Agriculture Success Story : भात हे कोकणचे मुख्य पीक असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र खरिपाची लगबग सुरू आहे. जिल्ह्यात सुमारे ६२ हजार हेक्टरवर हे पीक घेतले जाते. जिल्ह्यातील वेंगुर्ले-मालवण मार्गावरील परूळे या गावाची जिल्ह्यातील प्रगतिशील गाव म्हणून ओळख आहे.
नारळ, सुपारी, आंबा, काजू, कोकम अशी विविध पिके गावातील शेतकरी घेतात. बचत गटांच्या माध्यमातून काथ्या उद्योगही गावात उभा राहिला आहे. दीड- दोन किलोमीटर अंतरावर चिपी विमानतळ आहे. पर्यटन, ग्रामविकासातही परूळे आघाडीवर आहे. सभोवताली वेढलेला डोंगराळ भाग व मध्यभागी लोकवस्ती असे रम्य चित्र या परिसरात पाहायला मिळते.
परब कुटुंबाची शेती
परुळे गावातील अंकुश परब यांचा शेतीत सुमारे ४० वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. कुटुंबीयांची सुमारे ३० हेक्टर जमीन आहे. पैकी एक हेक्टर क्षेत्र भात लागवडयोग्य असून, दीड एकरात ते एसआरआय पद्धतीने लागवड करतात.
दहा गुंठ्यांत नाचणी घेतात. सन २०१८ पासून काजू लागवडीला प्रारंभ केला. टप्प्याटप्प्याने लागवडीत वाढ करीत सध्या वेंगुर्ला चार आणि सात जातीची कलमांची लागवड पंधराशे झाडांच्या वर पोहोचली आहे.
याशिवाय नारळाची ५० तर सुपारीची दोनशे झाडे आहेत. अंकुश यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर गावात राहूनच शेती करण्याचा निर्णय घेतला. आता कुटुंब विस्तारले असून एकत्रित कुटुंब व्यवस्था स्वीकारून शेती क्षेत्रात प्रगती कायम ठेवली आहे.
सुधारित तंत्रपद्धतीचा अवलंब
परब कुटुंबातील तरुण पिढीही पूर्णवेळ शेतीतच सक्रिय झाली आहे. सध्या मुख्य जबाबदारी अंकुश यांचे चिरंजीव हरीश पाहतात. मागील काही काळापर्यंत परब कुटुंब पारंपरिक पद्धतीने रोपवाटिका, पुनर्लागवड व व्यवस्थापन या पद्धतीने शेती करायचे. मिळणारे उत्पादन खूपच कमी होते. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक अशी स्थिती होती.
याच कालावधीत कृषी विभागाची सिंधुरत्न योजना सुरू होती. त्या अंतर्गत कृषी विभागाने परब यांना आधुनिक पद्धतीने भातशेती करण्याविषयी प्रोत्साहन दिले. सुधारित वाणांसह अनुदान तत्त्वावर आवश्यक यंत्रसामग्री पुरवण्यासह एसआरआय पद्धतीविषयी मार्गदर्शन केले. यात बीज प्रक्रियेपासून ते पुनर्लागवड व काढणीपर्यंत मंडळ कृषी अधिकारी हर्षा गुंड, कृषी पर्यवेक्षक संदीप देसाई, कृषी सहाय्यक सूरज परब यांनी शास्त्रोक्त पद्धतीचे प्रशिक्षण दिले.
व्यवस्थापनातील ठळक बाबी
रत्नागिरी ८ वाणाची निवड. हरीश सांगतात, की हे वाण लोळत नाही. फुटव्यांचे प्रमाण अधिक आहे.१४५ ते १५० दिवसांत पक्व होते.
रोपवाटिकेसाठी चटई (मॅट) पद्धतीचा होतो वापर.
दीड एकराला बारा ते तेरा किलो बियाणे वापरण्यात येते.
