Women Farmer
Women Farmer  Agrowon
यशोगाथा

शेती नियोजनात तयार केली ओळख...

विकास जाधव 

सातारा शहरापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर भाटमरळी हे गाव आहे. गावशिवारात पाण्याची चांगली उपलब्धता असल्याने बहुतांश क्षेत्रावर ऊस, आले लागवड असते. या गावातील रवींद्र जाधव यांचे तीन भावाचे एकत्रित कुटुंब आहे. कुटुंबामध्ये १३ सदस्य एकत्रितपणे राहतात. रूपेंद्र मोठे बंधू मुंबई येथे असून दिवंगत राजेंद्र दोन नंबर आणि रवींद्र सर्वात लहान आहेत. कुटुंबाची १२ एकर शेतजमीन असून सर्व बागायत क्षेत्र आहे. रवींद्र शिक्षक असल्याने नोकरी करत असल्याने राजेंद्र सर्व शेती बघत होते. त्यांना मदत म्हणून रवींद्र यांच्या पत्नी उज्ज्वलाताई शेतीची कामे करत होत्या. राजेंद्र यांचे निधन झाल्याने दैनंदिन शेती नियोजनात अडचण तयार झाली. पती शिक्षक असल्याने त्यांना शेतीस वेळ देणे शक्य नसल्याने उज्ज्वलाताईंनी शेतीची जबाबदारी स्वतःकडे घेण्याचे ठरविले. पहिल्यापासून शेती नियोजनात सहभाग असल्याने मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी शेती व्यवस्थापनात बदल करण्यास सुरवात केली.

किफायतशीर कोथिंबीर ः

मागणी आणि दर लक्षात घेऊन उज्ज्वलाताई कोथिंबीर उत्पादन दसरा व दिवाळी सणामध्ये येईल अशा पद्धतीने लागवडीचे नियोजन करतात. सप्टेंबर महिन्यात एक ते दीड एकर क्षेत्रात कोथिंबीर लागवड होते. गादीवाफ्यावर धने पेरले जातात. सगळी कोथिंबीर एकाच वेळी काढणीस येऊ नये यासाठी चार ते पाच दिवसाचे अंतर ठेवून २० गुंठ्याचे तीन प्लॉट करून लागवड केली जाते. यामुळे काढणीही वेगवेगळ्या दिवशी होऊन योग्य अवस्थेतील कोथिंबीर विक्री करणे सोपे जाते. दरही चांगला मिळतो.

सप्टेंबरमध्ये लागवड केल्यावर दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत कोथिंबीर सुरू राहाते. सणाच्या काळात कोथिंबिरीस चांगली मागणी असल्याने दरही समाधानकारक मिळतो. साधारणपणे एकरी १२ ते १३ हजार जुड्या मिळतात. या काळात प्रत्येक जुडीला १० ते २० रुपयांपर्यंत दर मिळतो. त्यामुळे खर्च वजा जाता चांगला आर्थिक नफा मिळतो.

Women Farmer

शेती कामात रमलेल्या उज्ज्वला जाधव.

आले पिकांत मिरचीचे आंतरपीक ः

आले हे गावातील प्रमुख पीक आहे. उज्ज्वलाताई दरवर्षी किमान दीड एकर क्षेत्रावर आले लागवड करतात. मागील तीन वर्षापासून आले पिकांच्या दरात मोठी घसरण झाली असली तरी उज्वलाताईंनी आले पिकास आंतरपिकाची जोड दिली असल्याने आर्थिक नुकसान टाळणे त्यांना शक्य झाले आहे. आले पिकात त्या हिरवी मिरचीचे आंतरपीक घेतात.साधरणपणे ऑगस्ट महिन्यात हिरवी मिरचीची एक गादीवाफा आड एक अशी लागवड केली जाते. सातारा शहर जवळ असल्याने बहुतांशी मिरचीची विक्री येथील बाजार समितीत केली जाते. २० ते ४० गुंठे क्षेत्रात मिरचीचे आंतरपीक केले जाते. यामुळे आले पिकास केला जाणारा भांडवली खर्च मिरचीच्या उत्पन्नातून निघतो.

फेब्रुवारी महिन्यात आले पिकाच्या बांड्या पडल्यावर काळा घेवड्याची लागवड केली जाते. हा घेवडा एप्रिल व मे महिन्यात काढला जातो. या काळात पाणी टंचाईमुळे भाजीपाल्यास चांगले दर मिळत असतात. काळा घेवड्यास मागील तीन वर्षांत ७० ते ८० रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. आले पिकाचे एकरी ३५ गाडी (प्रति गाडी ५०० किलो) उत्पादन मिळत असल्याचे उज्वलाताई सांगतात.

