Hipparkar Family and Farm Agrowon
यशोगाथा

Vegetable Farming Business : होय! वर्षभर भाजीपाला पिकवतो...थेट विक्री साधतो

Agriculture Success Story : कोरवली (जि. सोलापूर) येथील हिप्परकर कुटुंबाने अवलंबिली आहे. बाजार समितीत माल न विकता सर्वच्या सर्व माल आठवडी बाजारात हे कुटुंब स्वतः विकते. त्यांच्या दर्जेदार मालाची ग्राहकांना प्रतीक्षा असते. शेतात बांधलेला टुमदार बंगला कुटुंबाच्या कष्टाचे जणू प्रतीक झाला आहे.

सुदर्शन सुतार

Indian Agriculture : सोलापूर जिल्ह्यात मोहोळ-मंद्रूप महामार्गावर मोहोळ तालुक्यात कोरवली गाव आहे. ऊस, कांदा आणि भाजीपाला पिकांसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. सोलापूर हे बाजारपेठेचे ठिकाण येथून २० ते २५ किलोमीटर अंतरावर असल्याने या भागातील शेतकरी भाजीपाला पिकांना सर्वाधिक पसंती देतात.

गावात महादेव, ज्ञानेश्‍वर व संजय असे तीन हिप्परकर बंधूंचे कुटुंब एकत्र राहते. त्यांची १० एकर शेती आहे. त्यांचे वडीलही पहिल्यापासूनच शेतीच करायचे. लहानपणी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने इच्छा असूनही तिघा भावंडांना शिक्षण पूर्ण करता आले नाही, महादेव तिसरी, ज्ञानेश्‍वर आठवी आणि संजय पाचवीपर्यंतच शिकले. तिघेही वडिलांबरोबर शेतीत उतरले.

अडचणी सुरूच होत्या. पण दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करून त्यांनी कुटुंब चालवले. वीस वर्षांपूर्वी त्यांनी सर्व शक्ती एकवटून शेतीत बदल सुरू केले. भाजीपाला पिकांना सर्वाधिक प्राधान्य दिले. कष्टांना व्यावसायिक हुशारीची जोड दिली. आज भाजीपाला पिकांमधील पंचक्रोशीतील आघाडीचे शेतकरी म्हणून हिप्परकर कुटुंब नावारूपास आले आहे.

...असे आहे लागवड तंत्र

कुटुंबाचा भाजीपाला शेतीत १५ ते २० वर्षांचा तगडा अनुभव तयार झाला आहे.

ज्ञानेश्‍वर यांनी शेती व मातीचा अभ्यास वाढवला आहे. ते म्हणतात, की सततच्या व अति रसायनांच्या वापरातून मातीचे आरोग्य खालावत चालले आहे. त्यामुळेच रासायनिक कीडनाशके व खतांचा वापर त्यांनी ५० टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. अधिकाधिक सेंद्रिय पद्धतींचा वापर ते करतात.

एकूण १० एकर शेतीत वांगे हे प्रमुख पीक. सोबत मेथी, कोथिंबीर, टोमॅटो, मिरची, दोडका, कारले, शेवगा, काकडी. तर चार-पाच एकरांत ऊस.

प्रत्येक पीक दहा गुंठ्यात घेण्यात येते. त्याचे कारण म्हणजे हिप्परकर कुटुंब सर्व मालाची थेट आठवडी बाजारात ग्राहकांना विक्री करते. कोणताही माल व्यापाऱ्यांना वा बाजार समितीत दिला जात नाही. साहजिकच थोड्याच प्रमाणात उत्पादित करायचा व थेट विकायचा हे धोरण ठेवले आहे.

ज्ञानेश्‍वर सांगतात, की उन्हाळ्यात तीव्र तापमानात देखील मी मेथीसारखे पीक यशस्वी केले आहे.

त्याचे कारण पाणी देण्याची वेळ, ते किती वेळा द्यायचे याचा अभ्यास केला आहे. काही वेळा रात्री बारा वाजेनंतरही पाणी द्यावे लागते.

जिवामृत, स्लरी वापर करण्यासाठी दोन खिलार गायींचे संगोपन केले आहे.

