Livestock Market Motala Agrowon
यशोगाथा

Motala Livestock Market : जातिवंत जनावरांसाठी प्रसिद्ध मोताळ्याचा बाजार

Dairy Business : बुलडाणा जिल्ह्यात मोताळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दर गुरवारी भरणारा जनावरांचा बाजार सर्वदूर प्रसिद्ध झाला आहे. बाजारात दूरदूरहून आलेल्या जातिवंत गाई, म्हशी व अन्य जनावरांच्या जातींची विविधता पाहण्यास मिळते.

 गोपाल हागे

Cattle Market Motala : बुलडाणा जिल्हयात मोताळा हा दुग्धव्यवसायात आघाडीवर असलेला तालुका आहे. तालुक्यात गावोगावी दुधाळ जनावरे मोठ्या संख्येने दिसून येतात. त्यामुळे पशुपालकांची गरज पाहता मोताळा येथे दर गुरुवारी भरणारा जनावरांचा बाजार अनेक वर्षांपासून प्रसिद्ध राहिला आहे. त्यामागील इतिहास किंवा पार्श्‍वभूमी सांगायची तर मोताळा कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना १९८६ मध्ये झाली.

याच बाजार समितीने १९९० मध्ये जनावरांचा बाजार भरविण्यास सुरवात केली. सुरवातीची काही वर्षे बाजार आठवडी बाजारात भरायचा. आता तो बाजार समितीच्या आवारात भरतो. सध्या संचालक मंडळ नसल्याने २०२२ पासून बाजार समितीचा कारभार प्रशासक ए. बी. सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालवला जात आहे.

बाजाराचे स्वरूप व कार्यपद्धती

मोताळा हे बुलडाणा-मलकापूर मार्गावरील मध्यवर्ती ठिकाणाचे गाव आहे. या ठिकाणी खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ अशा तीनही प्रांतांमधून व्यापाऱ्यांना जनावरांची बाजारात वाहतूक करणे सोयीचे होते. रस्त्यांचे जाळे चांगले असल्याने शेतकऱ्यांनाही जनावर घरी घेऊन जाणे सुकर होते. कोणत्याही ही भागात जाण्यासाठी वाहन सहजपणे मिळते. दळणवळणाच्या दृष्टीने हा बाजार अत्यंत सोयीचा बनलेला आहे. देऊळगावराजा, वडोदा, लोणी, घोडेगाव, जळगाव जामोद तसेच छत्रपती संभाजीनगर, अकोला

आदी अन्य जिल्ह्यातील शेतकरी व व्यापारी देखील दर गुरुवारी बाजारात खरेदी- विक्रीसाठी येतात. त्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल येथे होत असते. जातिवंत एचएफ, गीर, अन्य देशी गाई, मुऱ्हा, जाफराबादी, देशी म्हशी, उस्मानाबादी, सिरोही शेळ्या आदींची विविधता येथे पाहण्यास मिळते. जिल्ह्यातील अनेक शेतकरी परसबागेतील कुक्कुटपालन करतात.

अशा शेतकऱ्यांसाठी सातपुडा, कावेरी आदी जातींच्या कोंबड्या उपलब्ध होतात. वर्षभरात १५ हजारांपर्यंत जनावरांची आवक होते. खरिपाच्या अनुषंगाने एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत अधिक आवक पाहण्यास मिळते. गाईची ५० हजार ते ८० हजारांपर्यंत तर बैलाची २० हजारांपासून ५० ते ६० हजारांपर्यंत किंमत असते.

पारखून जनावर निवडीकडे कल

बाजारात पशुपालक जनावराची दूध देण्याची क्षमता, शरीररचना, कास, शारीरिक ठेवण, पाय, डोळे, नाक आदी वैशिष्ट्ये पाहून जनावरांची निवड करतात. काही शेतकरी तर या बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेतात. पशुवैद्यकांकडूनही जनावराची तपासणी करून घेणारे शेतकरी आहेत. आजच्या महागाईच्या काळातही दरांशी तडजोड न करता उच्च दराने जातिवंत जनावर खरेदी करणारे शेतकरी पाहण्यास मिळतात. बाजारात हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गाभण गाय, म्हशींना अधिक मागणी राहते. त्या काळात मोठ्या संख्येने जनावरे विक्रीला आणली जातात.

बाजारातील सुविधा

बाजार समितीला संरक्षण भिंत आहे. जनावरे उतरविण्यासाठी तसेच खरेदी-विक्रीसाठी ओटे, विहीर, पाण्याची टाकी, कार्यालय, पिण्याच्या पाण्याचा हौद आदी सुविधा आहेत. पणन महामंडळाच्या राष्ट्रीय ग्रामीण गोदाम योजनेतून एक हजार मे. टन क्षमतेचे गोदाम २०१९-२० मध्ये बांधण्यात आले आहे. त्याचबरोबर दोनशे टन क्षमतेची दोन गोदामे देखील आवारात बांधण्यात आली आहेत. धान्य खरेदीसाठी ५५ परवानाधारक व्यापारी आहेत.

अर्थकारणाला हातभार

मोताळा बाजारामुळे स्थानिकांच्या अर्थकारणालाही चालना मिळाली आहे. बाजाराशी निगडित विविध छोटी-मोठी दुकाने या दिवशी थाटली जातात. बाजारपेठेत काही दुकाने पूर्णवेळ चालवली जातात या ठिकाणी जनावरांसाठी लागणारे दोर, पशुखाद्य, कॅन, मॅट तसेच विविध प्रकारचे साहित्य मिळते. यातून दररोज मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते.

दूग्ध व्यवसाय टिकवलेला तालुका

मोताळा हा दुग्धव्यवसायात सुरवातीपासूनच अग्रेसर राहिलेला तालुका आहे. धवल क्रांतीत एकेकाळी बुलडाणा जिल्हा दूध संघाचा झेंडा राज्याच्या नकाशावर सन्मानाने फडकत होता. मोताळा, नांदुरा, चिखली येथे दूध शीतकरण केंद्रे कार्यरत होती. आज मोताळा केंद्र बंद झाले आहे. परंतु या तालुक्यात दूग्ध व्यवसाय मात्र टिकून राहिला आहे.

त्यामुळे जनावरांचा बाजार आणि दुग्ध व्यवसाय या दोन्ही बाबी तालुक्याच्या दृष्टीने एकमेकांना पूरक ठरली आहेत. मागील सुमारे ३५ वर्षात जनावरे बाजारात विविध भागातून खरेदीदार-विक्रेते येण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. मध्यंतरी कोरोना काळानंतर काही महिने जनावरांचे बाजार बंद होते. ते पूर्ववत झाल्यानंतर त्यातील अर्थकारण रुळावर यायला वेळ लागला. आता टप्प्याटप्प्याने पूर्ण क्षमतेने बाजाराचे कामकाज व्यवस्थित सुरु आहे.

गावांनी मिळवले व्यवसायात नाव

तालुक्यातील आडविहिर, खरबडी, कोथळी, तळणी, दाभाडी शेलापूर, माकोडी ही गावे दुग्धोत्पादनात आघाडीवर आहेत. आडविहिर, खरबडी या गावांमध्ये घरोघरी गायींचे गोठे व जनावरे दिसून येतात. दोन्ही गावे मिळून गाईंची संख्या दीड हजारांवर असावी. खरबडी हे गाव तर जिल्हयात सर्वाधिक दूध उत्पादन करणारे गाव म्हणून ओळखले जाते. त्यादृष्टीने तेथे दूध संघ कार्यरत आहे. येथील बहुतांश शेतकऱ्यांजवळ मोठ्या संख्येने गाई आहेत.

अशा विविध गावातील दुग्धोत्पादकांसाठी मोताळा बाजार नेहमीच पसंतीचा व सोयीचा ठरला आहे. या उत्पादकांना आवश्‍यक असलेली दुधाळ जनावरे मोताळ्याच्या बाजारातच उपलब्ध होतात. अधिकाधिक दूध देणाऱ्या संकरित गायी व्यापारी देशभरातून या ठिकाणी आणून विक्री करतात. त्यामुळे प्रत्येक गुरुवारी या बाजारात शेतकऱ्यांची गर्दी वाढलेली दिसते.

येथील बाजाराची सर्वदूर प्रसिद्धी झाली आहे. धामणगाव बढे येथील उपबाजार समितीही लवकरच असा बाजार सुरू करण्याचा मानस आहे.
- एस. सी. राहणे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, मोताळा ९४२१४७३२९७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT