अकोला जिल्हा ठिकाणापासून सुमारे १० किलोमीटरवर असलेल्या कुंभारी येथे बळिराम पांडव यांची केवळ अडीच एकर शेती आहे. त्यांचा भूतकाळ तसा आर्थिक ओढाताणीचा. पण मेहनतीच्या जोरावर बदल घडवून आणण्याची धडपड त्यांनी कधीच सोडली नाही. संयुक्त कुटुंबातून विभक्त झाले.
त्या वेळी पदरात काही नव्हते. नुकतेच लग्न झालेले होते. वडिलोपार्जित हिस्सेवाटीवर फारसे अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मग स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस करण्याचे पाऊल उचलले. कुटुंबाचा आर्थिक, सामाजिक स्तर बदलायचा असेल तर त्याला पर्याय नाही ही बाब पत्नी सुनीता यांना विश्वासात घेऊन सांगितली. त्यानंतर सुनीता देखील पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांना मदत करू लागल्या.
दुग्ध व्यवसायाची वाटचाल
बळिराम यांचे वडील मनोहर यांनी १९७७ पासून दुग्ध व्यवसाय जोपासला आहे. परंतु व्यवसायाला नवे वळण देण्याचे, विस्ताराचे काम बळिराम यांनी केले. सन दोन हजार मध्ये त्यांनी दोन म्हशी घेतल्या. लग्न झाल्यानंतर सुनीता यांनी आपल्याजवळील सोने विकून व जवळील पैशांतून काही म्हशी आणल्या.
टप्प्याटप्प्याने संख्या वाढवत नेत ती ३० पर्यंत नेली. अकोला शहराचे ठिकाण गावापासून सुमारे १० ते १२ किलोमीटर आहे. तेथपर्यंत सायकलीवरून ये-जा करून अकोला येथे दूध घरोघरी पोहोचवण्याचे कष्ट बळिराम यांनी उचलले. सन २००६ पर्यंत त्यांनी हे काम केले. सुनीतादेखील प्रसंगी दुधाचे कॅन हातात घेऊन वाड्यांवर संकलनासाठी पोहोचल्या.
स्वतःचे विक्री केंद्र
सुरुवातीच्या अतीव कष्टांनंतर पांडव यांनी अकोला येथे छोटी डेअरी, अर्थात ‘आउटलेट’ उघडण्याचे ठरवले. सन २००७ मध्ये नगर परिषद कॉलनीत भाडेतत्त्वावर जागा घेत ‘माऊली’ डेअरी सुरू केली. त्याचे संपूर्ण काम सुनीता सांभाळतात. सकाळी व सायंकाळी प्रत्येकी चार तास ही डेअरी कार्यरत असते. व्यवसायात प्रगती होऊ लागली, तशी चार वर्षांपूर्वी गौरक्षण रोडवर डेअरीची दुसरी शाखा सुरू केली.
तेथील जबाबदारी बळिराम पाहतात. दोन्ही डेअरींचे मिळून सुमारे साडेपाचशे लिटरपर्यंत दूध संकलन होते. यात जवळपास २५० ते २७५ लिटर दूध घरपोच (रतीब) दिले जाते. उर्वरित विक्री दोन्ही ठिकाणच्या ‘काउंटर’वरून ग्राहकांना थेट होते. दुधावर प्रक्रिया करून पनीर, श्रीखंड, तूप, दही, ताक असे विविध पदार्थ तयार करून नफ्याचे गणितही वाढवले आहे. दिवसाला २५ ते ३० किलो दही, १५ ते २० किलो पनीर, ८ ते १० किलो श्रीखंड आणि महिन्याला ५० ते ६० किलो तूप अशी विक्री होते.
दूध संकलन
‘माऊली’ डेअरीला बाभूळगाव, सिसामासा, येळवण, विधोरा, पिंपळखुटा, शिवापूर, कुंभारी अशा विविध गावांतील शेतकऱ्यांकडून दुधाचा पुरवठा होतो. दर शनिवारी हिशेब तयार करून रविवारी प्रत्येकाला हिशेब चुकता केला जातो. बहुतांश व्यवहार ‘चेक’द्वारे केले जातात. त्यासाठी दूध उत्पादक पती-पत्नीच्या नावे बँकेत खाते काढण्यात आले आहे.
दरवर्षी न चुकता ‘टॅक्स रिटर्न’ही भरण्यात येतो. भविष्यात हा व्यवसाय आणखी वाढवायचा आहे. बँकेत पत सुधारली, तर गरजेच्यावेळी पुरेशा भांडवलाची पूर्तता नक्कीच होईल, असे बळिराम यांना वाटते. शिवाय दररोज बँकेत बचत नियोजनही केले आहे. जेणेकरून दरमहा विशिष्ट रक्कम उभी राहते.
नियमित दूधपुरवठ्याचे नियोजन
दोन ठिकाणच्या विक्री केंद्रांमुळे घरच्या जनावरांची संख्या आता जेमतेम केली आहे. त्याऐवजी नियमित दूधपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना जनावरे खरेदीसाठी आर्थिक साह्य केले जाते. बदल्यात दुधाच्या पैशातून रक्कम कपात केली जाते. या व्यवहारात दोघांचाही फायदा राहतो.
जनावराच्या मालकाला एकाचवेळी पैसे देण्याची गरज नसते, तर पांडव यांना डेअरीसाठी नियमितपणे दूधपुरवठ्याची शाश्वती तयार होते. त्यामुळे दुधाचा पुरवठा कधी कमी होऊ दिला जात नाही.
रोजगारनिर्मिती ः
दुग्ध व्यवसाय वाढीमुळे किमान पाच ते सहा जणांना स्थानिक रोजगार उपलब्ध झाला. डेअरीतील कामे व दूध पोहोचवणे या कामांसाठी तीन जण कार्यरत आहेत. भाचा अक्षय आगरकार हा दूध वितरणाची जबाबदारी गेली अनेक वर्षे यशस्वीपणे सांभाळत आहे.
एकमेकांच्या साथीने फुलला संसार
पांडव दांपत्याचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होतो, तो संपतो रात्री १० पर्यंत. कुंभारी गावशिवारात पांडव यांची शेती आहे. सोयाबीन, हरभरा, गहू आदी पिके ते घेतात. कपाशीचे एकरी २५ क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले आहे. चाळीस फूट खोल विहीर खोदली असून, त्यास सर्वाधिक पाणी लागले आहे. सुनीता गावच्या उपसरपंच आहेत. त्यामुळे घरसंसार, शेती, पूरक व्यवसाय व ग्रामपंचायत अशा सर्व आघाड्या त्या कुशलतेने सांभाळतात. आज पती-पत्नी महिन्याला १५ हजार लिटर दुधाची उलाढाल करतात.
याच व्यवसायातून गावात टुमदार घर बांधले याचा त्यांना अभिमान आहे. एकेकाळी कुडाच्या घरात दिवस काढावे लागले याची त्यांना जाणीव आहे. अकोला येथे तीन प्लॉट्स घेतले आहेत. मुलगी पल्लवी कृषीचे शिक्षण घेत असून, सौरभ नववीत शिकतो आहे. बळिराम यांचे वडील मनोहर व आई शांताबाई यांचीही मोलाची साथ आहे. गावातील महिलांनी स्वयंरोजगार करावा यासाठी सुनीता यांचे प्रयत्न आहेत.
संपर्क ः बळिराम पांडव, ९७६३७९१०५२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.