दहा लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ वापरून या द्रावणात बियाणे घातले जाते. पाण्यावर तरंगणारे हलके असलेले बियाणे काढून टाकण्यात येते. उर्वरित बियाणे दहा मिनिटांनंतर मिठाच्या पाण्यातून काढून स्वच्छ धुऊन घेतले जाते. त्यानंतर स्वच्छ पाण्यात सहा तास व त्यानंतर ओल्या गोणपाटात ठेवले जाते.
सुकलेले शेणखत, कोकोपीट आणि माती यांचे मिश्रण केले जाते. जमिनीवर प्लॅस्टिक पेपर व्यवस्थित रित्या पसरून हे मिश्रण २ ते ३ इंच पसरून घेण्यात येते. गोणपाटात ठेवलेले भाताचे बीज पसरविले जाते. त्यावर अर्धा इंच माती घातली जाते. गरज भासल्यासच पाण्याचा वापर होतो.
पुनर्लागवडीच्या शेतात मशागत, त्यानंतर सुकलेले शेणखत पसरवले जाते. पुनर्लागवडीवेळी
खते दिली जातात. एसआरआय पद्धतीत दोन ओळी व रोपांमधील अंतर २५ बाय २५ सेंमी ठेवले जाते. एका ठिकाणी दोन रोपांची लागवड होते.
पंधरा दिवसांनी यंत्राद्वारे कोळपणी होते. पिकावर लक्षणे जाणवल्यास सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर होतो.
पंधरा दिवसांनी दुसरी कोळपणी होते.
हरीश सांगतात, की पारंपरिक पद्धतीत दीड एकराला ३० किलो बियाणे लागायचे. एसआरआय पद्धतीत १३ किलोच्या दरम्यान वापर होतो.
अन्य पिकांची सुधारित शेती
हरीश यांना वडिलांसह आई भाग्यश्री बंधू, काका लवू व मधुसूदन यांची मोठी मदत होते. कुटुंबाची बहुतांशी जमीन डोंगराळ भागात आहे. तेथे फळबाग लागवड करण्याविषयी कुटुंबात चर्चा झाली. आंब्यापेक्षा काजू लागवडीला प्राधान्य देण्यात आले. पहिल्या टप्प्यात दोनशे कलमांच्या लागवडीचे नियोजन झाले. डोंगराळ भागातील झाडेझुडपे काढण्यात आली. तेथे विहीर किंवा विंधन विहिरीला पाणी उपलब्ध होण्याची शक्यता कमी होती.
मात्र धाडसाने केलेला प्रयोग यशस्वी झाला. आता टप्प्याटप्प्याने १५०० पर्यंत कलमांची लागवड केली असून, प्रत्येक वर्षी त्यात भरच पडत आहे. काजूचे एकूण चार टनांच्या आसपास उत्पादन मिळते. तर प्रति किलो १३० रुपयांपासून १६० रुपयांच्या आसपास दर मिळतो. काजू, सुपारीतून वार्षिक आठ लाखांच्या दरम्यान उलाढाल होते. पॉवर टिलर, फवारणी पंप, ग्रास कटर आदी यंत्राचा वापर होतो. सुमारे सहा जनावरे असून, घरगुती वापरासाठी दुधाचा तर शेतीत शेणखताचा वापर होतो.
उत्पादन व विक्री
हरीश सांगतात, की पारंपरिक पद्धतीत गुंठ्याला ४० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळायचे. आता ते दुपटीने वाढले आहे. सन २०२३ मध्ये प्रति गुंठा ९९.६५ किलो उत्पादन घेतले. त्या वेळच्या पीक स्पर्धेत वेंगुर्ला तालुक्यात परब यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. या उत्पादनात पुढेही स्थिरता ठेवल्याचे हरीश सांगतात. त्या हिशेबाने एकरी साडेतीन टन उत्पादकता मिळवली आहे. कुडाळ येथील व्यापाऱ्यांना भाताची विक्री होते. किलोला १८ रुपयांच्या दरम्यान दर मिळतो.
हरीश परब, ९३५६१०७०४२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.