Indigenous Animal  Agrowon
यशोगाथा

कोकण गिड्डा देशी गोवंश संगोपन

कोकणात फळबागायती व भातशेतीला पूरक व्यवसायाची जोड दिल्यास आर्थिक सक्षमता तयार करता येते. सोलगाव (जि. रत्नागिरी) येथील सुहास व सई या पंडित दांपत्याने याचे आदर्श उदाहरण तयार केले आहे.

राजेश कळंबटे

कोकणात फळबागायती व भातशेतीला पूरक व्यवसायाची जोड दिल्यास आर्थिक सक्षमता तयार करता येते. सोलगाव (जि. रत्नागिरी) येथील सुहास व सई या पंडित दांपत्याने याचे आदर्श उदाहरण तयार केले आहे. सहा वर्षांत कोकण गिड्डा (Kokan Gidda) या स्थानिक देशी गायींची (Local Cow Bread) संख्या सुमारे ५१ पर्यंत वाढवली. दूध, तूपनिर्मितीबरोबर (Ghee Production) गोमूत्र अर्क व शेणापासून (Cow Dong) मूल्यवर्धित उत्पादने तयार करून त्यास बाजारपेठही मिळवली.

रत्नागिरी जिल्ह्यात सोलगाव (ता. राजापूर) येथील सुहास व सई हे पंडित दांपत्य राहते. त्यांची सुमारे २० एकर शेती आहे. त्यात आंबा सात एकर, काजू चार, नारळ तीन एकर व भातशेती, मसाले पिके आहेत. सुहास हे पंचायत समितीत कृषी अधिकारी आहेत. नोकरी सांभाळून ते शेतीला वेळ देतातच. मात्र घरचे सर्व सदस्य शेतीत दररोज राबतात.

व्यावसायिक गोपालनातील संधी

कृषी विभागातील नोकरीमुळे सुहास यांच्या शेतीतील ज्ञानात अधिक भर पडली. शेतीसोबत घरी गायी, म्हशींचे संगोपन व्हायचे. पूर्वी रासायनिक खतांचा वारेमाप वापर व्हायचा. पंधरा वर्षांपूर्वी मग सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले. सहा वर्षांपूर्वी घराजवळील रस्त्यावर एक गाय पडलेली आढळली. तिचे पालन करण्याचा सुहास यांनी निर्णय घेतला. त्यानंतर या व्यवसायातील रुची व अभ्यास आणखी वाढला. कांचीपुरम येथे दौरा केला असता दूध, तूप यांच्यासह मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याची संधीही असल्याचे उमगले. त्यानुसार पत्नी सई यांच्यासह तेथे जाऊन रीतसर प्रशिक्षण घेतले. गोठ्यातील म्हशींची विक्री केली. सुमारे २०१५ पासून केवळ कोकण गिड्डा या देशी गायींची संख्या वाढवण्यास सुरवात केली. गावातून तसेच अन्य ठिकाणाहून गायी घेण्यास सुरवात केली.

दूध, तूप उत्पादन

देशी गायीच्या दुधाला सगळीकडे मागणी आहे. पंडित यांच्याकडे सध्या ५१ पर्यंत गायी आहेत. त्यात २६ वासरे, २३ गायी व दोन बैल आहेत. दिवसाला सुमारे १७ ते १८ लिटरपर्यंत दूध संकलन होते. त्यातील ८ लिटर दुधाची विक्री प्रति लिटर ७० रुपयांप्रमाणे गावात होते. उर्वरित दुधापासून महिन्याला १० किलोपर्यंत तूप तयार केले जाते. तूप निर्मितीत दुधाच्या सायीसह विरजण लावले जाते. दही झाल्यानंतर लोणी काढण्यासाठी एक किलोमध्ये तीन लिटर पाणी या प्रमाणात ताक बनवले जाते. ते व्यवस्थित घुसळल्यानंतर लोणी काढले जाते. ते गरम केल्यानंतर तूप तयार होते. किलोला २५०० रुपये दराने त्याची विक्री होते. मुुंबई, पुणे येथून त्यास मागणी असते. ताकाचीही गरजेनुसार गावातील दुकानांमधून विक्री होते.

मूल्यवर्धित उत्पादने

  • -गोमूत्र व शेणापासून विविध प्रक्रिया उत्पादने तयार केली जातात. निरामय नावाने त्यांची विक्री

  • सुरू केली आहे. दिवसाला सुमारे २० लिटर गोमूत्र संकलित केले जाते. त्यापासून विविध औषधी अर्क तयार केले जातात. यात काही औषधी वनस्पतींचा समावेश केला जातो.

  • -गोमूत्र तसे रिठा व शिकेकाई यांचे मिश्रण तयार करून उकळवून प्रक्रिया केली जाते. त्यापासून

  • शांपू तयार केला जातो. १० मिलीचे पाऊच तयार करून दरवर्षी सुमारे १५ लिटरपर्यंत विक्री होते.

  • -गोमुत्रापासून तयार केलेले सॅनिटायझर कोरोना काळात उपयुक्त ठरले. १०० मिलिमीटर पॅकिंगमधील

  • तीनशेहून अधिक बॉटल्स दोन वर्षांत विकल्या. यामध्ये कडुनिंबाची पाने व काही वेळा भीमसेनी कापूर, पुदीना अर्क, ओवा आदींचाही वापर केला

  • - शेण सुकवून, जाळून त्याचा कोळसा केला जातो. त्यात लवंग पावडर, काळीमिरी, सैंधव मीठ, गोमूत्र अर्क यांचा वापर करून दंतमंजन पावडर बनवली जाते.

  • -पंडित यांनी बनवलेल्या गोमय साबणाचा प्रसार रत्नागिरी जिल्ह्यात झाला आहे.

  • ओले शेण, मुलतानी माती, पंचगव्य, हळद आणि गरज वाटल्यास रिठा एकत्र करून ते यंत्राद्वारे एकजीव केले जाते. वर्षाला दीड हजारांहून अधिक साबणांची विक्री होते. प्रति साबण वडीची किंमत ६० रुपये आहे.

  • -शेणापासून बनवलेल्या दिवाळीतील पणत्या, धूपकांडी यांनाही मोठी मागणी आहे. धुपकांडीत

  • मच्छर कांडी आणि देवासाठी वापर असे दोन प्रकार आहेत. वर्षाला एक हजार पॅकेटसची विक्री होते. प्रति पॅकेटमध्ये ३० कांड्या असतात.

कोकण गिड्डा जातीविषयी

पंडित सांगतात की आमच्या कोकणात पाऊस भरपूर असतो. उन्हाळ्यात मात्र ओल्या चाऱ्याची वानवा असते. इथल्या प्रतिकूल वातावरणात कोकण गिड्डा ही जात अत्यंत अनुकूल व आदर्श ठरली आहे. सध्याच्या ५१ जनावरांच्या संख्येत अनेक गायी गोठ्यात वाढवल्या आहेत. ही गाय प्रति दिन

३ लिटरपर्यंत दूध देते. आहार व एकूण व्यवस्थापन अजून चोख ठेवले तर ही क्षमता सात लिटरपर्यंत पोचू शकते. प्रति गाय देखभाल खर्च २०० रुपये येतो. उन्हाळ्यात गोळी पेंड, भाताचा कोंडा आदींचा वापर होतो. देखभालीसाठी दोन व्यक्ती ठेवली आहेत. मात्र दूध काढणे, शेण-गोमूत्र संकलित करणे यासह विविध उत्पादने तयार करण्यात सई यांच्यासह घरच्यांची मोठी मदत होते.

शेतीला शेणखत

शेतीलाही घरातील मुबलक शेणखत उपलब्ध झाले आहे. आंबा बागेत जीवामृताचा वापर केला जातो. सेंद्रिय पद्धतीवर अधिकाधिक भर देत पिकविलेल्या आंब्याचा दर्जा चांगला मिळत आहे. हंगामात एकूण ३०० पेटी आंब्याची विक्री मुंबई, पुणे येथे थेट ग्राहकांना केली जाते. भातशेतीसाठीही जीवामृत उपलब्ध झाले आहे.

संपर्क- सुहास शरद पंडित- ९४२२४२९३३१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT