Agriculture Success Story Agrowon
यशोगाथा

Modern Fruit Farming : फळबागकेंद्रित शेतीतून शेती, कुटुंबाची प्रगती

Orchard Farming Success : जालना जिल्ह्यातील देवपिंपळगाव (ता. बदनापूर) येथील उद्धवराव व परमेश्‍वर या नन्नवरे बंधूंनी याच उद्दिष्टाने फळबाग केंद्रित शेती यशस्वी केली आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Agriculture Success Story : देवपिंपळगाव (ता. बदनापूर, जि. जालना) येथील परमेश्‍वर नन्नवरे यांची कहाणी म्हणजे जिद्द, शास्त्र शिकून घेऊन शेती करणे आणि बाजारपेठेची अचूक समज यांचा उत्तम मिलाफ आहे. पारंपरिक शेतीतून आधुनिक फळशेतीकडे यशस्वी वळण घेताना त्यांनी जे अनुभव घेतले ते दिशा दाखवणारेच आहेत.

कुटुंबाची १५ एकर शेती आहे. त्यात कपाशी, ज्वारी, हरभरा, बाजरी, तूर, मूग, उडीद अशी हंगामी पिके घेतली जात असत. परमेश्‍वर यांना वडील शंकरराव, आई चंद्रकलाबाई, मोठे बंधू परमेश्‍वर, वहिनी ज्योती आणि पत्नी कावेरी अशा कुटुंबातील सर्व सदस्यांची मदत होते.

फळबाग केंद्रित शेतीचे नियोजन

नन्नवरे बंधूंनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेतीची जबाबदारी सांभाळण्यास सुरुवात केल्यापासून पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता फळपिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला. सन २००६ मध्ये बालानगर जातीच्या सीताफळाची दोन एकरांत १२ बाय ८ फुटांवर लागवड केली. तीन वर्षांत झाडं तर चांगल्या प्रकारे वाढली.

जेव्हा पहिलं उत्पादन आलं तेव्हा हिशोब बिघडला. बाजारात २० किलोच्या क्रेटला फक्त १०० ते १५० रुपये दर सुरू होता. सन २००९-१० च्या हंगामात ही बाग काढून टाकावी का, असा विचार दोघा बंधूंच्या मनात आला.

पण नेमकी काही झाड काढण्याचं नियोजन सुरू असतानाच मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी डॉ. संजय पाटील त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्याचा योग चालून आला. बाग कशाला काढता? हे फळ तुम्हाला हमखास चांगले उत्पन्न देईल असा विश्‍वास त्यांनी दिला. शिवाय बाजारपेठ समजून घ्या, विक्री पद्धत बदला, मी मदत करतो अशा शब्दांमध्ये पाठबळही दिलं. त्या एका सल्ल्याने नन्नवरे यांचा निर्णय बदलला.

सीताफळाचं केलं मार्केटिंग

डॉ. पाटील यांनी फळांची प्रतवारी कशी करायची, ग्राहक कसे जोडायचे, फळांचं बॉक्स पॅकिंग केलं तर अधिक दर कसा मिळू शकतो या बाबी समजावून दिल्या. त्यानुसार केलेल्या प्रयोगांचा सकारात्मक परिणाम दिसू लागला. आज सहा फळांचा बॉक्स तयार केला जातो. उत्कर्ष ॲग्रो फार्म असे ब्रॅंडिग त्यावर केले आहे.

जालना, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी हंगामात ८०० ते ९०० बॉक्स विकले जात आहेत. ग्राहकांना ‘होम डिलिव्हरी’ देण्यात येते. अंतरानुसार बॉक्सला १५० रुपयांपासून ते २००, २५० रुपयांपर्यंत दर मिळतो. ग्राहक वाढविण्यासाठी नन्नवरे बंधींनी काही कंपन्यांना दिवाळी भेटीत सीताफळ देण्याचा पर्याय दिला. त्या कंपन्यांना तो आवडल्याने शेकडो बॉक्सची खरेदी त्यांच्याकडून झाल्याचाअनुभव आला.

कृषी विभागाच्या सर्व अधिकारी वर्गापर्यंतही सीताफळाची बाजारपेठ तयार केली आहे. हे फळपीक जोपासताना दरवर्षी प्रत्येक झाडाला २० ते २५ किलो चांगल्या कुजलेल्या शेणखताचा तसेच जिवामृताचा वापर होतो. संरक्षित सिंचनामुळे व्यवस्थापन सुकर होऊन बाजारपेठेत फळे इतरांपेक्षा पंधरवडा आधी येतात. त्यामुळे दर चांगला मिळतो.

मोसंबी, डाळिंबाची साथ

नन्नवरे यांच्याकडं मोसंबीचे फळपीक तसं वडिलोपार्जितच. ते पीक जपताना २०१७-१८ मध्ये नव्याने दोन एकरांत त्याची लागवड १२ बाय १२ फूट अंतरावर केली. दोन वर्षांपासून उत्पादन सुरू झाले असून एकरी आठ ते दहा टन उत्पादन मिळते. विक्री जागेवरून व्यापाऱ्यांना होते. अलीकडील काही वर्षांत किलोला २० ते २२ रुपयांपर्यंत दर होते.

मात्र मागील दोन वर्षांपासून १५ ते १६ रुपये दर मिळतो आहे. सुमारे दहा ते बारा वर्षांपूर्वी दोन एकरांत लागवड केलेल्या भगवा डाळिंब बागेचा आता पाच एकर क्षेत्र वाढवून सात एकरांपर्यंत विस्तार केला आहे. शास्त्रोक्त व्यवस्थापन करताना तज्ज्ञांचा सातत्याने सल्ला घेतात. एकरी १० ते १२ टनांची उत्पादकता गाठली आहे. सोलापूर आणि नाशिकच्या बाजारपेठेत विक्री करताना ७० ते १६० रुपये व काही प्रसंगी २०० रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळवला आहे.

शेतीतील नियोजन व प्रगती

अलीकडील चार- पाच वर्षांपासून मोसंबी व डाळिंब बागेत तण नियंत्रणासाठी ‘ग्रास कटर’चा वापर केला जातो. बागेत उगवलेलं गवत रोटावेटरद्वारे हिरवळीच्या खतांसारखंच शेतात गाडलं जातं. त्यामुळे जमिनीला जैविक घटक मिळून जमिनीचा पोत टिकतो, हवा खेळती राहते.

पाण्याची शाश्‍वती मिळविण्यासाठी दोन मोठी शेततळी घेतली आहेत. प्रत्येकी सुमारे एक कोटी लिटर त्याची पाणी क्षमता असावी. ठिबक सिंचनामुळे पाण्याचा अपव्यय होत नाही. शेतीतूनच या कुटुंबाने सारी प्रगती साधली आहे.

फळबाग केद्रित शेतीतून वार्षिक चांगले उत्पन्न मिळतो. मुलांना चांगले शिक्षण देणे शक्य झाले आहे. परमेश्‍वर यांचा मुलगा रोहित पुणे येथे स्पर्धा परिक्षांची तयारी करतो आहे, मुलगी गायत्री सीएचा अभ्यासक्रम पूर्ण करते आहे. उद्धवराव यांचा मुलगा शिवराज कृषी पदवीचे शिक्षण घेत असून मुलगी सावी आठवीत शिकत आहे.

शेतीतील उत्पन्नस्रोत वाढविण्याच्या दृष्टीने सन २०१२ पासून पाच संकरित गायींचा सांभाळ होतो. दुग्ध व्यवसायातून हाती पैसा खेळता राहतो. शिवाय शेतीसाठी शेणखतही उपलब्ध होते आहे. एका प्रसिद्ध कंपनीला दररोज ५० लिटर दुधाचा पुरवठा होतो. दोन वर्षांपासून आठ ते दहा शेळ्यांचते पालनही केले जाते. त्यातून अडचणीच्या वेळी आर्थिक हातभार लागतो. शेतीच्या बळावर दोन ट्रॅक्टर्स घेणेही शक्य झाले आहे.

उद्धव नन्नवरे ९७६५६८८३०३

Natural Edible Oil : खाद्यतेलाचा यशस्वी स्वानंद शतायू ब्रॅण्ड

Pomegranate Farming : चुकांकडे लक्ष दिले ; डाळिंबात प्रावीण्य मिळविले

Climate Change : हवामान बदलाचा फटका फळ आणि भाजीपाला पिकांना; राज्यसभेत केंद्र सरकारची कबुली

Satbara Document: सातबारा हा महत्त्वाचा दस्तऐवज

Maharashtra Politics: सभ्यतेचा न्याय कुणाकुणाला लावणार?

SCROLL FOR NEXT