घरातील सर्व जण शेतीत राबत असल्याने मजुरांवरील खर्च कमी झाला आहे. शेतीत सुसूत्रता आली आहे.

पालेभाज्या

प्रति १० गुंठ्यात सुमारे ३० दिवसांत मेथीच्या चार हजार ते पाच हजार पेंढ्यांपर्यंत उत्पादन.

प्रति पेंढ मिळतो २० ते ३० रुपयांपर्यंत दर.

कोथिंबिरीचे ३५ दिवसांत प्रति १० गुंठ्यात चार हजार पेंढ्यांपर्यंत मिळते उत्पादन. पेंढीला १० ते २० रुपयांपर्यंत मिळतो दर.

प्रातिनिधिक उत्पादन

वांगी

प्रत्येकी १० गुंठे क्षेत्रावर आलटून पालटून लागवड होते.

एक प्लॅाट संपेपर्यंत मागे दुसरा प्लॅाट तयार व्हायला हवा असे नियोजन.

वर्षभरात या पद्धतीने प्रति सहा महिन्यांचे असे दोन हंगाम घेता येतात.

सोलापूर जिल्ह्यातील ग्राहकांची पसंती ओळखून खासगी कंपनीचे निळ्या- जांभळ्या रंगाचे काटेरी व पांढऱ्या रंगाचे देशी अशा दोन वाणांची निवड ते करतात. निळ्या- जांभळ्या वाणाला अळीचा त्रास तुलनेने कमी असल्याने त्याला पसंती दिली आहे. तसेच रसशोषक किडीपासून पिकाचे नुकसान टाळण्यासाठी चिकट सापळ्यांचाही वापर केला आहे.

प्रति १० गुंठ्यात पाचशे क्रेटपर्यंत (प्रति क्रेट १७ किलो) उत्पादन मिळते.

थेट ग्राहकांना विक्री असल्याने किलोला ६० रुपयांपासून ते ८० रुपयांपर्यंत दर मिळतो.

कुटुंबाचे विक्री व्यवस्थेचे नियोजन

ग्राहकांना ताजी भाजी मिळावी यासाठी पहाटेपासून सकाळी ११ वाजेपर्यंत भाजीपाला काढणी होते. त्यानंतर ज्ञानेश्‍वर किंवा अन्य भाऊ यापैकी कोणी मोटारसायकलवर क्रेट ठेवून परिसरातील आठवडे बाजारात थेट विक्रीसाठी नेतात. किरकोळ विक्रेत्यांनाही हिप्परकर कुटुंबाच्या शेतीमालाची मोठी प्रतीक्षा असते. कोरवली परिसरात २० ते २५ किलोमीटर अंतरावरील गावांमध्ये आठवडे बाजार भरतात. सोमवारी-कामती, मंगळवारी-कुरुल, बुधवारी-पेनूर, गुरुवारी- बेगमपूर, शुक्रवारी-मंद्रूप, शनिवारी-कंदलगाव आणि रविवारी- मोहोळ-तिऱहे असे हे बाजार आहेत.

शेती परवडत नाही असे बोलले जाते. पण स्वानुभवावरून सांगतो की नियोजन काटेकोर असेल तर काळी आई तुम्हाला नक्की फायदा देते. आम्ही बाजार समितीत शेतीमालाची अजिबात विक्री करीत नाही. रासायनिक अवशेषमुक्त उत्पादनाकडे लक्ष देत गुणवत्ता वाढवत ग्राहकांमध्ये त्याची पत तयार केली आहे.
ज्ञानेश्‍वर हिप्परकर, ९९७०७३४८२५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : नांदेडला ज्वारी, उडीद, मुगाच्या पेरणीत यंदाही घट

Solar Power : सांगली जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये होतेय सौर ऊर्जेवर वीजनिर्मिती

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात १४ हजार हेक्टरवर उसाची लागवड

Dairy App: जनावरांचं संपूर्ण नियोजन कसं करावं?

Varkhede Barrage : शेळगाव, वरखेडे प्रकल्पांत जलसंचय यंदाही १०० टक्के अशक्य

SCROLL FOR NEXT