कुटुंबाची चांगली साथ...

उज्ज्वलाताईंना शेती नियोजनात पती रवींद्र यांची चांगली साथ मिळाली आहे. ते शाळेच्या नोकरीतून देता येईल तेवढा वेळ शेती नियोजनासाठी देतात. तसेच सासूबाई कृष्णाबाई यांची प्रेरणा, दिवंगत दिर राजेंद्र तसेच मोठे दिर रूपेंद्र, जाऊबाई सविता, प्रमिला तसेच सून रविना, मुलगा उज्वल, पुतण्या अभिजित या कुटुंबातील सदस्यांची चांगली मदत होत आहे.

Women Farmer

महिला शेतकऱ्यांसोबत कांदा भरणी.

शेतीची व्यवस्थापनाची सूत्रे ः

- बाजारपेठेचा अभ्यास करून विविध पिकांच्या लागवडीचे नियोजन.

- दोन ते अडीच एकर क्षेत्रावर १०००१ या जातीची ऊस लागवड.

- सुरू उसाचे एकरी ६० टनापर्यंत उत्पादन.

- स्वतः थेट शेतीमाल विक्रीवर भर.

- नियमित आर्थिक मिळकतीसाठी गलांड्याची लागवड.

- पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचनावर भर.

- पिकाच्या गरजेनुसार मजुरांचे नियोजन.

- स्वतः गाडी, ट्रॅक्टर चालवत असल्याने वाहतुकीचा खोळंबा नाही.

बायोगॅसमुळे इंधनात स्वयंपूर्ण

गॅसच्या किंमती दररोज वाढत आहेत. यामुळे गॅसवरील स्वयंपाक शेतकऱ्यांना आता परवडत नाही. या समस्येवर उज्ज्वलाताईंनी अगोदरच पर्याय शोधला आहे. इंधन स्वयंपुर्णतेसाठी घराशेजारी त्यांनी गोबरगॅसची उभारणी केली आहे. त्यांच्या गोठ्यामध्ये दोन म्हशी आहेत. त्यांच्या शेणाचा उपयोग बायोगॅससाठी केला जातो. या गोबरगॅसपासून स्वयंपाकासाठी इंधन मिळते तसेच शेणस्लरी शेतीला खत म्हणून वापरली जाते.

Women Farmer

ट्रॅक्टरने शेती मशागत करताना उज्ज्वलाताई.

स्वतः चालवितात ट्रॅक्टर...

उज्ज्वलाताईंच्या घरी चारचाकी गाडी आहे. शेतीमाल तसेच मजुरांच्या वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी त्या स्वतः चारचाकी गाडी चालविण्यास शिकल्या. या गाडीतूनच सातारा बाजार समितीत भाजीपाला विक्रीसाठी नेतात. शेतीची जबाबदारी वाढल्यानंतर मजूर टंचाई तयार झाली. त्यांनी चारचाकीतून शेजारच्या गावातून मजूर आणण्यास सुरवात केली. ट्रॅक्टर खरेदी केल्यावर वेळेत ड्रायव्हर उपलब्ध होत नसल्याने त्या ट्रॅक्टरही चालविण्यास शिकल्या. सततच्या अनुभवातून त्या ट्रॅक्टरचलीत अवजारे चालविण्यामध्ये पारंगत झाल्या. सध्या शेतीतील ट्रॅक्टरपासून होणारी सर्व कामे स्वतः करत असल्याने चालकाचा खर्च कमी होऊन शेतीतील कामे वेळेत होतात.

Women Farmer

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारताना उज्ज्वला जाधव.

प्रयोगशिलतेचा गौरव

उज्ज्वलाताईंच्या शेती प्रयोगांची विविध संस्थांनी दखल घेतली आहे. यामध्ये अवॉर्ड संस्थेकडून ‘प्रगतशील महिला शेतकरी‘ तसेच मुक्ताई चॅरिटेबल टस्ट्रच्या वतीने ‘स्त्री कर्तृत्वाचा सन्मान' हा पुरस्कार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उज्ज्वलाताईंना देण्यात आला आहे.

संपर्क ः सौ.उज्ज्वला जाधव, ८८०६१७०४५७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

SCROLL FOR NEXT