आरोग्यदायी शेळीचे दूध...

जाखराना शेळीपासून दररोज सरासरी ३ लिटर दूध मिळू शकते. सिरोही, मारवाडी, बीटल व जमनापारी या जातीच्या शेळ्यापासून प्रतिदिन १ ते २ लिटर दूध मिळते. शेळ्यामधील दुधाच्या उत्पादन वाढीकरिता आनुवंशिक सुधारणा होणे आवश्यक आहे.
Goat Milk
Goat MilkAgrowon

शेळ्यांपासून मांस आणि दूध मिळते. याशिवाय शेळ्यांच्या केसापासून धागा (पश्मिना), कातडी आणि लेंडी खत मिळते. शेळ्या कमी प्रतीचा तंतुमय चारा, पिकांचे अवशेष, झाडपाला व झुडपे इत्यादी पदार्थ खाऊन त्याचे रूपांतर मांस व दुधामध्ये करतात. त्यापासून उच्च गुणवत्तेची प्राणीजन्य प्रथिने मिळतात.

भारतातील एकूण दूध उत्पादनापैकी ३.४ टक्के दूध शेळ्यांपासून उपलब्ध होते. भारतात शेळ्यांच्या ३४ नोंदणीकृत जाती आहेत. त्यापैकी जाखराना, सिरोही, मारवाडी, बीटल, जमनापारी या जातीच्या शेळ्या प्रामुख्याने मांस व दूध याकरिता पाळल्या जातात. जाखराना शेळीपासून दररोज सरासरी ३ लिटर दूध मिळू शकते. सिरोही, मारवाडी, बीटल व जमनापारी या जातीच्या शेळ्यापासून प्रतिदिन १ ते २ लिटर दूध मिळते. देशामध्ये प्रतिशेळी प्रतिदिन सरासरी ०.४५० किलो दूध प्राप्त होते. यामुळे दुधाच्या उत्पादन वाढीकरिता शेळ्यामध्ये आनुवंशिक सुधारणा होणे आवश्यक आहे.

शेळ्या, मेंढ्या, उंट, घोडा, गाढव आणि इतर पर्वतीय प्राण्यांपासून मिळणारे दूध आणि त्यांच्यापासून बनविलेल्या दुग्धजन्य पदार्थांचे नियमित सेवन केल्याने मधुमेह, कर्करोग, हृदयाचे विकार, पोटाचे रोग कमी होण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे संशोधनामधून आढळून आले आहे.

दुधाच्या रासायनिक संरचनाबाबत तुलनात्मक तक्ता

घटक --- गाईचे दूध --- शेळीचे दूध --- मेंढीचे दूध

स्निग्ध पदार्थ (१०० ग्रॅम)---३.३---३.८---५.९

लेक्टोज (१०० ग्रॅम)---४.७---४.१---४.८

प्रथिने (१०० ग्रॅम)---३.४---३.७---५.५

केजीन (१०० ग्रॅम)---३.०---२.४---४.७

अल्पा एस - १ केजीन %---३९.७---५.६---६.७

अल्पा एस - २ केजीन %---१०.३---१९.२---२७.८

बीटा केजीन %---३२.७---५४.८---६१.६

काप्पा केजीन %---११.६---२०.४---८.९

खनिजे (मिलीग्रॅम / १००)

कॅल्शिअम---११२---१३०---१९७.५

मॅग्नेशिअम---११---१४.५---१९.५

फॉस्फरस ---९१---१०९---१४१.५

सोडिअम---१४५---१८५.५---१३८.०

सेलेनियम---१.८---१.६७---१.७

मॅंगेनीज---६.०---८.०---७.१५

जीवनसत्त्वे

जीवनसत्त्व अ (मायक्रो ग्रॅम /१००)------३७.०---५४.३२---६४

शेळीच्या दुधाची रासायनिक संरचना ः

१) गाय, शेळी आणि मेंढीच्या दुधाची रासायनिक संरचनामध्ये विभिन्नता आहे. जनावरानुसार दुधाची रासायनिक आणि भौतिक रचनेमध्ये विभिन्नता असते. दुधामध्ये स्निग्ध पदार्थ, प्रथिने, दुग्धशर्करा, खनिजे, एन्जाइम, हार्मोन्स, प्रतिजैविक अणू, जीवनसत्त्वे आणि पेशी असतात.

२) दुधामधील प्रथिने दोन भागामध्ये विभागली जातात. यामध्ये अविरघळणाऱ्या प्रथिनांना “केजीन प्रोटीन” म्हणतात. विरघळणाऱ्या प्रथिनांना “व्हे प्रोटीन” असे म्हणतात. केजिन प्रोटीनमध्ये अल्पा एस -१, अल्फा एस -२, बीटा आणि काप्पा केजीन असतात. तसेच व्हे प्रोटीनमध्ये अल्फा लेक्टोअल्बुमिन आणि बीटा-लक्टोग्लोबुलीन असतात. याखेरीज दुधात आणखी काही प्रथिनेही असतात.

३) प्राण्यांच्या प्रजातीपासून मिळणाऱ्या दुधाची रचनादेखील

विविध घटकांद्वारे प्रभावित होते. शेळीच्या दुधात काही विशेष गुण आहेत, जे पौष्टिकदृष्ट्या गाईच्या दुधापेक्षा शेळीचे दुधाचे गुणधर्म वाढवितात. उदाहरणार्थ, चरबीचे कण आकाराने छोटे (१८० ते २६० नॅनोमीटर) असतात, यामुळे यापासून बनविलेले दुग्धजन्य पदार्थांची प्रत लुसलुशीत असते.

