विकास जाधव
The Story of a Successful Horticulturist : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग कायम दुष्काळी असतो. याच परिसरातील डोंगरालगत होलेवाडी हे छोटे गाव असून, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागतो. गावातील उत्तम बंडगर पूर्वी मेंढपाळीचा व्यवसाय करायचे. मुलगा बाळकृष्ण यांनीही घरच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावण्यासाठी अकरावी शिक्षणानंतर हा व्यवसाय पुढे सहा वर्षे केला. घरची साडेचार एकर शेती होती.
पण पाण्याअभावी त्यात मर्यादा होत्या. पण याच व्यवसायाने बाळकृष्ण यांना संधीही दिली. व्यवसायाच्या निमित्ताने फिरताना विविध शेतकऱ्यांचे प्रयोग, त्यांनी केलेली प्रगती अनुभवण्यास मिळायची. त्यातून आपल्या शेतीसाठी प्रेरणा व दिशा मिळत गेली. दरम्यान, तत्कालीन कृषी अधिकारी पी. एम. शिंदे, मंडल कृषी अधिकारी सचिन लोंढे व तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे यांच्या दृष्टिक्षेपात बाळकृष्ण यांची जमीन आली. त्यांनी त्यात डाळिंब फायदेशीर ठरेल असा सल्ला दिला.
शेती विकासाचा श्रीगणेशा
कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार बाळकृष्ण यांनी रोजगार हमी योजनेतून अडीच एकरांत डाळिंब लागवड केली. विहिरीला जेमतेम एक तास पाणी पुरायचे. मग याच योजनेतून विहीर खोदली.
पावसाळ्यात विहीर पुनर्भरण केले. सर्व शक्ती एकवटून केलेल्या कष्टांमुळे पहिल्याच बहरात समाधानकारक उत्पन्न मिळाले. त्याच उत्साहात पुढील प्रत्येक वर्ष समाधानकारक उत्पादन व उत्पन्न मिळत गेले. बाग आता काही वर्षांची झाल्याने ती काढून नवी लावण्यात येणार आहे.
टोमॅटोने दिला हात
अलीकडील वर्षांत टोमॅटो हे बाळकृष्ण यांचे नियमित व्यावसायिक पीक झाले आहे. दरवर्षी दीड ते दोन एकर क्षेत्र असते. नवीन बदल स्वीकारण्याचा स्वभाव असल्याने पॉलिमल्चिंग, ठिबक, तारा, काठी, बांबू यांच्या वापरासह व्यवस्थापन सुधारण्यावर भर दिला. मार्च व ऑगस्ट असे वर्षातून दोन वेळा लागवड होते. एकरी २० ते २२ टन उत्पादन घेण्यापर्यंत क्षमता तयार झाली आहे. किलोला ३० ते ६० रुपयांपर्यंत, तर सरासरी ४० रुपये दर मिळतो. व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात.
आले, वांगे देतेय साथ
दरवर्षी अडीच ते तीन एकरांत आले लागवड. एकरी ३५ ते ४० गाड्या (प्रति गाडी ५०० किलो) उत्पादन मिळते.
मागील वर्षा अडीच एकरांत ८० गाड्या उत्पादन. प्रति गाडी ६५ ते ६८ हजार रुपये दर मिळाला.
जागेवरच खरेदी होते.
विविध ठिकाणच्या भाजीपाला मार्केटचा अभ्यास व लागवडीची स्थिती लक्षात घेऊन पिकांची निवड व लागवडीची वेळ ठरवल्यास फायदा होतो हे बाळकृष्ण यांच्या लक्षात आले. त्यातूनच वांगे फायदेशीर ठरले. छोट्या वांग्यांना कोकणात चांगली मागणी असते हे हेरून त्याची लागवड.
किलोला ४० रुपयांपासून ते कमाल ११० रुपयांपर्यंत त्यास दर मिळवला.
शेडनेटमध्ये ढोबळी मिरची
सांगली, इंदापूर, बारामती येथील ढोबळी उत्पादकांकडे भेटी दिल्या. त्यातील अभ्यासानंतर मागील वर्षी कमी खर्चात २० गुंठ्यांत बांबूचे शेडनेट उभारले. पहिल्या प्रयोगात १३ टनांपर्यंत उत्पादन मिळाले. स्थानिक व्यापाऱ्यांच्या माध्यमातून बहुतांशी माल गोव्याला पाठवला. ३० ते ७० रुपये प्रति किलो दर मिळून पैसेही चांगले झाले.
यंदा पुन्हा शेडनेटचे क्षेत्र वाढवले असून, आजमितीस एकूण दोन एकर आहे. सध्या किलोला कमाल ८५ ते ११० रुपये दर मिळत असला, तरी सरासरी दर ३० ते ४० रुपयांपर्यंत मिळतो. एकरी बांबू, रोपे व लागवडीचे साहित्य मिळून साडेतीन लाखांपर्यंत खर्च आला आहे.
दगड फोडून शेती केली विकसित
केवळ शेतीच्या जोरावर व कुटुंबातील सदस्यांच्या कष्टांच्या बळावर बाळकृष्ण यांनी कौटुंबिक प्रगती साधली आहे. एकेकाळी डोंगर असलेली जमीन जेसीबी यंत्राचा वापर करून पिकाऊ केली. शेतीतील उत्पन्नातूनच चार एकर शेती खरेदी केली. आज ते नऊ एकरांचे मालक आहेत. फलटण येथे काही गुंठे प्लॉट घेतला.
ट्रॅक्टर, चारचाकी वाहन घेतले, शेतात घर बांधले. तीन विहिरी घेतल्या. बोअरवेल्स घेतले. व्यावसायिक नियमित भाजीपाल्यांसह बीन्स, काकडी, कारले कलिंगड अशी विविधता किंवा चक्राकार पद्धती वर्षभर जपली. त्यामुळे सात- आठ महिलांना कायम रोजगार मिळाला. शेळ्या मेंढ्यांची संख्या आता २०- २५ पर्यंत आणली आहे. त्यातून शेतीला लेंडीखत उपलब्ध होते.
मदत व मार्गदर्शन
बाळकृष्ण यांच्या खांद्याला खांदा लावून पत्नी दीपाली शेतीचा भार सांभाळतात. आई जगूबाई व वडील उत्तम यांचे मार्गदर्शन मिळते. दिशा, निशा व वरद ही मुले शालेय शिक्षण घेतात.
बाळकृष्ण यांचा आत्मा- कृषी विभागातर्फे उत्कृष्ट शेतकरी तर दीपाली यांचा खासदार श्रीनिवास पाटील फाऊंडेशनचा कृषी लक्ष्मी पुरस्काराने सन्मान झाला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव, कृषी सहायक सचिन गुरव आदींचे सहकार्य मिळते.
बाळकृष्ण बंडगर, ९४०३९६७९३३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.