Agri Tourism Agrowon
यशोगाथा

कृषी पर्यटन व्यवसायाने पैसाच नव्हे, समाधानही दिले

रासायनिक कंपनीत नोकरीत असताना ॲलर्जीयुक्त त्रास होऊ लागल्याने नाशिक जिल्ह्यातील कोथुरे (ता. निफाड) येथील रमेश मोगल गावी परतले. चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीवर उपजीविका करणे आव्हानात्मक होते. मात्र सध्याच्या काळातील ग्राहकांची गरज ओळखून कृषी पर्यटन व्यवसाय सुरू केला. तसा शेतीचा विकास व सुविधा तयार केल्या. आज याच व्यवसायातून आर्थिक सक्षमता मिळवण्यासह आनंद, समाधानही प्राप्त केले आहे.

मुकूंद पिंगळे

नाशिक जिल्ह्यातील कोथुरे (ता. निफाड) येथील रमेश मोगल यांची कौटुंबिक परिस्थिती पूर्वी हलाखीची होती. प्रतिकूल परिस्थितीत २००३ मध्ये त्यांनी रसायनशास्त्र विषयात पदवी व २००५ मध्ये जैवतंत्रज्ञान विषयात पदव्युत्तर पदविका घेतली. त्यानंतर रासायनिक कंपनीत नोकरी मिळाली. मात्र १० वर्षे नोकरीतील कालावधीत ॲलर्जी, खोकला आदी त्रास असाह्य होऊ लागले. नोकरी सोडावी असा विचार आला. पण जगायचं कसं, असा प्रश्‍नही समोर होता. अखेर २०१७ मध्ये नोकरीला रामराम करत गावची वाट धरली. वडील रामचंद्र पारंपरिक पद्धतीने शेती (Traditional Agriculture) करायचे. मात्र रमेश यांनी काळाची गरज ओळखून फलोत्पादनाची (Horticulture) कास धरली. पत्नी वनिता सोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या. जिद्द आणि कष्टातून दोघांनी जीवनात जगण्याची नवी वाट निर्माण करण्यास सुरुवात केली. (Agriculture Tourism)

कृषी पर्यटनाच्या दिशेने

नोकरीदरम्यानच रमेश यांनी २०१६ मध्ये आंबा लागवड केली होती. रासायनिक अवशेषमुक्त शेती, त्यातील सकस अन्न व शहरी लोकांना निसर्गाच्या जवळ आणणे या हेतूने कृषी पर्यटन केंद्र ही संकल्पना त्यांना भावली. आपल्या साडेतीन एकरांत त्याचा विकास करण्यास प्रारंभ केला. दीड एकरात केसर आंबा लागवड शिवाय हापूस, तोतापुरी, बारमासी वाणांच्या लागवडी होत्या. सन २०१८ मध्ये पेरू, अंजीर, लिंबू, चिकू, जांभूळ, नारळ अशी विविधता जोपासण्यास सुरुवात केली. सघन पद्धतीच्या लागवडीतून कृषी पर्यटनास पोषक वातावरण निर्माण केले. आज आंब्याची सुमारे १७०, पेरू सरदार ४९ वाणाची २५० तर आंध्र प्रदेशातून आणलेल्या अंजिराच्या एलिफंट इअर वाणाची २५० झाडे आहेत. शिवाय लिंबू ५०, चिकू १५, जांभूळ २, करवंद २, नारळ १७० व शेवगा ५० अशी समृद्धी तयार केली आहे.

व्यवसायास सुरुवात

२६ जानेवारी, २०१८ मध्ये ‘डिलिजन्स फार्म’ नावाने कृषी पर्यटनास (स्टार्टअप) सुरुवात केली. ‘डिलिजन्स’ म्हणजे परिश्रम. नाशिक-औरंगाबाद महामार्गाशेजारीच निसर्गाच्या सानिध्यात हे क्षेत्र आहे. सुरुवातीला कुटुंबीय व नातेवाइकांचा या व्यवसायास विरोध होता. पण मोगल दांपत्याने कोणताच कमीपणा वाटू न देता हिमतीने प्रयत्नांना दिशा दिली. व्यावसायिक धोरण, दृष्टिकोन व सेवा- सुविधा यांचा सूक्ष्म अभ्यास केला. नोकरीतील काही रक्कम व कर्जाद्वारे १० ते १२ लाख गुंतवणूक केली.

पर्यटन केंद्राची वैशिष्ट्ये

नांदूर मधमेश्‍वर पक्षी अभयारण्य येथून जवळ आहे. त्यामुळे पक्षी पाहण्यासाठी येणारे देशी- परदेशी पर्यटक आपल्या केंद्राकडे आकर्षित होतील हा उद्देश होता. त्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ‘बेड अँड ब्रेकफास्ट’ योजनेत नोंदणी २०१८ मध्ये नोंदणी केली. ‘अतिथी देवो भव’ या वृत्तीने ग्राहकसेवेला प्राधान्य दिले. नाशिकची चुलीवरची मिसळ, पिठलं भाकरी, भज्यांची आमटी, शेंगदाणे झिरक, वांग्याचे भरीत, रस्सा पातोडी, कुळीथ शेंगोळे अशी मराठमोळी मेजवानी येथे असते. त्यामुळे अनेक कौटुंबिक कार्यक्रम, वाढदिवस, स्नेहमेळावे येथे होतात. मर्यादित ग्राहक, गुणवत्तापूर्ण सेवा हे तत्व त्यांनी अंगिकारले. ग्राहकांच्या मागण्या व सूचना विचारात घेऊन कामकाजात सातत्याने सुधारणा केल्या. व्यवसायातून मिळालेले उत्पन्न बाजूला काढून सुविधांचा विकास केला. हिरवळ असलेले रस्ते, स्वच्छता, तत्परता ही वैशिष्ट्ये जपली. पर्यटन संचलनालयाच्या कृषी पर्यटन अंतर्गत नोंदणी प्रस्तावित आहे.

कामकाजातील बाबी

-ग्राहकांची आगाऊ मागणी फोनवरून नोंदवून नियोजन

-कृषी पर्यटनाचा आनंद लुटताना नैसर्गिक पद्धतीच्या शेतीचीही माहिती देण्यात येते.

--लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य

--ऊस पाचटाची झोपडी, पार्किंग सुविधा

-गिलके, भोपळा, शेवगा, मेथी, शेपू, वांगी, मिरची तसेच फळांचे हंगामनिहाय उत्पादन. त्यामुळे ताज्या शेतीमाल खरेदीचा आनंद पर्यटकांना लुटता येतो. ग्राहक स्वतः तोडून फळे घेऊ शकतात.

-घरासह व्यवसाय व शेतीसाठी पूर्णपणे सौरऊर्जेचा वापर. हिरवळीसाठी लॉन निर्मिती.

-पूर्णपणे नैसर्गिक पध्दतीने शेती उत्पादन. देशी गायींचे संगोपन.

-दर सोमवारी सुट्टी

व्यवसायाचे ‘प्रमोशन’

-फेसबुक, इंस्टाग्राम, यू-ट्यूब, गुगल पेज, व्हॉट्‍सॲप या माध्यमातून व्यवसायाचे प्रमोशन.

-दररोज सुमारे ४० ते ५० संख्येने नाशिक मुंबई, औरंगाबाद, मुंबई, पुणे तसेच गुजरात मधून पर्यटक भेटी देतात. अभयारण्य जवळ असल्याने देशातील तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकही येतात.

-येत्या काळात अभयारण्य व गोदावरी नदी सफारी उपक्रम राबविण्याचा प्रयत्न.

...असे मिळवले समाधान

नोकरीतील वार्षिक उत्पन्नापेक्षा या व्यवसायातून अधिक उत्पन्न मिळू लगल्याचे आर्थिक समाधामन मोगल दांपत्याला लाभले आहे. गाव शिवारात दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर कल्पनाशक्तीला वाव देत स्वतःचे विश्‍व निर्माण करता आले याचे समाधान लाभले. सामाजिक प्रतिष्ठा उंचावण्याबरोबर सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठीही आदर्श उदाहरण समोर ठेवले. पर्यावरण पूरक जीवन जगताना आनंदी वातावरणता रोजगानिर्मिती केली.

संपर्क ः रमेश मोगल, ८३२९५८९४३९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT