Wheat Avakali Paus: गहू पिकावर अवकाळी आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम कसा रोखाल?

Swarali Pawar

Wheat Crop Management: सध्या झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाची मदत, पीक विमा या गोष्टी बऱ्याच काळानंतर येतात. परंतु सध्या शेतकरी पिकामध्ये व्यवस्थापनात्मक उपाय करुन पिकाची काळजी घेऊन पीक वाचवू शकतात.

या नियोजनामध्ये गहू पक्वतेची लक्षणे आणि हवामानाच्या अंदाजानुसार निर्णय घेणे महत्त्वाचे असते. ढगाळ आणि दमट हवामानामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो, त्यामुळे गरजेनुसार योग्य फवारणी आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे आवश्यक आहे.

काढणीचा निर्णय

राज्यातील बहुतांश गहू हा पक्वतेच्या अवस्थेत आहे. जसे गव्हाचं संपूर्ण शेत हे सोनेरी रंगाचे होते, आणि गव्हाचा दाणा हा दाताखाली चावल्यास कडकन वाजतो तेव्हा गव्हाची काढणी करण्याची योग्य वेळ असते. गहू अशा अवस्थेत असताना पावसाचा अंदाज दिल्यास घाई करुन गव्हाची काढणी करावी. पीक परिपक्व झालेल्या अवस्थेत असताना अवकाळीचा फटका बसून पीक झोपून गेले तर पीक वाचवण्याच्या शक्यता धूसर होतात.

अन्नद्रव्यांचे नियोजन

गव्हाची उशिराने पेरणी ज्या भागांमध्ये केली त्याठिकाणी पिकाची काळजी घेता येऊ शकते. जसे पीक जर ९० दिवसांपूर्वीचे असेल तर त्याला पाणी देता येते. मात्र पाऊस पडून गेल्यास किंवा पावसाची शक्यता दिलेली असल्यास पिकाला पाणी देऊ नये. ९० दिवसांनंतर पिकाला पाणी देणे थांबवायचे आहे. तीन महिन्यांच्या आतील पिकाला शेतकरी ढगाळ हवामानात १९:१९:१९ खताची २ टक्के फवारणी करु शकतात, असा सल्ला गहू संशोधन केंद्रातील गहू पैदासकार डॉ. निलेश मगर यांनी दिला.

रोग नियंत्रण

उशिरा पेरणी केलेल्या गव्हावर ढगाळ हवामानाचा परिणाम होतो. जसे काळा व नारंगी तांबेरा आणि करपा रोगांचा गव्हावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसताच पिकावर मॅन्कोझेब ७५ डब्ल्यूपी किंवा किंवा झायनेब ७५ डब्ल्यू पी ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून किंवा टेब्युकोनॅझोल ५० टक्के अधिक ट्रायफ्लॉक्सीस्ट्रोबीन २५ टक्के डब्ल्यू पी डब्ल्यू जी १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या संयुक्त बुरशीनाशकाची फवारणी करावी.

तर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच कॉपर ऑक्झिक्‍लोराईड अधिक मॅन्कोझेब या बुरशीनाशकाची प्रत्येकी २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

कीड नियंत्रण

याशिवाय ढगाळ हवामानामुळे गव्हावर मावा खोडमाशी आणि खोडकीडा या किडींचा प्रादुर्भाव दिसू शकतो. यासाठी मेटारायझियम अॅनीसोप्ली ५० ग्रॅम किंवा बीव्हेरिया बॅसियाना ५० ग्रॅम किंवा व्हर्टिसिलियम लेकॅनी ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. मावा किडीचे रासायनिक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी थायोमेथॉग्जाम २५ टक्के विद्राव्य दाणेदार १ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात पंधरा दिवसाच्या अंतराने गरजेनुसार एक किंवा दोन फवारण्या कराव्यात.

डॉ. निलेश मगर, गहू पैदासकार, (९४२३५०७५१२)

डॉ भरत मालुंजकर, वरिष्ठ संशोधन सहायक, (९४०४०४९७११)

गहू संशोधन केंद्र, निफाड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.