४) शेळीच्या दुधामध्ये असलेले अल्फा एस -१ केजीनच्या अल्प प्रमाणामुळे यापासून बनविलेले दुग्धजन्य पदार्थ लुसलुशीत असतात. शेळीच्या दुधापासून तयार करण्यात आलेले दुग्धजन्य पदार्थांमध्ये पाणी ग्रहण करण्याची क्षमता वाढते. दुग्ध पदार्थातील चिकटपणा कमी होतो.

५) वेगवेगळ्या प्राण्यांच्या दुधामध्ये केजीन प्रोटीनची संरचना आणि आकारामध्ये फरक आढळून येतो. त्याचप्रमाणे, विविध खनिजे, जीवनसत्त्वे आणि प्रथिनांमध्ये फरक आढळतो.

६) गाईच्या दुधाच्या तुलनेत शेळीच्या दुधात केजीन प्रथिनांचे प्रमाण कमी तर कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस या खनिजांचे प्रमाण जास्त असते. जीवनसत्त्व ‘अ’चे प्रमाण शेळीच्या दुधामध्ये जास्त असते. म्हणूनच शेळीचे दूध मानवी पोषणासाठी एक चांगला पर्यायी स्रोत आहे.

७) शेळीच्या दुधाच्या संरचनेत होणारा कोणताही बदल त्यांच्या पौष्टिक आणि आर्थिक मूल्यांवर परिणाम करतो. ज्यामुळे निर्माण होणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. गायीप्रमाणे, शेळीच्या दुधामध्ये सुद्धा केजीन प्रोटीनचे अल्फा एस -१, बीटा, अल्फा एस - २ आणि काप्पा असे चार प्रकार आढळतात. परंतु यांची मात्रा गाईच्या दुधामध्ये असलेल्या मात्रेपेक्षा विभिन्न असतात.

८) बीटा केजीनचे प्रमाण शेळीच्या दुधामध्ये जास्त तर अल्फा एस -१ केजीनचे प्रमाण गाईच्या दुधात जास्त असते. शेळीच्या दुधात अल्फा एस - २ केजीन प्रथिने जास्त असतात. परंतु शेळीच्या दुधामधील एकूण अल्फा एस -१ आणि एस - २ चे एकूण प्रमाण गाईच्या दुधामधील अल्फा एस -१ च्या तुलनेत कमी असते. त्याचप्रमाणे शेळीच्या दुधात काप्पा केजीनचे प्रमाणही जास्त असते. या विभिन्नतेमुळे, शेळीच्या दुधाचे दही लुसलुशीत बनते. शेळीचे दूध मानवाकरिता चांगले पचनीय आहे.

‍शेळीच्या दुधाचे पौष्टिक आणि औषधी गुणधर्म

पचन क्षमता :

१) शेळीचे दूध मानवी शरीरासाठी पौष्टिक व औषधी गुणधर्म असलेले दूध आहे.

२) शेळीचे दूध आणि त्याची उत्पादने गायीच्या दुधापेक्षा मानवी शरीरात अधिक पचनीय असते. कारण शेळीच्या दुधामधील प्रथिनांचे कण हे आकाराने लहान असल्यामुळे पचन संस्थेत चांगले पचते.

३) शेळीच्या दुधामध्ये अल्फा एस -१ केजीनचे कमी असलेले प्रमाण मानवी पचनक्रियेसाठी खूप उपयुक्त आहे.

जिवाणू प्रतिबंधक गुणधर्म :

१) शेळीच्या दुधात असलेले लेक्टोपरऑक्सिडेज घटकाचे प्रमाण विविध रोगकारक जिवाणू जसे कॉलरा, टायफॉइड, न्यूमोनिया, अतिसार आणि अन्न-विषबाधा वाढण्यास प्रतिबंधित करते. यामुळे अशा प्रकारच्या जिवाणूंमुळे होणाऱ्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते.

दूध ॲलर्जी प्रतिबंध :

१) काही लोकांना गाईचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून ॲलर्जी निर्माण होत असते. लहान बालके तसेच वयोवृद्ध व्यक्तींना गाईचे दूध पचत नसल्याने त्यांच्यामध्ये सुद्धा एलर्जिक लक्षणे दिसून येतात. याकरिता शेळीचे दूध हे एक उत्कृष्ट पर्यायी स्रोत आहे.

२) गायीच्या दुधामध्ये अल्फा एस -१ केजीनची मात्रा जास्त प्रमाणात असल्याने, शरीरात इम्युनोग्लोब्लिनचा स्राव वाढतो. यामुळे शरीरामधील एलर्जीकरिता कारणीभूत असलेले रासायनिक द्रव्यामध्ये वाढ होते.

३) शेळीच्या दुधामध्ये कमी प्रमाणात असलेले अल्फा एस -१ केजीन तसेच जास्त प्रमाणात असलेले बीटा केजीन एलर्जीकरिता कारणीभूत असलेले घटकांना कमी करते. अशा वेळी डॉक्टर रुग्णाला गाईच्या दुधाऐवजी शेळीच्या दुधाची शिफारस करतात.

४) गाईच्या दुधामध्ये असलेल्या लक्टोज शर्करेमुळे काही लोकांना गाईचे दूध पचायला जड जात असल्यामुळे असे लोक शेळीचे दूध सहज पचवू शकतात.

संपर्क ः डॉ. सचिन टेकाडे, ९३७०३४००५८ (सहायक संचालक, पुण्यश्‍लोक अहल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com