Dairy Business : सावरगावतळ (ता. संगमनेर, जि. नगर) या दुष्काळी पट्ट्यातील गावाने भाजीपाला व दुग्ध व्यवसायातून समृद्धी निर्माण केली आहे. समूहाने एकत्र येत नदीवरून पाइपलाइन करून समान पाणीवाटप ही आदर्श संकल्पना गावाने यशस्वीपणे राबवली आहे. याशिवाय लोकसहभागातून विविध कामे घडवून गावाचा विकास साधण्यामध्येही गावकऱ्यांचे योगदान मोलाचे ठरले आहे.
पुणे- नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात सावरगावतळचे शिवार आहे. पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या गावांतील ७२६ कुटुंबापैकी बहुतांश कुटुंबे शेतीच करतात. गावाला चोहोबाजूंनी डोंगररांगा आहेत. पर्जन्यछायेखाली येत असल्याने निसर्गसौंदर्य असूनही गावाच्या शिवारात शेतीसाठी फारसे पाणी उपलब्ध नव्हते. पारंपरिक खरीप पिके घेतली जायची. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सातत्याने सतावत होता.
सन २००८ ते २०१२ या काळात येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत १० किलोमीटरवरील निमज येथून प्रवरा नदीवरून पाइपलाइन करून पाणी आणण्याचे नियोजन केले. प्रत्येक शेतकऱ्याची पाण्याची आवश्यकता व आर्थिक परिस्थिती यानुसार प्रत्येकी सहा शेतकऱ्यांचाएक असे ३२ समूह या प्रकारे सहभागी २८५ शेतकऱ्यांनी पाणी आपल्या शेतापर्यंत आणले. दूरवरून पाणी आणायचे असल्याने प्रत्येक पाइपलाइन सहा इंच आकाराची असून प्रत्येक पाइपलाइनला जागेवरच पंधरा एचपी क्षमतेचे तीन विद्युतपंप आहेत.
समान पाणीवाटप संकल्पना
सामूहिक विहिरी, पाइपलाइन असलेल्या बाबतीत पाणीवाटपावरून वाद होत असल्याचे सर्वसाधारण अनुभव आहे. त्यामुळे हा वाद टाळण्यासाठी समान पाणीवाटपाची संकल्पना पुढे आली. यात एका जागी उंचवट्यावर उतारानुसार पाण्याच्या टाक्या बांधल्या.
त्यात नदीवरून येणारे पाणी थेट सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. तिथून ते समान पद्धतीने शेतकऱ्यांना मिळावे म्हणून समतल पातळीत दोन पाइप्स लावून टाकीच्या बाहेरील बाजूला काढले. टाकीच्या बाहेरील बाजूस अर्धा फूट रुंद व अर्धा उंच असे गोल आकारात पाणी साठवण कडे केले आहे.
कड्याच्या खालील बाजूस पाइप जोडला असून कप्प्यातील पाणी संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात विना विद्युतपंप व एकसारख्या प्रमाणात बाहेर पडते. त्याचबरोबर एकाचवेळी सर्वांकडचे पाणी बंद होते. दूरवरून पाणी आणण्याचा खर्च अधिक आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाची किंमत सावरगावकरांनी जाणली आहे.
येथील जवळपास सर्वच शेतकरी आपापल्या सर्व क्षेत्रावर पंधरा वर्षांपासून ठिबक सिंचनाचा वापर करत आहेत. गावशिवारात सुमारे चारशे शेततळी असून पावसाळ्यात ती भरून घेतली जातात. त्यामुळे भाजीपाला, चारा व अन्य पिकांसाठी अडचणीच्या काळात मात करता येते.
टोमॅटो, भाजीपाल्याचे आगार
सावरगावतळमधील शेतकरी पंधरा वर्षांपूर्वी भाजीपाला पिकांकडे वळले. आज हे भाजीपाल्याचे गाव म्हणूनच ओळखले जाते. लागवडीलायक पाचशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर वांगी, टोमॅटो, वाल, घेवडा, फ्लॉवर, दोडका, झेंडू आदी पिके होतात. मेमध्ये टोमॅटोच्या लागवडी होतात. अलीकडे फळबागांची लागवडही वाढू लागली आहे. भाजीपाला, कांद्याची संगमनेरसह नाशिक, पुणे, मुंबईत विक्री होते. अनेक वेळा व्यापारी जागेवरच खरेदी करतात. वर्षभरात त्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
वर्षभरात एकूण सर्व हंगामांत मिळून तीनशे ते चारशे हेक्टरच्या जवळपास कांदा लागवड केली जाते. वर्षभरात सुमारे पाच हजार ते दहा हजार टनांच्या आसपास उत्पादन होत असल्याचा अंदाज आहे. भाजीपाला वाहतूक व अन्य कारणासाठी तरुणांनी वाहने घेतली आहेत. काही शेतकऱ्यांनी शेडनेटमध्ये भाजीपाला उत्पादन घेण्यास सुरवात केली आहे. सुमारे सात शेतकऱ्यांनी पॉलिहाउस उभारले आहे.
यात माधव बबन नेहे, नारायन नेहे, जगन्नाथ बाळाजी नेहे, मंगेश नारायण गाडे, नामदेव विठोबा थिटमे, सचिन शिवाजी नेहे, भीमाशंकर कोंडीजी गाडे आदींचा समावेश आहे. ढोबळी मिरची, वांगी, झेंडू आदी पिके यात आहेत. बहुतांश शेतकरी मल्चिंग पेपरचा वापर करतात. सर्वाधिक मल्चिंग पेपरचा वापर करणारे या भागातील हे एकमेव गाव आहे.
दुग्ध व्यवसायातून उन्नती
संगमनेर येथील आघाडीच्या दूध संघांमुळे दुग्धव्यवसाय वाढीस मदत होत आहे. गावातील ५०० पेक्षा अधिक कुटुंबे पशुपालन करतात. गावात चार संकलन केंद्रे असून प्रति दिन पंचवीस हजार लिटर दुधाचे संकलन होते. सुमारे २०० हून अधिक हेक्टरवर मका, ज्वारी व गवताच्या सुधारित जातींची लागवड होते. या पशुधनापासून दरवर्षी काही हजार टन शेणखत तयार होते. त्याच्या वापरातून रासायनिक खताच्या खर्चात बऱ्यापैकी बचत होत असून पिकांचा दर्जा चांगला राहात असल्याचे शेतकरी सीमा भीमाशंकर नेहे, उज्ज्वला बाळासाहेब नेहे सांगतात.
लोकसहभागातून विकास
लोकसहभागातून ग्रामदैवत मूळगंगा माता व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून मोठे बारा व काही छोटे बंधारे, जलशोषक चर, सलग समतल चर, कंपार्टमेंट, कंटूर बंडिंग , गॅबियन बंधारे अशी कोट्यवधी रुपयांची कामे झाली आहेत.
गावचे पुत्र व ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक काशिनाथ थिटमे ,अमेरिकेत असलेले राजेंद्र गाडे, प्रल्हाद नेहे,जगदीश फापाळे , संजय गाडे, गोरक्षनाथ गाडे, संतोष फापाळे, कारभारी गाडे, अरुण फापाळे यांच्या माध्यमातून विवेकानंद युवा जागृती प्रतिष्ठान कार्यरत आहे. डॉ. शंकर गाडे अध्यक्ष तर सामाजिक कार्यकर्ते व पोलिस पाटील गोरक्ष नेहे पाटील त्याचे सचिव आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.