ही जात काठीयावाड, सौराष्ट्र आणि कच्छ भागात सुद्धा आढळते. या भागामध्ये मालधारी लोकांच्या १३५ वसाहतीमध्ये या जातीच्या २५०० म्हशी आहेत. येथील शेतकरी या जातीचे उत्पादन पिढ्यान् पिढ्या करत आलेले आहे. सामान्यतः जंगलात उगवलेल्या ताज्या गवतावरच या म्हशींची गुजराण होते. सामान्यतः या म्हशी काळ्या रंगाच्या असतात. शिंगे जाड व रुंद मानेच्या दोन्ही बाजूला खाली वाकून टोकाजवळ थोडी मुरडलेली असतात. शरीर लांब व डोके मोठे असते. डोळे लहान व माथ्याला खालून चिटकविल्याप्रमाणे दिसतात. कान व शेपटी लांब असते. या म्हशींचे प्रथम विण्याचे सरासरी वय साडेचार ते पाच वर्षे आणि दोन वेतातील वजन हे १७ ते २१ महिने असते. एका वेतामध्ये सरासरी २१०० लिटर दूध देते. काही निवडक म्हशींमध्ये ३००० ते ३५०० लि. दूध देण्याची क्षमता असल्याचे दिसून येते..नागपुरीविदर्भामध्ये प्रामुख्याने नागपूर व इलीचपूर भागामध्ये या म्हशी आढळतात. डोंगराळ प्रदेशातील निकृष्ट दर्जाच्या गवतावर या म्हशी उत्तम तऱ्हेने तग धरू शकतात. त्यामुळे अशा म्हशी दुर्गम व दुुष्काळी भागात दुग्धोत्पादनासाठी फार उपयुक्त आहेत. साधारणतः काळा रंग, अतिशय लांब शिंगे ही चपटी व टोकदार, खांद्यापर्यंत पोहचणारी व वरच्या बाजूस वळलेली असतात. शिंगावरती मंगळसुत्राप्रमाणे वेटोळे दिसतात. या म्हशींची प्रजनन क्षमता जास्त असते. या म्हशींचा चेहरा, पाय व शेपटीचा गोंडा पांढरा असतो. या म्हशींचे वजन साधारणतः ४०० किलोग्रॅम पर्यंत असते. एका वेतात १००० ते १२०० लिटरपर्यंत दूध देण्याची क्षमता असते..सुरतीया जातीच्या म्हशी गुजरात राज्यातील सुरत व खेडा जिल्ह्यातील नडियाद, आनंद व बोर्सद या तालुक्यात आणि त्या लगतच्या साबरमती व मही या नद्यांच्या सभोवताली आढळतात. मध्यम चणीच्या या म्हशी बांधेसूद असून अन्य जातीच्या मानाने चपळ असतात. या म्हशींचा रंग भुरा किंवा तपकिरी असतो. अंगावरील केस रुपेरी, करड्या रंगाचे असतात. या म्हशींच्या गळ्याच्या खाली दोन पांढरे पट्टे असतात. शिंगे मध्यम आकाराची असून विळ्यासारखी वळलेली असतात. पाठ सरळ व पाय आखूड असल्यामुळे त्यांचा बांधा ठुसका वाटतो. कास मोठी असते. तसेच कानाच्या आतील भागाचा रंग गुलाबी असतो. वजन अंदाजे ४५० ते ६५० किलो असते. एका वेतातील सरासरी दूध उत्पादन १६०० ते २२०० लिटर असून त्यात ७.५ टक्के स्निग्धांश असतो. पहिल्या वेताचे वय साडेतीन ते चार वर्षे असते. दोन वेतातील अंतर १६ ते १८ महिने असते..Buffalo Farming: म्हैसपालनात स्वच्छता, चारा, आरोग्यावर भर.मराठवाडीया जातीच्या म्हशी महाराष्ट्रातील पूर्णा व दुधना नदीच्या सभोवताली आढळतात. यांचे वास्तव्य गोदावरी नदीकडील उत्तर भागात म्हणजेच बीड, जालना, परभणी, नांदेड व लातूर जिल्ह्यामध्ये आढळते. या म्हशीचे आकारमान मध्यम असून तिची कातडीच्या केसांचा रंग काळा असतो. परंतु चेहरा, पाय व शेपटीचा गोंडा यावरती पांढऱ्या रंगाच्या खुणा असतात. त्यामुळे तिला ‘चंद्री’ या नावाने सुद्धा संबोधले जाते. तिचे शिंगे लांब, आतील बाजूस वळलेले आणि खांद्यापासून वरच्या बाजूस वळलेली असतात. या म्हशींचे वजन अंदाजे ४०० किलोपर्यंत असून एका वेतात सुमारे १००० लिटर पर्यंत दूध देण्याची क्षमता असते. पहिल्या वेताचे वय अंदाजे चार ते साडेचार वर्ष पर्यंत असते. दोन वेतातील अंतर हे ४१५ दिवस असते..पंढरपुरीया म्हशींचे मूळ स्थान हे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुका मानला जातो. त्यावरूनच तिला पंढरपुरी म्हैस म्हणून संबोधले जाते. या म्हशी काही प्रमाणात मराठवाडा व विदर्भातही आढळून येतात. पंढरपुरी म्हशी या आकारमानाने मध्यम, बांधेसूद व मांसलपणा कमी असतो. या म्हशींचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे काळा रंग, शेपटीचा पांढरा गोंडा, तलवारीसारखी लांब शिंगे व नाक, अरुंद कपाळपट्टी तसेच कास व सड मोठे सुबक आकाराचे असतात व त्यांची चारही सडांची ठेवण ही एकसारखी असते. या जातीतील म्हशी अत्यंत गरीब स्वभावाच्या व शिस्तीत चालणाऱ्या असतात. या जातीच्या गुणधर्मामुळे ही जात ग्राहकाभिमुख म्हणून ओळखली जाते. या म्हशींचे वजन ३५० ते ४५० किलो असते. पहिल्या वेताचे वय तीन ते साडेतीन वर्ष असते. दोन वेतातील अंतर १४ ते १६ महिने असते. एका वेतातील सरासरी दूध उत्पादन हे ११०० ते १४०० लिटरपर्यंत असू शकते.डाॅ. सचिन व्ही. गायकवाड ९८८१६४४३६५सहाय्यक प्राध्यापक, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग,छ.शा.म.शि.संस्था, कृषी महाविद्यालय, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.