Onion Storage Agrowon
यशोगाथा

स्वस्त, पोर्टेबल, तरीही टिकाऊ कांदा चाळ!

मुकूंद पिंगळे

कांदा हे महाराष्ट्रातील व्यावसायिक भाजीपाला पिकांपैकी एक आहे. नाशिक जिल्ह्यातील कसमादे भागात उन्हाळ कांदा (Summer Onion) हे नियमित पीक आहे. मात्र दिंडोरी, चांदवड, येवला, सिन्नर व निफाड तालुक्यातील काही भागांतील शेतकरी सिंचन सुविधा, दर, उपलब्ध संसाधने व हंगामी स्थिती पाहून कांदा लागवड (Onion Cultivation) करतात. अशा बहुतांश शेतकऱ्यांकडे कायमस्वरूपी कांदा चाळी (Onion Storage) नसतात. पूर्वी शेतकरी कारवी, बांबू अशा साहित्यातून तात्पुरत्या चाळी उभारत. वरून लोखंडी पत्रे वापरले जात. मात्र अशा चाळींमध्ये वाळवी (उधई) लागणे, उंदरांकडून होणारे नुकसान होई. तसेच आतमध्ये हवा खेळती राहत नसल्याने कांद्याची सड होण्याचा धोका वाढतो. अशा समस्यांवर मात करण्यासाठी शिवरे (ता. चांदवड) येथील व कृषी शास्त्रज्ञ डॉ. प्रतापसिंह खापटे व त्यांचे प्रयोगशील शेतकरीबंधू तुषार खापटे यांनी पोर्टेबल अशी संरचना कांदा चाळीसाठी विकसित केली आहे. ती केवळ ५० हजारांत उभारता येते. उभारण्यास व वापरण्यास सुलभ अशी ही संरचना गरज नसताना खोलून ठेवता येते. त्यामुळे शेतकऱ्यांची जागा अडून राहत नाही.

...अशी आहे संरचना

- ही एक पाखी चाळ असून, लांबी व रुंदी निश्‍चित केल्यानंतर दर ५ फूट अंतरावर एका बाजूला १२ लोखंडी खांब उभे केले जातात. त्यामध्ये तीन स्तराच्या पद्धतीने पाखीच्या एका बाजूला नट बोल्ट वापरून उभे खांब व आडवी जोडणी केली जाते. दोन्ही बाजूंना अशी जोडणी केल्यानंतर धातूच्या जाळी वापरून ती बांधली जाते. त्यानंतर त्यावर आत कांदा भरल्यानंतर ताण येऊ नये म्हणून नायलॉन दोरीने झिग-झॅग पद्धतीने बांधली जाते. वरील बाजूला झोपडीच्या आकाराच्या कमान केली असून, त्यावर जीआय वायरच्या साह्याने ताडपत्री आणि शेडनेट यांना आधार दिला जातो. ही संरचना कमी वेळात उभारता येते. तसेच नट बोल्टने जोडलेली असल्यामुळे आवश्यकता नसताना खोलून ठेवता येते.

- चाळीची दिशा पूर्व-पश्‍चिम दिशा ठेवली जाते. मॉन्सूनपूर्व वारे दक्षिण-पश्‍चिम वाहत असल्याने थंड हवा धातूच्या मोकळ्या जाळीतून पुढे जाऊ शकते. पावसाच्या स्थितीमध्ये थेंब व शिडकावे कांद्यापर्यंत येऊ नयेत, यासाठी बाजूला पडदे लावले आहेत. साठवलेले कांदे कोरडे, थंड आणि हवेशीर राहतात.

आकारमान

चाळीची रचना...एक पाखी व झोपडीप्रमाणे

उभारणी...पूर्व-पश्‍चिम पद्धत

साठवण क्षमता ३०० क्विंटलपर्यंत.

बाब...अंतर(फूट)

लांबी...६०

रुंदी...५

बाजूची उंची...६

चाळीच्या मध्य भागातील उंची...७

तळाची जमिनीपासून उंची...२

आवश्यक साहित्य

संपूर्ण उभारणी चौरस एमएस पाइप्सने बनलेली आहे. यासह इतर साहित्य कमी खर्चाचे वापरण्यात आले आहे. त्याची अंदाजे किंमत ५० हजार रुपये आहे. त्यामुळे प्रतिक्विंटल खर्च १६७ रुपये प्रमाणे गृहीत धरण्यात आला आहे. साठवणूक काळात ८ ते १० टक्के संभाव्य नुकसान अपेक्षित असून, तुलनेत नुकसान कमी आहे.

चौकोनी एमएस पाइप...१.५ बाय १.५ मिमी (३०० किलो)

लोखंडी जाळी...दीड इंचाची ५ फूट उंच

शेड नेट...१२० लांबी व ८ रुंदी फूट (७० टक्के उपयोगितायोग्य)

टारपोलीन शीट....६० फूट (४०० मायक्रॉन)

इतर बांधणी साहित्य...नट बोल्ट, जीआय वायर, नायलॉन दोरी.

सूक्ष्म हवामान आणि साठवण क्षमता

काढणीपश्‍चात कांदा साठवणीमध्ये सूक्ष्म हवामान अत्यंत महत्त्वाचे असते. आतपर्यंत हवा खेळती राहणे आवश्यक असते. त्यासाठी पाखीच्या बाजूला लोखंडी जाळी लावलेली आहे.

तसेच थेट सूर्यप्रकाश लागू नये, यासाठी बाजूला पडदा लावता येतो.

फायदे :

-सिमेंट काँक्रीट साहित्याच्या कोणत्याही गरजेसह उभारणी सुलभ

-कमी खर्चात टिकाऊ आणि पोर्टेबल/नॉक-डाउन रचना.

-साठवणुकीमध्ये योग्य सूक्ष्म-वातावरणाची व्यवस्था

-प्रति क्विंटल कांद्याचा साठवणूक खर्च पारंपारिक चाळीच्या तुलनेत कमी

-साठवणूक काळात तुलनेत नुकसान कमी.

संपर्क : डॉ. प्रतापसिंग खापटे, ९५८७३१०३३०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT