Strawberry Farming
Strawberry Farming  Agrowon
यशोगाथा

Strawberry Farming : मुदखेड भागात लालचुटूक स्ट्रॉबेरीचा प्रयोग

कृष्णा जोमेगावकर

नांदेड शहरापासून सुमारे ३० किलोमीटरवर असलेले बारड (ता. मुदखेड) हे बारमाही सिंचनाची (Irrigation) व्यवस्था असलेले गाव आहे. शीतला देवीचे जागृत देवस्थान असलेला हा भाग केळी व हळद उत्पादनासाठी (Turmeric Production) राज्यात प्रसिद्ध आहे. याच बारडमध्ये कृषी पदवीपर्यंत शिक्षण झालेला पंचवीस वर्षीय बालाजी मारोतीअप्पा उपवार हा युवा आणि प्रयत्नवादी शेतकरी आहे.

घरची आठ एकर असून, ती आई- वडील सांभाळायचे. आता शेतीची मुख्य जबाबदारी बालाजीने आपल्या खांद्यावर घेतली आहे. भावाचेही मोठे सहकार्य असते. संपूर्ण शेतीला बारमाही पाणी उपलब्ध आहे. इसापूर प्रकल्पाच्या लाभश्रेत्रामुळे विहिरीला पाणी भरपूर असते. सध्या एक एकर केळी, दीड एकर हळद, दोन एकर हरभरा व ज्वारी, गहू अशी पिके घेतली आहेत.

स्ट्रॉबेरीचा प्रयोग

स्ट्रॉबेरी म्हटले, की सामान्यत: उत्तरेकडील राज्ये किंवा महाराष्ट्रातील महाबळेश्‍वर या थंड हवेच्या ठिकाणी प्रामुख्याने घेतले जाणारे पीक असा समज आहे. परंतु बालाजी यांनी नांदेड जिल्हा व त्यातही आपल्या पंचक्रोशीत त्याचा प्रयोग करायचे ठरवले. तीन वर्षांपूर्वी लागवडीचे नियोजन केले. प्रारंभी काहीशी किचकट वाटणारी लागवड आपल्या कौशल्याने सोपी केली. क्षेत्र १० गुंठेच ठेवले आहे.

यंदा उत्पादनाचे तिसरे वर्ष असून, काढणी व विक्रीचे नियोजन सुरू झाले आहे. सुरुवातीची दोन वर्षे तयार रोपे महाबळेश्‍वर येथून प्रति रोप बारा रुपयांनुसार खरेदी केली. दहा गुंठ्यांत सहा हजार रोपे या हिशेबाने ७२ हजार रुपये मोजावे लागत होते. यंदा महाबळेश्‍वर येथील सहकाऱ्याच्या संपर्कातून नेदरलँडहून दोनशे मातृवृक्ष मागविण्यात आले. एक जून रोजी लागवड केली. त्यापासून सहा हजार रोपे तयार केली. त्यासाठी प्रति रोप पाच रुपये खर्च आला. या पद्धतीमुळे प्रतिरोप सात रुपयांची व एकूण उत्पादन खर्चातही बचत झाली. रोपांची गुणवत्ताही चांगली राहिली.

लागवड नियोजन

नांदेड भागात उन्हाळ्यात तापमान अधिक असते. आणि मार्चच्या काळात फळांचा हंगाम असतो. हे लक्षात घेऊन उष्ण तापमानाला सहनशील राहू शकेल अशा विंटर डाउन या जातीची लागवडीसाठी निवड केली. दहा गुंठे क्षेत्र तयार करताना दोन ट्रॉली शेणखत, सहा बॅग्ज कंपोस्ट खत शेतात मिसळून गादीवाफे (बेड) तयार केले. अनुभवी शेतकऱ्यांचा सल्ला घेऊन व्यवस्थापन केले. मात्र रासायनिक निविष्ठांचा वापरांवर भर देण्यापेक्षा सेंद्रिय निविष्ठांवर अधिक भर दिला. त्यामध्ये दशपर्णी अर्क, जिवामृत, निंबोळी अर्क, वेस्ट डी कंपोजर यांचा वापर केला. यातील काही निविष्ठा शेतावरच बनविल्या. सेंद्रिय घटकांच्या अधिक वापरामुळे फळाची प्रत व स्वाद यांत वाढ झाली. त्यामुळे ग्राहकांकडून पसंती मिळाली.

उत्साहवर्धक अर्थकारण

चांगले उत्पादन व थेट विक्रीमुळे दहा गुंठे स्ट्रॉबेरी क्षेत्रातून गेल्या दोन्ही वर्षांत एक लाख रूपयांहून अधिक उत्पन्न मिळवण्यात बालाजी यशस्वी झाले आहेत. केळीचे ते एकरी ३५ टनांहून अधिक उत्पादन घेतात. हळदीचे त्यांनी एकरी ३० क्विंटलपर्यंत (वाळवलेले) तर कमाल उत्पादन ३७ क्विंटलपर्यंत साध्य केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची भेट

नांदेड जिल्ह्यासाठी तुलनेने नावीन्यपूर्ण पिकाची लागवड करुन त्यात जम बसविल्याची माहिती नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर त्यांनी यंदाच्या १४ जून रोजी प्रत्यक्ष शेताला भेट देऊन बालाजी यांचा प्रयोग जाणून घेत पाठ थोपाटली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, तालुका कृषी अधिकारी सचिन कपाळे देखील या वेळी उपस्थित होते. यासोबतच अन्य शेतकरीही पाहणी करून लागवडीचे तंत्र जाणून घेत आहेत.

थेट विक्री

बालाजी यांनी स्व-उत्पादित स्ट्रॉबेरीची विक्री स्वतःच करायचे ठरवले. त्यांची शेती महामार्गालगत आहे. तेथेच कडेला स्टॉल उभारला. दरवर्षी डिसेंबर ते मार्च या काळात तो सुरू असतो. दररोज सकाळी लवकर एक तास फळांची तोडणी स्वतः बालाजी करतात. दिवसाकाठी २५ ते ३० किलो स्ट्रॉबेरी निघते. सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत ते स्टॉलवर स्वतः उभारतात. प्रवासी किंवा ग्राहकांची येथून सतत ये-जा सुरू असते. ताजी, लालचुटूक, दर्जेदार स्ट्रॉबेरी त्यांच्या नजरेत भरते. साहजिकच होताहात खपही होतो. किलोला ३०० रुपये दर ठेवल्याचे बालाजी सांगतात. २५० ग्रॅम पनेट व अर्धा किलोचे कागदी बॉक्स असे पॅकिंग केले आहे. आता बांधावरूनही मागणी होत आहे. त्यासाठी ग्राहकांना प्रतीक्षाही करावी लागते.

- बालाजी उपवार ८७६६५०६०७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT