Water Conservation Agrowon
यशोगाथा

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

 गोपाल हागे

Agriculture Success Story : बुलडाणा जिल्हा हा विदर्भातील प्रगतशील शेतकऱ्यांचा म्हणून ओळखला जातो. प्रतिकूल परिस्थितीत पिकांची विविधता जपताना संकरित भाजीपाला बीजोत्पादनाही येथील शेतकऱ्यांनी राज्यात ठसा उमटवला आहे. मोताळा हा या जिल्ह्यातील अवर्षण प्रवण तालुका म्हणून ओळखला जातो. याच तालुका मुख्यालयापासून सुमारे आठ किलोमीटरवर जयपूर हे पाच हजार लोकवस्तीचे गाव आहे. शेती हाच इथला मुख्य व्यवसाय आहे. गावाच्या एका बाजूला बुरुजाप्रमाणे डोंगर उभा आहे.

वर्षानुवर्षे पर्यावरणाची हानी झाल्याने तो उजाड बनला होता. पावसाळ्यात पडणारे हजारो लिटर पाणी वर्षानुवर्षे वाहून जात होते. या डोंगराला आणि पर्यायाने गावाला गतवैभव मिळवून देण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. यात गावातील सामाजिक कार्यकर्ते इरफान पठाण यांचा महत्त्वाचा पुढाकार राहिला.

गावाला पाणीदार बनविण्यासाठी तसेच पर्यावरण पूरक कामे करण्यासाठी त्यांनी लोकचळवळ उभी केली. सन २०१५ ते २०१८ दरम्यान एकात्मिक पाणलोट समितीचे सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असताना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वात जास्त निधी या गावात खर्च करण्यात आला. सर्वाधिक घरकुले उभी राहिली.

उभारली लोकचळवळ

विकासाची लोकचळवळ उभी राहिली तशी कामांना गती आली. सन २०१९ पासून दररोज तीन टप्प्यांत श्रमदान होते. ज्याला जसा वेळ असेल तेव्हा त्याने श्रमदानात सहभागी व्हावे असा नित्यक्रम असतो. अनेक जण दिवसभर कामावर जात असल्याने त्यांना संध्याकाळीच श्रमदानासाठी सहभागी व्हावे लागते.

एकात्मिक पाणलोट प्रकल्प, जलयुक्त शिवार योजना राबवण्यात आली. शासनाचा एकही पैसा न घेता श्रमदानातून एकूण २२५ दगडी बांध, १८ शेततळी, सोळा माती बांध, त्यांचे खोलीकरण, एक किलोमीटर जंगलाला पिचिंग झाले. बचत गटांचे मजबुतीकरण, महिला संघटन झाले.

पाणी फाउंडेशनकडूनही वृक्ष लागवडीसाठी मोठे सहकार्य मिळाले. त्यांचे संगोपन करण्यासाठी जपानी ‘मियावाकी’ धर्तीवर त्यांची देखभाल सुरू झाली. दीड एकरात ५७ प्रकारच्या झाडांचे घनदाट जंगल त्यातून आकाराला आले असून, विविध प्रकारचे पक्षी निवासाला आले आहेत. काही जंगली प्राण्यांचाही त्यात समावेश आहे.

वृक्ष लागवड आणि संगोपनही

गावशिवारात आजमितीला सुमारे एक लाख ३५ हजारांवर झाडांची लागवड झाली आहे. त्यापैकी सुमारे एक लाख २० हजार झाडे जिवंत आहेत, हे विशेष. उन्हाळ्याच्या दिवसांत कॅनद्वारे पाणी घालून तरुणांनी ही झाडे जगविली आहेत. जनावरे शक्यतो खाणार नाहीत अशा प्रकारातील झाडेच प्रामुख्याने लावण्यात आली आहेत. त्‍यातील काही वृक्ष म्हणून आकाराला येत आहेत. सुरुवातीची लागवड केलेली झाडे आता सहा ते सात वर्षांची झाली आहेत. इरफान यांनी ही वृक्ष लागवड किमान पाच लाखांच्या संख्येपंर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार केला आहे.

श्रमदानाने होतात उत्सव साजरे

जयपूर गावाची एक वेगळीच ख्याती तयार झाली आहे. गावातील तरुण प्रत्येक सण, उत्सव, वाढदिवस डोंगरात श्रमदान करून साजरा करतात. ही पद्धत आता रूढ झाली आहे. श्रमदानातून केलेल्या कामांचा परिपाक म्हणजे आज गावातील भूजल पातळी वाढली आहे. डोंगरात कुरणे तयार होण्यास चालना मिळाली आहे. साहजिकच चारा निर्मिती होऊन गावात दुधाळ जनावरांची संख्या वाढली आहे.

सध्या गावातून घरगुती विक्री वगळता दिवसाला पाचशे लिटरहून अधिक दुधाचे संकलन डेअरीसाठी होत आहे. पूर्वी ४०० ते ५०० दरम्यान असलेली शेळ्या-मेंढ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून साडेतीन ते चार हजारांपर्यंत पोहोचली आहे. पाण्याची उपलब्धता वर्षभर राहत असल्याने शेतकरी बागायती पिकांकडे वळत आहेत. भाजीपालावर्गीय पिकांचे उत्पादन घेणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. दुष्काळासोबत दोन हात करण्याची क्षमता ग्रामस्थांनी एकजुटीतून सिद्ध केली आहे.

माणुसकीचे दर्शन

कोरोना काळात गावातील तरुणांनी जात-धर्माचा विचार न करता रुग्णांना अविरत सेवा दिली. ज्या काळात कोरोना रुग्णांसाठी नातेवाईकही पुढे येत नव्हते अशा काळात मृत्यू झालेल्या २० पेक्षा अधिक व्यक्तींवर या तरुणांनीच अंत्यसंस्कार केले. गरजूंना अन्नधान्याची पाकिटे घरपोच दिली. स्वतःच्या वाहनांतून रुग्णांना दवाखान्यांमध्ये पोहोचविण्याची व्यवस्था केली. आजही गावात वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक एकोप्याने राहतात. एकत्रित सण साजरे करतात. धर्मस्थळे एकमेकांना लागून उभी आहेत. जात-धर्माच्या नावावर कधीही गालबोट लागल्याचे उदाहरण गावात पाहण्यास मिळत नाही.

इरफान पठाण ८७६७१८२८३० (सामाजिक कार्यकर्ते, जयपूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

Weather Update : नक्षत्र बदलले; वातावरणात वाढला उन्हाचा चटका

SCROLL FOR NEXT