Carrot Farming Agrowon
यशोगाथा

Carrot Farming : गाजराच्या शेतीने बदलले बक्षीहिप्परगेचे अर्थकारण

सुदर्शन सुतार

Agriculture Success Story : सोलापूर-हैदराबाद महामार्गावर सोलापूरपासून केवळ सहा किलोमीटरवर २५०० ते ३००० लोकसंख्येचे बक्षीहिप्परगे (ता.दक्षिण सोलापूर) आहे. सुमारे चार किलोमीटवर आणि याच मार्गावर सोलापूर बाजार समिती असल्याने गावाला हक्काची बाजारपेठ आहे. त्यामुळेच पूर्वीपासूनच गावात भाजीपाला, कांदा आदी पिके घेतली जायची.

पुढील काळात शेतकरी गाजर शेतीकडे वळले. आज गाजर आणि बक्षीहिप्परगे हे समीकरणच झाले आहे. गावशिवारात सुमारे १५० ते २०० एकरांत किंवा भौगोलिक क्षेत्राच्या ८० टक्के क्षेत्रावर रब्बी ते उन्हाळी हंगामापर्यंत गावशिवारात गाजराची शेती होते. गाजर शेतीत जिल्ह्यात आघाडीवरचे म्हणून गावाला ओळख मिळाली आहे.

गाजर शेतीचे नियोजन

गावातील शेतकऱ्यांनी पिकवलेली केशरी रंगाची, आकाराने मध्यम, कोवळी आणि चवीला गोड-कुरकुरीत अशी गाजरे ग्राहकांच्या पटकन पसंतीस पडतात. बहुतांशी शेतकरी देशी वाणाचाच वापर करतात. या गाजर वाण शेतीत अन्य पिकांच्या तुलनेत मेहनत वा खर्च कमी आहे. कालावधीही तसा कमी आहे.

साधारण ऑगस्टच्या दरम्यान पावसाळा हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात काळ्या-भारी जमिनीत लागवडीचे नियोजन सुरू होते. उभी-आडवी नांगरट करून बियाणे नियोजन व त्यानंतर ट्रॅक्टरच्या साह्याने सरी पाडून घेतली जाते. एकरी १२ ते १५ किलो बियाणे लागते. लागवडीच्या पहिल्या १५ ते २० दिवसांत खुरपणी होते. त्यानंतर डीएपी, पोटॅश या खतांचा वापर होतो.

दर आठवड्याला एकदा पाणी दिले जाते. त्यानंतर पुढे ७५ ते ८० दिवसांत म्हणजे सुमारे अडीच महिन्यांत गाजरे काढणीस येतात. हा हंगाम एप्रिलपर्यंत चालतो. ज्या जमिनीत गाजर घेतले आहे तेथे शेतकरी पुन्हा तेच पीक घेत नाहीत. फेरपालट करतात. ज्यांच्याकडे शेती थोडी आहे ते हंगामात एकदाच पीक घेतात.

मात्र ज्यांच्याकडे ४ ते ५ एकर शेती आहे ते एक-दोन एकरांत आलटून-पालटून पूर्ण हंगामात लागवडीत सातत्य ठेवतात. त्यामुळे सलग आठ-नऊ महिन्यांपर्यंत गावात गाजराची शेती सुरुच असते. अलीकडील काळात काढणीमध्ये महत्त्वाचा बदल झाला आहे, पूर्वी हाताने काढणी व्हायची. आता ती ट्रॅक्टरचलित यंत्राच्या माध्यमातून होते.

उलाढाल पोहोचली कोटीत

चांगले व्यवस्थापन ठेवल्यास व हवामानाने साथ दिल्यास गाजराचे एकरी सरासरी ७ ते ९ टनांपर्यंत व काही वेळा १० टनांपर्यंत उत्पादन बक्षीहिप्परगे गावातील शेतकरी घेतात. नजीक असलेली सोलापूर बाजार समिती हा गावातील शेतकऱ्यांना मिळालेला सर्वांत मोठा फायदा आहे. काढणीच्या सुरुवातीच्या हंगामात म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर काळापर्यंत दर साधारण म्हणजे किलोला १० ते २० रुपयांदरम्यान दर असतात.

जानेवारीनंतर एप्रिलपर्यंत मागणी वाढते. या कालावधीत हा दर ३० ते ४० रुपयांपर्यंत पोहोचतो. एकूण विचार केल्यास एकरी दीड लाखापासून ते पावणेदोन, दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न शेतकरी या पिकातून मिळवतात. एकरी सुमारे २० ते २५ हजारांपर्यंत उत्पादन खर्च असतो. गावात सुमारे १०० पर्यंत गाजर उत्पादकांची संख्या धरली तर या पिकातून उलाढाल ७५ लाखांपासून ते कोटीच्या घरांत पोहोचते.

सोयीसुविधांनी उपक्रमशील गाव

गावात पायाभूत सोयीसुविधांसह विविध विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. सरपंच विश्रांत गायकवाड आणि सहकारी सदस्य सदैव सक्रिय असतात. पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा करणारे दोन प्रकल्प, सिमेंटसह पेव्हर ब्लॅाकचे रस्ते, सार्वजनिक वाचनालय, विद्यार्थी वसतिगृह, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, अंगणवाडी, जिल्हा परिषद व माध्यमिक शाळा आदी सुविधा आहेत. पंधरावा अर्थ आयोग, दलितवस्ती सुधारणा, स्वच्छ भारत अभियान, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक कचरा कुंड्या, बुद्धविहार, सौरऊर्जेवर आधारित हातपंप अशी विविध विकासकामे झाली आहेत.

-विश्रांत गायकवाड (सरपंच)-

९४२२६४९०३०

-श्रीकांत गायकवाड (शेतकरी)-

९६८९६४६५३८

-पांडुरंग निकम (शेतकरी) ८४५९४६८७११

माझी दोन एकर शेती आहे. पंधरा ते २० वर्षांपासून गाजरशेती करतो. एकरी दहा टनांपर्यंत मी उत्पादन घेतले आहे. अन्य पिकांच्या तुलनेत ही शेती फायद्याची ठरली आहे.
श्रीकांत गायकवाड
माझी सात एकर शेती असून पैकी पाच एकरांत दरवर्षी गाजर करतो. लागवडीचे नियोजन टप्प्याटप्प्याने करतो. त्यामुळे एकाचवेळी सर्व उत्पादन न मिळता दीर्घ कालावधीसाठी उत्पन्न मिळत राहते.
पांडुरंग निकम
आमच्या गावाला अनेक वर्षांची गाजर शेतीची परंपरा तयार झाली आहे. इथला शेतकरी कष्टाळू आणि धडपडी आहे. या शेतीने गावाचे अर्थकारण बदलण्यास मदत झाली आहेच. शिवाय गावाला वेगळी ओळख तयार झाली आहे.
-विश्रांत गायकवाड, सरपंच, बक्षीहिप्परगे
शासनाच्या सर्व योजना गावात राबविण्यात आल्या आहेत. पिण्याचे पाणी, रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन आदी कामे योग्य पद्धतीने पार पडली आहेत.
दीपाली माने, ग्रामसेविका

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Development : मराठवाड्याची कालबद्ध प्रगती हेच ध्येय्य

Agriculture Management Techniques : हवामान बदल अनुकूल शेती व्यवस्थापन तंत्र

Soybean Guaranteed Price : मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनचा मुद्दा चिघळला? शेतकरी ६ हजारांवर ठाम, संयुक्त किसान मोर्चा महामार्ग रोखणार

Proso Millet : आरोग्यदायी पौष्टिक भगर

Poultry Farming: कोंबड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक

SCROLL FOR NEXT